खारी आंबिवली गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामात दिरंगाई गावकरी आंदोलनाच्या भूमिकेत,रस्त्याच्या कामाला सुरवात करण्याची भाजप मागणी
![]()
खारी आंबिवली गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामात दिरंगाई
गावकरी आंदोलनाच्या भूमिकेत,रस्त्याच्या कामाला सुरवात करण्याची भाजप मागणी
ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील अ प्रभाग क्षेत्रातील रिंग रोड ते खारी आंबिवली गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला होत असलेल्या दिरंगाईच्या विरोधात गावकरी आंदोलनाच्या तयारीत असून लवकरात लवकर रस्त्याच्या कामाला सुरवात करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे मोहने टिटवाळा मंडळ सचिव सुशीलकुमार पायाळ यांनी केडीएमसी आयुक्तांकडे केली आहे.
“अ” प्रभाग क्षेत्रांतर्गत येत असलेल्या खारी आंबिवली गावाच्या विकासासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. या रस्त्याबाबतच्या विकासासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थायी समिती सभा क्रमांक ४, दिनांक. १९१/०७/२०१९ रोजी विषय क्रमांक ३ व ठराव क्रमांक ५३ च्या अनुषंगाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम २१० अन्वये सेक्टर क्रमांक ६ प्रभाग क्रमांक ७ मौजे आंबिवली आनंद दिघे नगर झोपडपट्टी ते अंबिवली गाव शाळेपर्यंतचा रस्ता ९ मीटर रुंद करण्याची मंजुरी देण्यात आली आहे. कामाला मंजूरी देऊन सुद्धा अद्यापर्यंत या ठिकाणचा रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्याने खारी अंबिवली गावच्या गावकऱ्यांनी प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याची भूमिका घेतलेली आहे.
या रस्त्याच्या कामाबाबत ग्रामस्त मंडळ अंबिवली यांनी फेब्रुवारी महिन्यात केडीएमसी आयुक्तांना गावकऱ्यांच्या सह्यानिशी विनंती अर्ज दिलेला आहे. तसेच जून महिन्यात खारी आंबिवली गावच्या विद्यार्थ्यांनी विनंती अर्ज दिलेला असताना अद्यापर्यंत कुठलीही कारवाई न झाल्यामुळे संबंध गावातील गावकरी संतप्त झालेले आहेत. तरी या खारी आंबिवली गावच्या रस्त्याबाबत लवकरात लवकर योग्य ती उपाययोजना करून तात्काळ रस्त्याच्या कामाला सुरुवात केल्यास गावकरी आंदोलनाची भूमिका मागे घेतील अशी मागणी भाजपाच्या सुशीलकुमार पायाळ यांनी केडीएमसी आयुक्तांकडे केली आहे.

