शिक्षक संचमान्यता निकष बदलले- ९ वर्षांनी शारीरिक शिक्षक पुन्हा व्यवस्थेत
![]()
शिक्षक संचमान्यता निकष बदलले- ९ वर्षांनी शारीरिक शिक्षक पुन्हा व्यवस्थेत
म. रा. शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्यास यश

शालेय स्तरावर शिक्षक नेमणूकी करीता प्रत्येक वर्षी शाळांची संच मान्यता करून पदे निश्चीत केली जातात.२०१४ पासून निकषात बदल होऊन तुकडीवर आधारीत शिक्षक निश्चिती रद्द करून स्तरानुसार वेगवेगळी संच मान्यता होऊ लागल्याने व २०१५ पासून शारीरिक शिक्षकांचा विशेष शिक्षकाचा दर्जा काढून ६ ते ८ या उच्च प्राथमिकला वर्गीकृत करण्यात आल्याने कार्यभार बसत नसल्याने पद भरतीत शारीरिक शिक्षक डावलला जाऊ लागला. त्यामुळे २०१९ च्या शिक्षक भरतीत ०.०१% टक्केच शारीरिक शिक्षकांची पर भरती होऊ शकली होती व चालू भरतीत देखील ३६ जागांच्या आसपास उच्च माध्यमिक पर्यंतच्या अतिशय नगण्य जागेची जाहिरात पोर्टलवर प्रसिद्ध झाली आहे. मात्र शासनाने नुकत्याच निर्गमित केलेल्या शासन निर्णयात संच मान्यतेच्या निकषात सकारात्मक बदल केल्याने पुढील भरतीपासून शारीरिक शिक्षकांची पदे वाढली जाणार असल्याने पदवीधारकांत उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ अहमदनगर, म. रा. शारीरिक शिक्षण समन्वय समिती, म. रा. शारीरिक शिक्षण महामंडळ अमरावती , युवा शारीरिक शिक्षक संघटनांनी सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्यामुळे संच मान्यतेच्या निकषात शासनाने सकारात्मक बदल केल्याने शारीरिक शिक्षकां बरोबर कला शिक्षकही नोकर भरतीत तब्बल ९ वर्षांनी भरला जाणार असल्याने पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. नवीन निकषात शासनाने विशेष शिक्षकाचा दर्जा पुन्हा बहाल करताना, पूर्ण कार्यभारासाठी ६ वी ते १० वी चा कार्यभार धरून बायफोकल पद्धतीने पदभरती होणार आहे. तसेच प्राथमिकला केंद्र स्तरावर नव्याने शारीरिक शिक्षक पद निर्माण केल्याने प्राथमिकलाही शिक्षक मिळणार आहेत अशी माहिती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉ.प्रदीप तळवलकर कार्याध्यक्ष प्रशांत कोल्हे व सचिव राजेश जाधव यांनी दिली.
संच मान्यतेत पद पुन्हा समाविष्ट व्हावे म्हणून गेली सात वर्षे राज्य संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, कार्याध्यक्ष राजेश जाधव, सचिव विश्वनाथ पाटोळे, शिवदत्त ढवळे, ज्ञानेश काळे, डॉ पुरुषोत्तम उपर्वट, डॉ.आनंद पवार, प्रितम टेकाडे, लक्ष्मण बेल्लाळे, घनःशाम सानप, विलास घोगरे, डॉ.प्रदीप तळवलकर , प्रशांत कोल्हे, डॉ. रणजित पाटील, प्रा.हरीश शेळके,बी. डी जाधव, कैलास माने, डॉ जितेंद्र लिंबकर, तायप्पा शेंडगे, डॉ.मयुर ठाकरे, राजेंद्र कदम, संजय पाटील, डॉ. नितीन चवाळे यांनी शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्त, शिक्षण सचिव, शिक्षणराज्यमंत्री, शिक्षणमंत्री यांचेकडे शिक्षक व पदवीधर आमदार व मंत्री महोदयांचे माध्यमातून प्रयत्न केले. ९ वर्षांनी कला-क्रीडा-कार्यानुभव शिक्षकांची भरती होणार असल्याने संघटनेच्या वतीने पत्रक प्रसिद्ध करून शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले.
संचमान्यतेचे बदललेले निकष, स्तरानुसार होणारी संचमान्यता यामुळे माध्यमिक ९ वी १० वी स्तरावर शारीरिक शिक्षकाचा कार्यभार बसू शकत नव्हता. त्यामुळे पदभरती अल्प प्रमाणात होत होती. संघटनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे शासनाने सकारात्मक बदल केल्याने शारीरिक शिक्षक व्यवस्थेत पुन्हा घेतल्याने शासनाचे मनःपूर्वक धन्यवाद.
राजेश जाधव
कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ,अ.नगर तथा सचिव, जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ.

