अधर्मामुळे नव्हे तर धर्मामुळे जगामध्ये शांतता-ह भ प डॉ. रवींद्र भोळे
![]()

अधर्मामुळे नव्हे तर धर्मामुळे जगामध्ये शांतता…… ह भ प डॉ. रवींद्र भोळे
वाघापूर ता. पुरंदर( माणकेश्वर मंदिर): त्यागी, गुणी ,शास्त्राचा अभ्यासू ,धैर्यवान , सात्विक कर्मे करणारा व्यक्तीच उत्तम पुरुष असू शकतो. असा पुरुष धर्म धारण करू शकतो. धर्म धारण करण्यासाठी दया अत्यंत महत्त्वाची असते. त्याचप्रमाणे जेथे धर्म आहे तेथेच जय आहे. धर्म प्रत्यक्ष परमेश्वराने निर्मित केलेत असे वेद म्हणतो. धर्म मनुष्याचे रक्षण करतात. त्यासाठी धर्माची धारणा करावी. जगामध्ये असणारे धर्म हे मानव जातीने धारण केलेले आहेत.. धर्माचे कुठेही दुकान नाही. धर्म धारण करण्यासाठी सात्विक व्यक्ती, सात्विक त्याग,सात्विक कर्म महत्त्वाचे असते. अधर्मामुळे नव्हे तर धर्मामुळेच जगातील शांतता टिकून आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक ह भ प डॉ रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. श्री माणकेश्वर महाशिवरात्र अखंड हरिनाम सप्ताह शिवलीलामृत पारायण सोहळा श्री क्षेत्र माणकेश्वर वाघापूर येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन समस्त ग्रामस्थ मंडळी वाघापूर यांच्या वतीने करण्यात आले होते. याप्रसंगी ह. भ. प. डॉ.रवींद्र भोळे ह्यांचे दया तेथे धर्मु, धर्म तेथे सुखागमु, सुखी पुरुषोत्तम असे जैसा ह्या आठव्या अध्यायातील ज्ञानेश्वरीच्या ओळीवर प्रवचन झाले.ते पुढे म्हणाले की भगवान शंकर दयेचा सागर आहे. त्याचप्रमाणे महाकाल सुद्धा आहे.माणिक नावाच्या भक्ताला परमेश्वराने दर्शन देऊन माणकेश्वर निर्माण झाले. नाथपंथीयातील चौरंगी नाथाच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या हया भूमीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह मध्ये प्रवचन करण्याची संधी मिळाली व तेही महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर हे माझे परम भाग्य आहे. अभौतिक अलौकिक आनंद काय असतो हे अशा अध्यात्मिक कार्यक्रमात सहभाग घेतल्याशिवाय कळू शकत नाही. पंचक्रोशी मध्ये हे एक जागृत भगवान शंकराचे स्थान आहे अशी परंपरागत आख्यायिका आहेत. या कार्यक्रमांमध्ये हभप दिव्यानंद गिरी मौनगिरी महाराज माणकेश्वर मंदिर वाघापूर यांचे प्रवचन झाले.या कार्यक्रमांमध्ये अनेक कीर्तनकार, प्रवचनकार यांची कीर्तने प्रवचने झाली. कार्यक्रमाला प्रामुख्याने ह भ प स्वामी दिव्यानंद गिरी मौनगिरी, ह भ प अर्जुन भाऊ कुंजीर फौजी, ह भ प बापू गायकवाड, ह भ प मोहन आबा कुंजीर, वसंत गुरुजी कुंजीर, माऊली इंदलकर गुरुजी, ह भ प बबन भाऊ इंदलकर , हभप सुर्यकांत महाराज कुंजीर, ह भ प राजाराम तात्या कुंजीर,पंचक्रोशीतील भाविक भक्त, माणकेश्वर भक्त परिवार, प्रवचनकार,कीर्तनकार ,टाळकरी विणेकरी त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या वेळी जप तप करणारे योगी या कार्यक्रमाला उपस्थित होते. हा कार्यक्रम माणकेश्वर मंदिराच्या भव्य पटांगणामध्ये आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अन्नदानाचा कार्यक्रमही झाला. श्री माणकेश्वर मंदिर शिवलीलामृत पारायण सोहळा वाघापूरचे हे पंधरावे वर्ष आहे.

