शालेय विद्यार्थी सुरक्षेचे भान ठेवा — मुख्याधिकारी तुषार नेरकर
![]()
शालेय विद्यार्थी सुरक्षेचे भान ठेवा — मुख्याधिकारी तुषार नेरकर
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील नगरपालिका सभागृहात अमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर व नगरपरिषद शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी श्रीमती दिपाली पाटील आणि उपमुख्य मुख्याधिकारी संदीप गायकवाड यांच्या उपस्थितीत 10 सप्टेंबर रोजी अमळनेर शहरी विभागाची खाजगी प्राथमिक व नगरपालिका शाळेतील सर्व मुख्याध्यापकांची सभा आयोजित करण्यात आली होती. सदर प्रसंगी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी प्रतिपादन केले की, बदलापूर सारख्या अमानुष घटना आपल्या अंमळनेर शहरातील शाळेत घडणार नाहीत यासाठी दि. 21 ऑगस्ट 2024 चा शासकीय जीआरचे सखोल वाचन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी एक महिन्याच्या आत म्हणजे 21 सप्टेंबर पर्यंत होणे गरजेचे आहे. त्यानंतर प्रत्येक शाळेला भेट देण्यात येईल आणि सदर जीआर नुसार आढावा घेऊन वरिष्ठांकडे योग्य त्या कार्यवाहीसाठी सादर करण्यात येईल. त्यातील महत्त्वाचे मुद्दे म्हणजे आपल्या शालेय आवारात प्रत्येक वर्गात, शालेय दर्शनी भाग, शौचालय तसेच इतर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे आहे. आणि दर शनिवारी सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच शालेय आवारात योग्य त्या ठिकाणी तक्रार पेटी लावून सखी सावित्री मंचाची स्थापना करून त्यातील सदस्यांसमोर तक्रार पेटीतील येणाऱ्या तक्रारींची गोपनीयता ठेवून त्यावर योग्य निर्णय घ्यावेत. तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, गुणवत्ता वाढ याकडेही प्रामाणिकपणे लक्ष देणे गरजेचे आहे .असे यावेळी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी सर्व मुख्याध्यापकांसमोर प्रतिपादन केले. त्यात कोणतीही सबब ऐकली जाणार नाही. सदर जीआर नुसार अंमलबजावणी झालेली दिसत नसल्यास संबंधित शाळेची माहिती वरिष्ठांकडे सविनय सादर करण्यात येईल. आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सदर शाळेची मान्यता रद्द होऊ शकते .याचे गांभीर्य आपण लक्षात घेतले पाहिजे.
तसेच प्रशासनाधिकारी श्रीमती दिपाली पाटील मॅडम यांनी आपल्या शाळेत सखी सावित्री समिती,विद्यार्थी शिक्षक पालक संघ, माता-पालक संघ अशा विविध समित्या स्थापन केलेल्या असतीलच त्यानुसार आपण संबंधित संघाच्या सहविचार सभा आयोजित करून जनजागृती करणे अपेक्षित आहे. त्यात कुठलीही दिरंगाई किंवा टाळाटाळ होणार नाही याची गंभीरित्या दखल घ्यावी .आणि उपमुख्य अधिकारी संदीप गायकवाड यांनी 17 सप्टेंबर2024 रोजी न्यायमूर्ती गव्हाणे साहेब हे सर्व शाळा, सामाजिक संस्था, पोलीस विभाग, विविध संघटना पालक, महिला मंडळ, यांच्याशी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात संवाद साधणार आहेत. त्यासाठी आपण पालक शिक्षक इतर विविध संघटना यांना प्रेरित करावे. आणि सदर मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन केले. सदर प्रसंगी नगरपालिका शिक्षण मंडळाचे लिपिक सुनील पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुलाब पाटील व कैलास कोळी यांनी सहकार्य केले .सर्व उपस्थितांचे आभार मुख्याध्यापकांच्या वतीने डी. ए. सोनवणे सर यांनी मानले.

