शिक्षक व पदवीधर मतदार संघात निवडणूक जाहीर
![]()


शिक्षक व पदवीधर मतदार संघात निवडणूक जाहीर
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)
मुंबई, कोकण, नाशिक या मतदारसंघात निवडणूक आयोगाने 10 जुन 2024 रोजी निवडणूक जाहीर केली आहे. मुंबईमध्ये शिक्षक आणि पदवीधर या दोन्ही मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यासाठी 15 मे 2024 व नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024 अशी जाहीर करण्यात आली आहे. 10 जुन 2024 रोजी सकाळी आठ ते संध्याकाळी चार या काळामध्ये निवडणूक होणार आहे. आणि या निवडणुकीचा निकाल 13 जुन 2024 रोजी जाहीर केला जाईल असे निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्ध पत्रकामध्ये मांडलेले आहे.
मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास पोतनीस व शिक्षक मतदारसंघातून आमदार कपिल पाटील या सदस्यांची मुदत संपणार आहे. पदवीधर मतदारसंघातून यावेळी उमेदवार कोण असणार? हे अजून गुलदस्तात असले तरी शिक्षक मतदारसंघातून आमदार कपिल पाटील यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आणि आपली उमेदवारी आपले सहकारी सुभाष मोरे यांना दिली आहे शिक्षक मतदारसंघांमध्ये आमदार कपिल पाटील यांनी माघार घेतल्यामुळे आता निवडणुकीला रंग भरलेला आहे या ठिकाणी माजी शिक्षण संचालक ज. मो. अभ्यंकर शिक्षक सेनेचे उमेदवार आहेत तर शिक्षक भारती या शिक्षक संघटनेच्यावतीने सुभाष मोरे निवडणूक लढविणार आहेत. शिक्षक आमदार कपिल पाटील यांचा महाविकास आघाडीत समावेश असला तरी उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवारा विरोधात ते प्रचार करत आहेत त्याचबरोबर शिवनाथ दराडे, अनिल बोरनारे, ज्ञानेश्वर हांडे, धनंजय गजरे, राजू बंडगर, तानाजी कांबळे अशी काही नावे शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीला चर्चेत आहेत. पदवीधर मतदारसंघातून डॉक्टर दीपक सावंत, वरुण सरदेसाई, आमदार अनिल परब या नेत्यांची नावे चर्चेत आहेत. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कोण असणार? याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आशिष शेलारच ठरवतील असे एका वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.
दहा जुन ही तारीख सर्वच संभाव्य उमेदवारांना धक्कादायक आहे कारण अल्पकाळात मतदारसंघातील मतदारांशी संपर्क साधण्याचे आव्हान उमेदवारांसमोर असणार आहे. आमच्या प्रतिनिधींनी आमदार कपिल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता सुट्टीच्या काळात निवडणूक असल्याने अनेक मतदार गावाला गेले असल्याने मतदानाच्या टक्केवारीत दिसून येईल. मतदार कमी होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली पण निवडणूकीत आमचे उमेदवार सुभाष मोरे बाजी मारेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी शिक्षक कर्तव्यावर असल्याने 21 मे नंतरच शिक्षक गावी किंवा पर्यटनाला जातील यामुळे मतदान अल्प होईल अशी प्रतिक्रिया वरीष्ठ शिक्षक विजय अवसरमोल यांनी दिली.

