ए.टी. झांबरे विद्यालयाची पिंपरी-चिंचवड सायन्स पार्कला शैक्षणिक सहल*
![]()
ए.टी. झांबरे विद्यालयाची पिंपरी-चिंचवड सायन्स पार्कला शैक्षणिक सहल*
जळगाव प्रतिनिधी : ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची पुणे-पिंपरी चिंचवड येथील सायन्स पार्कला एकदिवसीय शैक्षणिक सहल उत्साहात व ज्ञानवर्धक वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांना विज्ञानातील विविध संकल्पना प्रत्यक्ष प्रयोग, प्रात्यक्षिके आणि उपकरणांच्या माध्यमातून समजून घेता याव्यात, हा या सहलीमागील मुख्य उद्देश होता.
सायन्स पार्कला भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध विभागांना भेटी दिल्या. कल्पघर येथे घनश्याम सर यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रयोग व उपकरणे प्रत्यक्ष दाखवून त्यांचे कार्य व वैज्ञानिक तत्त्वे समजावून सांगितली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी नायट्रोजन शो पाहिला. नायट्रोजनच्या विविध गुणधर्मांचे प्रात्यक्षिक पाहताना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
यानंतर विद्यार्थ्यांनी तारांगणात (Planetarium) खगोलीय घडामोडींचा अनुभव घेतला. विश्व, ग्रह-तारे आणि अवकाशातील विविध घटनांविषयी विद्यार्थ्यांना माहिती मिळाली. सायन्स पार्कमधील हॉलमध्ये मांडण्यात आलेले विविध विज्ञान प्रयोग व उपकरणे विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने पाहिली. तसेच सायन्स गार्डनला भेट देऊन तेथील विविध वैज्ञानिक प्रतिकृती व प्रयोगांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
या शैक्षणिक सहलीसोबतच विद्यार्थ्यांना धार्मिक व सांस्कृतिक स्थळांना भेट देण्याची संधीही मिळाली. जाताना रांजणगाव येथील श्री महागणपती चे दर्शन घेण्यात आले, तर परतीच्या प्रवासात श्री मोरया गोसावी गणपती महाराजांचे दर्शन घेऊन सहलीचा समारोप करण्यात आला.
सहलीचे नियोजन व आयोजन श्री. महेंद्र नेमाडे सर व श्री. डी. ए. पाटील सर यांनी केले. सहलीदरम्यान सौ. पूनम कोल्हे मॅडम, सौ. रोहिणी पाटील मॅडम, सौ. ज्योती पाचपांडे मॅडम, सौ. खुशबू चौधरी मॅडम व सौ. नूतन वराडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांसोबत राहून मार्गदर्शन व सहकार्य केले.
या सहलीमुळे विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचे प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळाले तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत झाली. ज्ञान, मनोरंजन आणि संस्कार यांचा सुंदर मिलाफ असलेली ही एकदिवसीय सहल विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरली.

