पुस्तक प्रेमी दिनानिमित्त ग्रंथप्रेमी विजय लुल्हे यांचे ग्रंथदान
![]()
पुस्तक प्रेमी दिनानिमित्त ग्रंथप्रेमी विजय लुल्हे यांचे ग्रंथदान
पुस्तक प्रेमी दिन व ग्रंथशास्त्राचे जनक एस.आर.रंगनाथन यांच्या जयंतीच्या औचित्याने आणि वयाची साठी पूर्ण झाल्या प्रित्यर्थ ग्रंथप्रेमी निवृत्त शिक्षक विजय लुल्हे यांनी ग्रंथालये ज्ञानाची सदावर्ते व समाज परिवर्तनाची उर्जाकेंद्रे असतात या उदात्त भावनेतून जळगावच्या शतकोत्तर व.वा.वाचनालयास १४ दर्जेदार पुस्तकांचे ग्रंथदान वाचनालयाचे ग्रंथपाल अनिल अत्रे यांना १३ ऑगस्ट रोजी सुपूर्द केले.तसेच कचरा वेचक व अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणून त्यांची भौतिक व शैक्षणिक गरजपूर्तीचे निरंतर कार्य करणाऱ्या सुधर्मा ज्ञानसभा सामाजिक संस्थेच्या वाचनालयासाठी एकूण ३६ पुस्तकांचे ग्रंथदान संस्थाध्यक्ष हेमंत बेलसरे यांना १५ ऑगस्ट रोजी सुपूर्द केले.संस्थेच्या प्रेरणादायी शैक्षणिक व सामाजिक कार्याच्या गौरवार्थ सुधर्माचे संस्थाध्यक्ष हेमंत बेलसरे यांचा भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी तर्फे शाल,श्रीफळ देऊन पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हाप्रमुख विजय लुल्हे यांनी हृद्य सत्कार केला.याप्रसंगी सुधर्मा संस्थेच्या अर्धव्यू आदर्श शिक्षिका सुनीता बेलसरे उपस्थित होत्या.पूज्य साने गुरुजींची १२५ वी जयंती व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी निमित्त संबंधित चरित्र पुस्तके तसेच पद्मश्री नरेंद्र दाभोळकर लिखित पुस्तकांचा संच यांसह शैक्षणिक,सामाजिक,वैज्ञानिक आणि पुरोगामी विषयांवरील सुप्रसिद्ध लेखकांची दर्जेदार प्रकाशनांची पुस्तके ग्रंथदानात लुल्हे यांनी दिली.
यापूर्वी विजय लुल्हे यांनी वाचन प्रेरणा दिनानिमित्त लोकसभागातून यावल तालुक्यातील समस्त जिल्हा परिषद शाळांना १००० चरित्र पुस्तकांचे मोफत वितरण केले आहे.पूज्य साने गुरुजी मोफत वाचनालय व ग्रंथालय,किनगाव ( ता .यावल ) या नोंदणीकृत वाचनालयाचे लुल्हे संस्थापक कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.विद्यार्थ्यांना सतत चेतवणारा ,जागवणारा शिक्षक वाचनातूनच साकारतो.शिक्षकांच्या प्रेरणा विधायकच हव्यात त्यात विखार असता कामा नये.शिक्षक संयमी, दूरदर्शी, सर्वसमावेशक हवा असं संतुलन बहुमुखी वाचनातूनच शक्य आहे.निरंतर वाचनाभिमुख शिक्षक विद्यार्थ्यांसाठी वाचनाचा मेरूमणी, दीपस्तंभ ठरतो या डॉ.सुनीलकुमार लवटे यांच्या समाजोन्नतीच्या क्रांतदर्शी दिशा दिग्दर्शक विचारांनुसार विजय लुल्हे सुमारे तीन वर्षापासून प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांसाठी पुस्तक भिशी ‘ ना नफा ना तोटा ‘ या तत्त्वावर चालवित असून विविध शैक्षणिक , सामाजिक पुरोगामी कार्यक्रमांच्या आयोजनातून वाचन संस्कृती चळवळीच्या सामाजिकीकरणासाठी तसेच वृद्धीसाठी निरंतर प्रयत्न करीत असतात.विना कमिशन दर्जेदार वाचनीय पुस्तकांची घरपोच विक्री करण्याची ग्रंथसेवाही लुल्हे आनंदपूर्वक करीत असतात.या सत्कार्यासाठी व वाचन चळवळी साठी निर्लेपवृत्तीने समर्पित सक्रियतेची प्रेरणा व प्रोत्साहन निवृत्त प्राथमिक शिक्षणाधिकारी आप्पासाहेब निळकंठराव गायकवाड ,शिक्षण उपसंचालक ( प्राथमिक विभाग ) तथा सुप्रसिद्ध साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर , दिपस्तंभ स्पर्धा परीक्षा केंद्राचे संस्थापक अध्यक्ष यजुर्वेंद्र महाजन,माजी प्राचार्य राजेंद्र महाजन ( ललित कला केंद्र ,चोपडा ) यांच्याकडून मिळाल्याचे लुल्हे कृतज्ञतापूर्वक सांगतात.

