धरणगाव शहरात प्रथमच वक्त्यांची कार्यशाळा उत्साहात संपन्न !..प्रा.अशोक पवार यांचा स्थुत्य उपक्रम !… साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची ग्रंथसंपदा व विचारांचा प्रचार -प्रसार देशासाठी प्रेरणादायी – डॉ.राहुल निकम
![]()
धरणगाव शहरात प्रथमच वक्त्यांची कार्यशाळा उत्साहात संपन्न !..प्रा.अशोक पवार यांचा स्थुत्य उपक्रम !…
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची ग्रंथसंपदा व विचारांचा प्रचार -प्रसार देशासाठी प्रेरणादायी – डॉ.राहुल निकम
अमळनेर प्रतिनिधी – शहरातील शतकोत्तरी शाळा प.रा. विद्यालय धरणगांव येथे अमळनेर येथील युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाने धरणगाव शहरात प्रथमच ऐतिहासिक वक्त्यांची कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
या ऐतिहासिक कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प रा विद्यालयाचे सचिव डॉ.मिलिंद डहाळे होते. कार्यक्रमाचे उद्घाटक अजयशेठ पगारिया होते. प्रमुख अतिथी म्हणून गट शिक्षणाधिकारी डॉ.भावना भोसले, अशोक पवार, प्रमुख वक्ते समाजकार्य महाविद्यालय चोपडा येथील प्रा.राहुल निकम, तालुका माध्यमिक संघाचे प्रमुख जे के पाटील, प रा विद्यालयाच्या मुख्या.आशा शिरसाठ, साळवा इंग्रजी विद्यालयाचे मुख्या.सुधाकर मोरे, पत्रकार डी.एस.पाटील, किरण चव्हाण, पी डी पाटील उपस्थित होते.
सर्वप्रथम विचार मंचावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतातील थोर समाज सुधारक लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्व प्रमुख अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.डॉ. मिलिंद डहाळे यांनी या स्थुत्य उपक्रमाचे कौतुक अभिनंदन केले. महापुरुषांचे विचार आपल्या देशासाठी प्रेरणादायी आहेत आणि ते विचार आपण घरा- घरापर्यंत वक्ते निर्माण करून विचार पोहचविणार आहेत ही खूप आनंदाची बाब आहे. यासाठी तुम्हाला कधीही अर्थसहाय्य लागले तर प रा विद्यालय आपल्यासाठी मदत करण्यास तयार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ.राहुल निकम यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट उलगडून सांगितला. अण्णाभाऊंचे साहित्य या देशासाठी अतिशय प्रेरणादायी आहे एवढे मोठे साहित्य लिहणारे अण्णाभाऊ या देशाचे एकमेव साहित्यसम्राट आहेत. त्यांनी आपल्या जीवनात केलेला संघर्ष आणि संघर्षावर मात करून निर्माण केलेले साहित्य युवकांसाठी प्रेरणादायी आहे. शिवराय फुले शाहू आंबेडकर यांचा विचार घरा-घरात पोहोचविण्याचे काम अण्णाभाऊ यांनी केले आहे. अण्णाभाऊंनी आपल्या जीवनात अनेक कथा, कादंबऱ्या, नाटक लिहिलेली आहेत. अण्णाभाऊंच्या फकीरा या कादंबरीला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळालेला आहे. अण्णाभाऊंचे सामाजिक – शैक्षणिक कार्य सांगून त्यांचे विविध पैलू डॉ.निकम यांनी विस्तृतपणे व सोप्या पद्धतीने सांगितले.
वक्ता कसा असावा ? , वक्त्याची भाषा सरळ, साधी, सोपी श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचणारी असावी. यावर्षी एक ऑगस्ट रोजी ” साहित्यरत्नाचा जन्मोत्सव “धरणगाव शहरात प्रत्येक शाळेत साजरा करूया व अण्णाभाऊंचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवुया अशी इच्छा डॉ.निकम व्यक्त केली. समारोपप्रसंगी डॉ. निकम यांचा जन्मदिनाचे औचित्य साधून विचार मंचावरील मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी धरणगाव शहरातील व तालुक्यातील अनेक शाळांचे शिक्षक बंधू – भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी ए पाटील तर आभार प रा विद्यालयाचे आदर्श शिक्षक जी आर सूर्यवंशी यांनी केले.

