अजिंठ्याच्या कलाशिल्पांनी झपाटलेला सृजनशील कलावंत म्हणजेच परशुराम पवार -पी. डी.जगताप,पु.ना.गाडगीळ कलादालनातील १०० वे कला प्रदर्शन व परशुराम पवार सरांचे पहिले प्रदर्शन हा ऐतिहासिक सुवर्णकांचन योग
![]()
अजिंठ्याच्या कलाशिल्पांनी झपाटलेला सृजनशील कलावंत म्हणजेच परशुराम पवार : पी. डी.जगताप
पु.ना.गाडगीळ कलादालनातील १०० वे कला प्रदर्शन व परशुराम पवार सरांचे पहिले प्रदर्शन हा ऐतिहासिक सुवर्णकांचन योग
‘ अजिंठ्याच्या कलाशिल्पांनी झपाटलेला सृजनशील कलावंत म्हणजेच कलाशिक्षक परशुराम पवार ‘ असे गौरवोद्गार उद्घाटक जगप्रसिद्ध कला समीक्षक पी.डी.जगताप सर यांनी काढले.
जळगाव येथील पु.ना.गाडगीळ कलादालन येथे परशुराम पवार ( कलाशिक्षक,श्रीमती कसळाबाई पवार माध्यमिक आश्रमशाळा , वरसाडे तांडा ता.पाचोरा ) यांच्या मध्यम सॉफ्ट पेस्टल माध्यमातील एकूण २४ चित्रांच्या कला प्रदर्शनाचे उद्घाटन रविवार दिनांक ३ सप्टेंबर २०२४ रोजी उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याबाहेरही सुप्रसिद्ध असलेले साईन बोर्ड आर्टिस्ट रवींद्र सोळुंके ( रवि आर्ट ) असून प्रमुख अतिथी सर्वश्री विष्णू मराठे ( मराठे पेंटर ), प्राध्यापक अविनाश सोनवणे ( धुळे ), संदिप पोतदार ( मॅनेजर ,पी.एन.जी.), अरुण सपकाळे ( सचिव,कलाध्यापक संघ ), प्रख्यात चित्रकार शाम कुमावत ( नशिराबाद ), श्रीराम जाधव ( संभाजीनगर ) उपस्थित होते. उद्घाटनपर भाषणात जगताप सर पुढे म्हणाले ,’ मराठे पेंटर यांच्याकडे उमेदीच्या काळात काम करणाऱ्या परशुरामाच्या कलेतील चमक मी पाहिली आणि खिरोद्याला कलाशिक्षण घेण्यासाठी त्याला प्रेरित केले.निरंतर कलासाधनेतून संधीचे सोने करीत केवळ स्वयंविकास न करता परशुरामने आदिवासी,अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांमध्ये अनेकविध उपक्रमांन्वये कलाभिरुची निर्माण करून कलावंत विद्यार्थी घडविले.

