भरत शिरसाठ यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कार बीड येथे प्रदान
![]()
भरत शिरसाठ यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कार बीड येथे प्रदान पद्मपाणी प्रतिष्ठान बीड मार्फत वर्ष 2024 करीता विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार वितरण सोहळा 17 मार्च रोजी बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे संपन्न झाला. सदर सोहळ्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे वास्तव्यास असणाऱ्या साहित्यिक भरत शिरसाठ यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व भारतीय संविधान देऊन उत्कृष्ट साहित्यिक म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांच्या साहित्यिक वाटचालीचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक लोकाशाचे संपादक व प्रसिद्ध उद्योजक मा. विजयराज बंब उपस्थित होते. तसेच प्रमुख मान्यवर म्हणून पद्मपाणी संस्थेचे अध्यक्ष मा. दिलीप तरकसे, डॉक्टर प्रज्ञा तरकसे, डॉक्टर राणी गायकवाड, बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष मा. बाबुराव पोटभरे, प्राध्यापक हौसराव पवार, एडवोकेट अनिल सुतार, प्राध्यापक नामदेव तरकसे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. भरत शिरसाठ यांचे आतापर्यंत नऊ पुस्तक प्रकाशित आहेत. यामध्ये 'शिक्षक कसा असावा?', 'सत्यशोधक आणि इतर कथा', 'बकध्यान' हा कवितासंग्रह, 'खैरलांजी- भीमा कोरेगाव आणि इतर कविता' हा कवितासंग्रह, 'भारतीय संविधानाचे अनंत उपकार', 'एक्स्पेक्टेशन अँड चॅलेंजेस इन टीचिंग अँड लर्निंग इंग्लिश' या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकांचा समावेश आहे. शासनाच्या विविध प्रोजेक्टवर त्यांनी इंग्रजीतून लेखन केलेले आहे. तसेच त्यांचे इंग्रजीतून रिसर्च पेपर पब्लिक झालेले आहेत. त्यांच्या पुस्तकांना अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य प्रकाशन समितीचे सचिव डॉक्टर प्रदीप आगलावे, प्रसिद्ध साहित्यिक प्रा. शुक्राचार्य गायकवाड, प्राध्यापक वा. ना. आंधळे, डाॅ.एल.ए.पाटील यांच्या प्रस्तावना आहेत. त्यांच्या पुस्तकांवर प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ, प्रदीप जाधव, प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड आदी मान्यवरांनी समीक्षा लिहिलेल्या आहेत. प्राध्यापक भरत शिरसाठ यांनी अनेक विषयांवर व्याख्याने दिलेली आहेत. तसेच अनेक वैचारिक लेख लिहिलेले आहेत. वैचारिक लेखन असलेल्या पुस्तकांना व कविता संग्रहांना प्रस्तावना दिलेल्या आहेत. अनेक शैक्षणिक व सामाजिक स्मरणिकांचे संपादन केलेले आहे. तृतीय राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन जळगाव येथील ते स्वागताध्यक्ष होते. बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे केंद्रीय महासचिव व समतावादी साहित्य मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. 'विद्यार्थ्यांचे दीपस्तंभ- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ', 'हरी आंबेडकर', 'भीमा कोरेगाव इतिहास- शौर्याचा प्रेरणा स्रोत', 'रियल स्टोरीज(इंग्रजी)' इत्यादी पुस्तके त्यांची प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.


