पंचाहत्तरी सेवारत्न बजरंगबलींची* आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संत ज्ञानवत्सल स्वामी तसेच इतर संतांच्या उपस्थित पार पडला हृदय सोहळा
1 min read

पंचाहत्तरी सेवारत्न बजरंगबलींची* आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संत ज्ञानवत्सल स्वामी तसेच इतर संतांच्या उपस्थित पार पडला हृदय सोहळा

Loading

*पंचाहत्तरी सेवारत्न बजरंगबलींची*
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संत ज्ञानवत्सल स्वामी तसेच इतर संतांच्या उपस्थित पार पडला हृदय सोहळा .

अमळनेर ही संतांची भूमी. विविध प्रकारच्या चळवळी तसेच व्यक्तींच्या योगदानामुळे अमळनेर नेहमीच सांस्कृतिक दृष्ट्या बहरत आलेले आहे.यात एक भर अशाच एका भव्य सोहळ्याची पडलेली आहे.दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी बजरंगलाल बन्सीलाल अग्रवाल यांचा 75 वा वाढदिवस परिवार व अमळनेरकरांनी उत्साहात साजरा केला.छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात हजारोच्या संख्येने उपस्थित असणारे अमळनेरकर आणि मंचावर उपस्थित असणारे महान संत अत्यंत आध्यात्मिक व भावपूर्ण असा हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्याचा योग आला.
बजरंग अग्रवाल म्हणजेच सगळ्यांचे “बजरंग काका”.अमळनेर शहरात उद्योग,व्यवसाय, समाजकारण,शिक्षण आणि सकारात्मक, राजकारण ,यासाठी प्रसिद्ध असणारे नाव बजरंग अग्रवाल. काका व दोन भाऊ यांनी मिळून एक नवीन विश्व अमळनेर येथे उभारले आहे.बजरंग काकांचा माझ्यावर पुत्रवत स्नेह आहे.
काका नेहमी सांगतात “बेटा कोणाचे वाईट करू नको देव तुझं वाईट करणार नाही” आणि याची वेळोवेळी प्रचिती येत असते. बजरंग काका यांनी आपल्या भावंडांसह आणि मुलं आणि पुतण्यांसह उद्योग विश्व उभारले.भविष्यात या विश्वाला कळस चढविण्याचे काम त्यांचे पुतणे सीए नीरज अग्रवाल,सीए राधेशाम अग्रवाल यांनी केले.
गेल्या आठ दशकांपासून हा परिवार एकत्र राहत आहे आजच्या युगात एवढ्या मोठ्या संख्येने लोक एकच कुटुंबात राहणे हे खरंतर नवलच आहे.मात्र कुटुंबप्रमुख हा शिस्तप्रिय आणि न्याय प्रिय असेल तर एकत्र कुटुंब टिकतात हे बजरंग काका अग्रवाल यांनी आपल्या कृतीतून सर्वांना दाखवून दिले आहे.
आंतरराष्ट्रीय संत प्रमुख स्वामीजी महाराज (अक्षरधाम मंदिर)यांचा प्रत्यक्ष दीर्घकाळ स्नेह लाभलेले व्यक्तिमत्व. प्रमुख स्वामीजी महाराज हे आपले माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे अध्यात्मिक गुरु होते. यांच्यासोबतच्या अनुभवांवर आधारित “उन्नयन” नावाचे अतिशय सुंदर पुस्तक एपीजे कलाम सरांनी लिहिलेले आहे .जेव्हा जेव्हा बजरंग काका हे जीवनाच्या वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये अडचणीत आले तेव्हा तेव्हा त्या अडचणी सोडविण्यासाठी प्रमुख स्वामीजी महाराजांची काकांना नेहमी मार्गदर्शन आणि मदत राहिली.
प्रताप मिल खरेदी केल्या नंतर बजरंग काकांनी यावेळी प्रताप मिल मध्ये निघालेले शेकडो टन सागाचे लाकूड बजरंग काकांनी देशभरात उभारल्या जाणाऱ्या विविध स्वामीनारायण मंदिर, स्वामीनारायण पंथातर्फे चालविल्या जाणाऱ्या शाळा आणि हॉस्पिटलच्या बांधण्यासाठी निशुल्क दराने पुरविले. दरवर्षी अनेक अपंग अधू लोकांना कृत्रिम अवयव विनामूल्य वितरित करतात. हनुमान जयंतीला सर्व अमळनेरवासियांना अन्नदान करतात. भारतीय संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात. आपल्या सामाजिक कामाच्या आधारावर त्यांनी अमळनेर करांचे भरपूर प्रेम अनुभवले.