पूर्वी कलावंतांमध्ये निखळ मैत्रीची आदरयुक्त स्पर्धा असायची हे सांगत त्यांनी रवि आर्ट व मराठे आर्ट यांच्या व्यवसायिक स्पर्धेतील सुखद गौरवपर आठवणींना उजाळा दिला.डिजिटल कलेमुळे कलावंत उपेक्षित होऊन आर्थिक विपन्नावस्थेत जगतोय ही खंतही त्यांनी व्यक्त केली.आतल्या आवाजानुसार कलावंताला काम करण्यात परमानंद आणि आत्मिक समाधान मिळते.सुकन्या मयुरी चित्रकला आणि सुपूत्र पियुष शिल्पकलेतून वडिलांचा वारसा पुढे चालवताहेत.सुपूत्र आयुष उत्तम फोटोग्राफीत नाव कमावतो आहे याचा अभिमान वाटतो. परशुरामचे घर कलामंदिरच आहे .परशुरामने प्रथम प्रदर्शनाच्या उद्घाटनाचा सन्मान देऊन मला अतुलनीय अविस्मरणीय गुरुदक्षिणा दिली याचा परमानंद होतोय. ‘

‘ माझे रंग ‘ : परशुराम पवार यांच्या कला प्रदर्शनातील अविस्मरणीय क्षणचित्रे*
समाजातील पारंपारिक पेहराव व पारंपारिक आभुषणातील माता भगिनींनी गाणे गात केलेल्या अनोख्या स्वागताने प्रमुख अतिथी व उपस्थित मंत्रमुग्ध
मानवी मूल्यांच्या अधिकाराचे पुरस्कर्ते महात्मा जोतिराव , स्काऊटचे बेडन पॉवेल , करुणापूर्ती मदर तेरेसा , स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पोट्रेट लक्षवेधी
राज्याभिषेक भव्य चित्रातून शिवरायांना मानवंदना
शिर्डीचे साईबाबा व माता सरस्वतीच्या सुंदर चित्रान्वये अध्यात्माचा जागर
पियुष प्रशांत पवार यांच्या विठ्ठल मुर्ती ,संत श्री सेवालाल महाराज यांच्या शिल्पकलेला कलारसिकांची मिळाली उत्स्फूर्त दाद
पिताश्रींनी जगताप सरांना दिलेल्या गुरुदक्षिणेप्रमाणे सुकन्या मयुरीने सुद्धा दिली परशुराम पवार सरांना अनोखी गुरुदक्षिणा – प्रदर्शनाची नियोजित तीन तारीख जगताप सरांच्या कृपेने परस्पर रद्द करून पिताश्रींच्या वाढदिवसाला कलाप्रदर्शन आयोजित करून सुकन्या मयुरीने दिला सुखद धक्का
वाढदिवसानिमित्त गुरुवर्य जगताप सर आणि उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने
धर्मपत्नी अरुणा पवार व सुकन्या मयुरीने परशुराम पवार सरांचे मंगलमय वातावरणात श्रद्धा व प्रेमादरे कुंकूमतिलक करुन पूजन व औक्षण केले तद्नंतर सपत्नीक केक कापून पवार सरांनी केला ५३ वा वाढदिवस साजरा
ट्युब चॅनेल प्रसिद्ध गायक एन.ओ.चौधरी यांच्या ‘ तुम जिओ हजारो साल ये है मेरी आरजू ‘ या सुरेल गाण्यावर समस्त उपस्थितांनी धरला तालबद्ध ठेका
कलाक्षेत्रातील स्नेही व आप्तेष्टांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी केली झुंबड ]
कलेच्या महाभारतातील द्वारकाधीश श्रीकृष्ण ( श्याम कुमावत सर ) व गरीब सुदामा ( परशुराम पवार सर ) यांची अतुलनीय निःस्वार्थ मैत्री : – कलेतील महत्वपूर्ण पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध कलाग्रामचे कलाधिपती श्याम कुमावत सर यांनी माझ्यासारख्या ग्राम्य तथा बंजारा समाजातील सुदाम्याला काहीही त सांगता निरपेक्ष व निःस्वार्थ मैत्रीने स्वखर्चाने मला परसाडे तांड्याला कागद , रंग , कॅनव्हास साहित्य घरपोच पोहचविले. एवढ्यावर न थांबता पेंटींग्ज पूर्ण झाल्यानंतर स्वतः फ्रेमिंगसाठी घेऊन गेले. फ्रेमिंग केल्यानंतर माझ्या पश्चात स्वतः एकटयाने पु.ना.गाडगीळ कलादालनात विनम्रभावाने नियोजनबद्ध कलात्मक मांडणीने सर्व पेटींग्ज लावल्या . प्रदर्शनाची परिपूर्ण तयारी झाल्यानंतर शाम सरांनी प्रमुख अतिथींप्रमाणे मला ऐनवेळी उद्घाटनास ये ; धावपळ करू नका अशी प्रेमळ सुचना केली. एवढा मातृपितृवत्सल अमाप स्नेह व कृपाशिर्वाद निगर्वीपणे देणारा मित्र पाहून मला द्वापारयुगात श्रीकृष्णाने गरीब मित्र सुदामाला मैत्रीपूर्वक केलेला राजसन्मान व परिपूर्ण मदत आठवली .श्रीकृष्णासारखी शाम सरांनी अनुपमेय निगर्वी मोठेपणा न दाखवता केलेली संपूर्णतः प्रदर्शनासाठीची मदत या जन्मात आमरण विसरणार नाही. आमची मैत्री सुवर्णाक्षरांनी लिहीली ती सुद्धा सुवर्णपेढी पु.ना. गाडगीळ कलादालनात अजरामर केली हा सुवर्णकांचन योग आहे .परम आदरणीय गुरुवर्य राजेंद्र महाजन ( माजी प्राचार्य , ललीत कला केंद्र ,चोपडा ) यांचे प्रत्येक रंगोब्रशी मिळणारे अनमोल मार्गदर्शन मिळाल्याची फलश्रूती म्हणजे हे माझे पहिले प्रदर्शन*
कलाध्यापक संघ,जळगावचे विद्यमान अध्यक्ष एन.ओ.चौधरी सर गौरवार्थ भाषण करताना म्हणाले, ‘ परशुराम जन्मतः निसर्गदत्त देणगी मिळालेला सृजनशील,चैतन्यशील व विनयशील कलावंत आहे.त्याने रेखाटलेल्या व्यक्तिचित्रांतील विशुद्ध रंगतरंगांन्वये वातावरण मंगलमय झाले आहे.प्रत्येक काम आपल्याला आलेच पाहिजे आणि ते परिपूर्ण असलेच पाहिजे या ध्यासाने झपाटलेला आमचा कलावंत परशुराम आहे ! ‘ आश्रम शाळेचे मुख्याध्यापक एस.बी.राठोड सर आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की , ‘ परशुराम पवार हे आमच्या शाळेतील विद्यार्थीप्रिय विनम्र कलाध्यापक आहेत.सरांच्या पिताश्रींनी आमच्या आश्रम शाळेला चार एकर जमीन दान केली आहे हा दातृत्वाचा महन्मंगल कौटुंबिक वारसा परशुराम सरांना मिळाला असे असूनही सरांचे वागणे अतिशय आज्ञाधारक , शिस्तप्रिय व विनयशील आहे असे निगर्वी , संस्कारशील व सुसंस्कृत अनमोल कलारत्न आमच्या शाळेला लाभले हे आमच्या ग्रामविकास मंडळाचे भुषणास्पद कलासंचित आहे.’ श्रीराम जाधव यांनी परशुराम सरांच्या गौरवार्थ मराठी आणि गोर वंजारा लोकभाषेतून मार्गदर्शन केले.
*उपस्थित असलेले विविध क्षेत्रातील मान्यवर व चित्रकार :- व्हि .एस. कुलकर्णी सर , हेमंत मोरे सर ( सचिव , प्रहार न्यायमंच संघटना ), प्रा. मिनाक्षी चव्हाण मॅडम,सावित्री सोळुंके ( माजी संचालक जनता बँक जळगाव ), सरला कोळी ,अर्चना शेलार , दिपाली पवार मॅडम, डॉ. शांतिलाल तेली , शिल्पकार निरंजन शेलार , दिनेश पाटील , मनोज जंजाळकर , विजय लुल्हे ( भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी संचालक ) , दिनेश लहासे , हेमंत महाजन , सुबोध कांतायन, सुशिल चौधरी,गोपाळ भारुडे , सतीश सर ,संतोष पवार
प्रदर्शनाला आबा पाटील ( अध्यक्ष , केवलाई फाऊंडेशन , पाचोरा ) , पी.पी.पाटील ( पर्यवेक्षक , माध्यमिक आश्रमशाळा वरसाडे तांडा ), अनिल अहिरे ( सहकार्याध्यक्ष , प्रहार न्यायमंच ) या मान्यवरांसह असंख्य कलारसिकांनी भेटी दिल्या.
कार्यक्रमाचे मंत्रमुग्ध करणारे प्रास्ताविक , सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन निवृत्त प्राध्यापक विक्रम पाटील यांनी केले .

