भारतीय माणूस जगण्यासाठी संविधान जागरणाची आवश्यकता. मुकुंद सपकाळे
![]()
भारतीय माणूस जगण्यासाठी संविधान जागरणाची आवश्यकता.
मुकुंद सपकाळे
भारतीय लोकशाहीचे मूल्य भारतीय माणसाला आपल्या अस्तित्वाची, स्वाभिमानाची अशी ओळख देण्याचे कार्य भारतीय संविधानाने केलेले असून तसेच भारतीय माणूस जगण्यासाठी संविधान जागरणाची आवश्यकता असल्याचे मत मुकुंद सपकाळे यांनी संविधान जागर अभियानाच्या निमित्त आयोजित बैठकी प्रसंगी व्यक्त केले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ अब्दुल करीम सालार हे होते. मुकुंद सपकाळे पुढे बोलताना म्हणाले की सद्य परिस्थितीत भारतीय संविधान हा सामान्य माणसाचा आणि त्यासोबतच श्रीमंताच्या श्रीमंत माणसाचा तारणहार असून प्रत्येकाने संविधान समजून घेण्याची आवश्यकता असून भारतीय जनतेमध्ये संविधान साक्षरता आणि संविधान जागर करण्याच्या निमित्ताने जळगाव जिल्हाभर संविधान जागर अभियान राबविणार असल्याचे देखील त्यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
डॉ अब्दुल करीम सालार यांनी भारतीय संविधानाने सर्व जाती-धर्माच्या लोकांना सामावून घेत त्यांना आपल्या न्याय हक्काची जाणीव करून देण्या सोबतच इतर जाती-धर्माच्या लोकांचा आदर करण्याची देखील जाणीव करून दिलेली असून सर्वधर्म समभाव जोपासणारे संविधान आधिकाधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने साऱ्यांनीच प्रयत्नशील राहण्यासंदर्भात त्यांनी आवाहन केले. ज्येष्ठ समीक्षक तथा विचारवंत जयसिंग वाघ यांनी संविधान जागर अभियानाचा उद्देश आणि त्याच्या नियोजनासंदर्भात उपस्थितांना माहिती देत संविधान हे घराघरापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी मांडले. बैठकीचे प्रास्ताविक डॉ. मिलिंद बागुल यांनी तर सूत्रसंचालन विनोद सपकाळे यांनी केले आभार कैलास तायडे यांनी मानले. संविधान जागर अभियानाच्या अंतर्गत उपक्रम राबविण्या संदर्भात गोपाळ भालेराव,कैलास तायडे विजयकुमार मौर्य, दिलीप अहिरे, विशाल सोळंके, महेश शिंपी, दिलीप सपकाळे, संजय बागुल,देविदास सोनवणे,प्रशिक अढायांगे यांनी चर्चेत सहभाग घेऊन आपली मते मांडलीत.