BAPS चे प्रमुख स्वामीजी महाराज हे बजरंग काकांना नेहमी “बजरंगबली” असे म्हणत असत. बजरंग काकांच्या एकूणच कामाच्या व्याप्तीमुळे आणि काम करण्याच्या पद्धतीमुळे त्यांनी हे विशेषण काकांना दिलेले असेल. समारंभामध्ये बजरंग काका अग्रवाल यांच्या 75 वर्षांचा प्रवास आपल्या सुरेख शब्दांमध्ये नीरज अग्रवाल यांनी मांडला.यानंतर सर्व स्वामीजींच्या आशीर्वाचनांनी वाढदिवस साजरा झाला. यानंतर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वक्ते देश-विदेशात हजारो व्याख्यानातून लाखो जीवनात परिवर्तन घडविणारे परमपूज्य ज्ञानवत्सल स्वामी यांचे “माय फॅमिली हॅपी फॅमिली”या विषयावर अतिशय सुंदर असे निरूपण पार पडले.आपल्या कुटुंबासाठी प्रत्येक व्यक्तीने काय केले पाहिजे याबाबत स्वामींनी अतिशय मनमोकळ्या पद्धतीने तसेच प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेणारे विचार मांडले.स्वामीजींनी अमळनेर करांची हृदय जिंकली आणि सकारात्मक दिशेने परावर्तित सुद्धा केले.
कार्यक्रमाला मुंबई येथील स्वामीनारायण मंदिर प्रमुख पी पी स्वामी तसेच धुळे येथील आनंद स्वामी यासह काही संत उपस्थित होते.समारंभाला अग्रवाल परिवारावर प्रेम करणारे मध्य प्रदेश,राजस्थान ,गुजरात येथून मित्रपरिवार उपस्थित होता.यासह विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण भाई गुजराती ,माजी आमदार बी एस पाटील ,खासदार स्मिताताई वाघ यांचे सह राज्यातील व देशातील मोठे उद्योजक देखील उपस्थित होते.
नीरज भाऊ अग्रवाल आणि राधेश्याम भाऊ अग्रवाल व धीरज भाऊ यांच्या नियोजनात हा देखणा भावपूर्ण सोहळा अतिशय योग्यरीत्या पार पडला.स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अचूक पद्धतीने नियोजन पार पाडले.कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी फराळाची व्यवस्था करण्यात आलेली होती. बारीक नियोजन आणि आलेल्या प्रत्येक व्यक्तीची केलेली काळजी हे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते.
यानिमित्ताने परमपूज्य ज्ञानवत्सल स्वामी आणि इतर अध्यात्मिक व्यक्तींची ऊर्जा अनुभवण्याचा योग आला .नोबेल फाउंडेशन आणि स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल तर्फे ज्ञानवत्सल स्वामी यांचे मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. श्री बजरंग भाऊ अग्रवाल यांचा सन्मानपत्र देऊन ज्ञानवत्सल स्वामी व इतर मान्यवरांचा हस्ते गौरव करण्यात आला.
उपस्थितांचे प्रेम ,बजरंग भाऊंबद्दल स्वामींची असणारी आस्था आणि परिवाराला असणारा आनंद हे पाहून बजरंग काका यांना नक्कीच “हेची फळ मम तपाला “हीच भावना निर्माण झाली असेल बजरंग काकांना परमेश्वर दीर्घायुष्य देवो आणि लवकरच काकांचा 100 वा वाढदिवस अमृत महोत्सव साजरा करण्याचा योग येवो ही ईश्वरचरणी प्रार्थना !!

✍️ *जयदीप पाटील*
संचालक
नोबेल फाउंडेशन जळगाव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *