बुद्ध विचारांनीच जगात भारताची ओळख- साहित्यिक डॉ.मिलिंद बागुल
![]()
बुद्ध विचारांनीच जगात भारताची ओळख-
साहित्यिक डॉ.मिलिंद बागुल
मानवाच्या उन्नतीचा त्याच्या अंत:करणाच्या विचारांना अनुसरून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणारा असा धम्म तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी जगाला दिला आणि या धम्मामुळेच जागतिक स्तरावर भारताची ओळख असल्याचे मत साहित्यिक तथा सार्वजनिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल यांनी भालोद ग्रामपंचायतिने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सार्वजनिक वाचनालयाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय नामकरण आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. भगवान भालेराव हे होते. नामफलकाचे उद्घाटन सरपंच प्रदीप कोळी यांच्या हस्ते करण्यात आले
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध, शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना डॉ.मिलिंद बागुल पुढे म्हणाले समाजात खरे परिवर्तन घडवायचे असेल तर पुस्तके वाचल्याशिवाय पर्याय नाही, कारण पुस्तक वाचून समृद्ध झालेले मस्तक कोणाचेही हस्तक न होता कोणापुढेही नतमस्तक होत नसते.कोणत्याही धर्माच्या संस्थापकांनी दुसऱ्या धर्माचा द्वेष करा असे कधी शिकवले नाही तर अतिधर्माभीमानानेच माणूस हा दुसऱ्या धर्माचा द्वेष करतो, आधुनिक पिढीला आज सर्वात जास्त गरज वाचनाची आहे आणि या वाचनाच्या माध्यमातूनच ते आपला व समाजाचा विकास घडवू शकतात, पुस्तके हेच खरे मार्गदर्शक असतात असे ठाम प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.भगवान भालेराव यांनी बौद्ध धर्माचा भारतात उदय व विकास कसा झाला,सम्राट अशोकाचे जीवन चरित्र व त्यांनी धम्मप्रसारासाठी केलेले कार्य सविस्तरपणे कथन केले. न्यू इंग्लिश स्कूल मुख्याध्यापक डी.व्ही.चौधरी यांनी डॉ.आंबेडकर हे एक भारतीय होते त्यामुळे सर्व भारतवासीयांचा ते गौरव होते. त्यांनी केलेल्या विशाल कार्यामुळेच त्यांना ज्ञानाचे प्रतीक म्हटले जाते.त्यांना एका विशिष्ट जाती-धर्मामध्ये बंदिस्त करणे शक्य नाही.भालोद शाळेला त्यांचा पदस्पर्श लाभल्याने भालोद शाळा व भालोद गाव हे इतिहासात अजरामर झाले आहे.डॉ.आंबेडकर यांनी सर्व धर्मीयांसाठी जे व्यापक कार्य केले आहे त्यामुळेच ते खऱ्या अर्थाने महामानव होते आणि त्यांचा हा मानवाकडून महामानवापर्यंतचा प्रवास वाचनातून व पुस्तकातूनच झाला.केवळ पुस्तकांसाठी घर बांधणारे जगातील एकमेव पुस्तकप्रेमी होते असे प्रतिपादन केले. याप्रसंगी त्यांनी भालोद शाळेच्या शिक्षक वृंदातर्फे वाचनालयास काही वाचनीय तसेच स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशा पुस्तकांचा संच भेट म्हणून दिला. गावातील सामाजिक कार्यकर्ते समाधान भालेराव यांनीही आपल्या मनोगतात आरक्षणाच्या संदर्भात सविस्तर माहिती सांगितली. ज्येष्ठ शिक्षक श्री एस्.एम्.तायडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर डी.एस्.सुरवाडे यांनी आभार प्रदर्शन केले. विचार मंचावर सरपंच प्रदीप कोळी ग्रामसेवक बी.के. पारधे,ग्रा.पं. सदस्य सचिन भालेराव,जाबीर खान,पोलीस पाटील लक्ष्मण लोखंडे उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भरत भालेराव,समाधान भालेराव,बाजीराव भालेराव,गौरव भालेराव, शांताराम भालेराव,दीपक भालेराव,रजनीकांत डोळे यांनी परिश्रम घेतले.

