वाचन जीवनाला दृष्टी व आचरणशील संस्कृती देते -ज्येष्ठ साहित्यिका माया धुप्पड
1 min read

वाचन जीवनाला दृष्टी व आचरणशील संस्कृती देते -ज्येष्ठ साहित्यिका माया धुप्पड

Loading

वाचन जीवनाला दृष्टी व आचरणशील संस्कृती देते : ज्येष्ठ साहित्यिका माया धुप्पड
‘ वाचन जीवनाला दृष्टी व आचरणशील संस्कृती देते .वाचनामुळे अभिरुचीला दिशा मिळते व भाषा भावनांचं उन्नयन करते ; संवेदनशीलता जागे करते आणि माणुसकीची भिंत पक्की करते. ‘ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका माया धुप्पड यांनी केले.
भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशीच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्ताने आणि वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने अध्यापिका विद्यालय जळगाव येथे सोमवार दि. १५ ऑक्टोंबर २०२४ रोजी आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून धुप्पड मॅडम बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यापिका विद्यालयाच्या प्राचार्या लीना महाजन होत्या.यावेळी भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हाप्रमुख विजय लुल्हे उपस्थित होते.
प्रारंभी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण साहित्यिका माया धुप्पड यांनी व प्रतिभा पूजन अर्थात डॉ.कलाम लिखित ग्रंथपूजन प्राचार्या लिना महाजन यांनी केले .
पुढील मार्गदर्शनात साहित्यिका धुप्पड मॅडम म्हणाल्या ,’ संस्कृतीचे वहन भाषा करते म्हणून वाचनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.भाषेची समृद्धी साहित्यातून ओळखली जाते.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे त्यामुळे मराठी भाषेचा जरतारी पदर आता भरजरी झाला आहे. परिणामी लेखक, शिक्षक यांची मराठी अभिजात राजभाषेची समृद्धी , संपन्नता व संवर्धन करण्याची जबाबदारी सर्वार्थाने वाढली आहे.
शालेय जीवनात वाचनाच्या अनुषंगाने शिक्षकांनी स्वतःहून जबाबदारी घेतली पाहिजे मराठी भाषेची आवड व अवांतर वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी भाषिक उपक्रम व खेळासाठी म्हणी व वाक्प्रचार यांची प्रात्यक्षिके धुप्पड मॅडम यांनी भावी शिक्षिकांकडून प्रत्यक्ष करून घेतली .पूर्वी पाठ्यपुस्तकांनी भावसंपन्न व शिलसंपन्न पिढ्या घडविल्या आहेत. हे सांगतांना त्या म्हणाल्या की , ‘ सदाचार , जीवनमूल्ये व माणुसकीचे संस्कार कथा , प्रार्थना व कवितांमधून आजही आमच्या मनी मानसी शिक्षकांनी रुजविले आहेत हे त्यांनी अनेक कथांचे संदर्भ व सुश्राव्य काव्य गायन करून स्पष्ट केले.मार्गदर्शनाच्या समारोपात त्यांनी स्वलिखित कवितांचे सुरतालात गायन करून मंत्रमुग्ध केले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना संयोजक विजय लुल्हे यांनी पुस्तक भिशीची संकल्पना,उद्दिष्ट्ये व भिशी अंतर्गत राबवित असलेले उपक्रम स्पष्ट केले.वाचनातून आत्मोन्नती व समाजोन्नती साध्य होते हे स्पष्ट केले.
———————————-
*वाचन प्रेरणा दिनानिमित्त विजय लुल्हे यांचे ग्रंथदान* :-
सत्यशोधक समाज संघाच्या स्थापनेला १५१ वर्षपूर्ती झाल्या प्रित्यर्थ लुल्हे यांनी वैयक्तिक ‘ महात्मा फुले लिखित ‘ ११ पुस्तकांचा संच अध्यापिका विद्यालयाच्या ग्रंथालयासाठी सादर भेट प्राचार्य लिना महाजन यांना दिला.प्राचार्य महाजन यांना हेरंब कुलकर्णी लिखित ‘ शिक्षकांसाठी साने गुरुजी ‘ हे पुस्तक सादर भेट दिले.
———————————
याप्रसंगी प्राध्यापक एन. बी.चव्हाण, प्रा.सी.डी. लोहार , प्रा.डी.डी.पिंगळे मान्यवर उपस्थित होते.
सुत्रसंचालन प्राध्यापिका पी.आर.चौधरी व आभार प्रदर्शन प्रा.यामिनी भोळे यांनी केले.
द्वितीय सत्रात मायाताई धुप्पड लिखित कवितांचे ‘ अटक-मटक ‘ छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य लिना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.उद्घाटनपर भाषणात महाजन म्हणाल्या की ,’ धुप्पड मॅडम यांच्या बालकविता संस्कारक्षम व नीतीमूल्यांचे भरण पोषण करणाऱ्या आहेत जन्मतः त्या लय व ताल घेऊन आल्यामुळे त्यांना अक्षय जीवनगाण्याचा दर्जा आहे.’
याप्रसंगी विचारमंचवर श्रीमती जे.ए.भोळे व श्रीमती एम.टी.येवले,ग्रंथपाल संगिता पाटील मॅडम , सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक विजय लुल्हे उपस्थित होते.
‘ अटक – मटक ‘ छायाचित्र प्रदर्शनाचा लाभ अभिनव प्राथमिक विद्यालयाच्या इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थिनींनीनी घेतला. याप्रसंगी मुख्याध्यापक ललित नेमाडे यांसह प्रवीण वायकोळे , उमेश चौधरी , शारदा धांडे ,ज्योती इंगळे , स्नेहल ठाकूर ,वैशाली राठोड शिक्षिका उपस्थित होत्या.
छायचित्र प्रदर्शनाच्या सुशोभनासाठी छात्राध्यापिका
राधिका महाजन,शयुफा पिंजारी , वैष्णवी परदेशी , प्रियंका गंगराळे ,भावना पाटील , दिपाली पेंढारकर , पुजा जाधव यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी संस्थाध्यक्ष एस.डी.चौधरी,पुस्तक भिशीचे ज्येष्ठ सदस्य ह.भ. प.मनोहरजी खोंडे, डॉ. विजय बागुल, कवयित्री ज्योती राणे,महेश शिंपी सर , हेमंत धांडे सर यांनी अमूल्य मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *