1 min read

नव्या संच मान्यतेच्या निर्णयामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती – ज्ञानदेव हांडे

Loading

नव्या संच मान्यतेच्या निर्णयामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती – ज्ञानदेव हांडे

मुंबई | प्रतिनिधी : आचारसंहितेच्या आदल्या दिवशी 15 मार्च रोजी विद्यार्थी व शिक्षकांचे प्रमाण ठरवणारा नवा संच मान्यता शासन निर्णय झाला. या नवीन निर्णयामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळांची संच मान्यतेची नवीन निकष जाहीर केले आहेत. 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानुसार 30 सप्टेंबर ची विद्यार्थी संख्या संचमान्यतेसाठी विचारात घेतली जाणार आहे. 60 पटासाठी किमान दोन शिक्षक असणार आहेत मात्र तिसरा शिक्षक पात्र होण्यासाठी किमान 16 मुलांची आवश्यकता भासणार आहे. हे तीन शिक्षक टिकवण्यासाठी किमान 61 मुलांचे आवश्यकता असणार आहे. सहावी ते आठवी मध्ये एकच वर्ग असल्यास 35 पर्यंत एक शिक्षक व त्यापुढे 53 पटानंतर दुसरा शिक्षक मान्य होणार आहे. तिसरा शिक्षक मान्य होण्यासाठी किमान 88 पट लागणार आहे. सहावी ते आठवीचे दोन वर्ग असल्यास 70 पर्यंत दोन शिक्षक व त्यापुढे 88 पटाच्या पुढे तिसरा शिक्षक मान्य होणार आहे. त्यानंतर शिक्षक मान्य करण्यासाठी प्रत्येकी 35 मागे एक शिक्षक मिळणार आहे. या निकषांमुळे शिक्षक संख्या टिकवणे स्वप्नच राहणार असून अनुदानित शाळांसाठी धोक्याची घंटा असणार आहे.
जुन्या संच मान्यतेच्या निकषांमध्ये दुरुस्ती करताना नवीन शासन निर्णयामध्ये पटसंख्येच्या जाचक अटी लादल्याने त्यांची पूर्तता करणे शाळांना अवघड जाणार आहे. या निर्णयामुळे शिक्षकांची संख्या कमी होईल. परिणामी शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे. कमी शिक्षक संख्येत शाळा चालवल्यामुळे शाळांचा शैक्षणिक दर्जा राखण्यात अडचणी निर्माण होणार आहेत. अनुदानित मोफत शिक्षण देणाऱ्या शाळा बंद पडण्याची शक्यता आहे. नव्या संच मान्यतेच्या निर्णयामुळे गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाचे तीन तेरा वाजल्याशिवाय राहणार नाही असा हांडे यांनी संताप व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्या वतीने न्यायालयात धाव घेण्यात येईल. अशी माहिती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *