यंदाचे भारतीय मराठी अभ्यास परिषदेचे ३४ वे राष्ट्रीय अधिवेशन कुळगाव-बदलापूर महाविद्यालयात
![]()
यंदाचे भारतीय मराठी अभ्यास परिषदेचे ३४ वे राष्ट्रीय अधिवेशन कुळगाव-बदलापूर महाविद्यालयात
अमळनेर(प्रतिनिधी)- का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था धुळे व आदर्श कला आणि वाणिज्य महाविद्यालय कुळगाव-बदलापूर, जि. ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतीय मराठी अभ्यास परिषदेचे ३४ वे राष्ट्रीय अधिवेशन यंदा कुळगांव बदलापूर महाविद्यालयात दि. १ व २ मार्च २०२४ रोजी आयोजित करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील कुळगांव बदलापूर येथील आदर्श कला आणि वाणिज्य महाविद्यालय निसर्गरम्य परिसरात बसले असून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचा सातत्याने प्रयत्न करणारे आणि महानगर व गतिमान-जीवनाचा वेध घेणारे महाविद्यालय म्हणून सर्वांना ज्ञात आहे. अलीकडेच महाविद्यालयाने रौप्यमहोत्सवी वर्षे पूर्ण केले आहे. यानिमित्ताने ३४ वे अधिवेशन महाविद्यालयात संपन्न होत आहे.
यावर्षी चर्चेसाठी ‘मराठी भाषा आणि साहित्य संशोधन’ हा विषय घेण्यात आला असून या विषयाचे बीजभाषण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सेवानिवृत्त संचालक डॉ. रमेश वरखेडे हे करणार आहेत, अधिवेशनाचे उदघाटन आदर्श विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष मा. उदयजी कोतवाल यांच्या अध्यक्षतेखाली आणि भारतीय मराठी अभ्यास परिषदेचे अध्यक्ष मा. डॉ. यशवंत मनोहर, क.ब. चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य डॉ.के.बी.पाटील, आदर्श महाविद्यालय नियामक मंडळाचे अध्यक्ष मा.उदयजी केळकर, आदर्श कला, वाणिज्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्या मा. डॉ. संगीता पांडे, संचालक प्रा. डॉ. वंदना महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. सी.ए. श्री. शशिकांत धामणे यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे.
अधिवेशनाचा समारोप समारंभ मुंबई विद्यापीठाचे माजी मराठी विभागप्रमुख मा. डॉ. अनिल सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली व आदर्श विद्याप्रसारक संस्थेचे सचिव मा. श्री. तुषारजी आपटे आणि का.स. वाणी स्मृती प्रतिष्ठानच्या सचिव प्रा. डॉ. शोभा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.
मराठी भाषा आणि साहित्य संशोधन या विषयावर नव्याने प्रकाश टाकावा. मुख्यतः आजपर्यंत निर्माण झालेल्या नवीन विचार प्रवाहांचा, सिद्धांतनांचा मराठी साहित्यावर नेमका काय प्रभाव पडला याचा शोध घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर आज ज्या विद्यापीठांमध्ये मराठी भाषा आणि साहित्य विषयक संशोधन सुरू आहे. त्यात साचलेपण आले आहे. ही कोंडी फोडायची असेल तर संशोधन पद्धती प्रकार, संशोधनाचे विषय, संशोधनाचे स्वरूप याविषयी नवी मांडणी व्हावी या उद्देशाने चर्चासत्राचे आयोजन केले आहे.
दोन दिवसांच्या पाच सत्रांमध्ये अभ्यासपूर्ण शोधनिबंधाचे वाचन होणार असून त्यात डॉ. सुधाकर शेलार, डॉ. सुनील रामटेके, डॉ. नितीन रिंढे, डॉ. प्रभाकर देसाई, डॉ. गोविंद काजरेकर, डॉ. फुला बागूल, डॉ. वासुदेव वले, डॉ. वाल्मिक आढावे, डॉ. मीनाक्षी बन्हाटे, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. संजय करंदीकर, डॉ. पृथ्वीराज तौर हे आपले शोधनिबंध सादर करतील. सदर पाच सत्रांत डॉ. प्रमोद मूनघाटे, डॉ. नीळकंठ शेरे, डॉ. विनोद कुमरे, डॉ. मंगला वरखेडे हे मान्यवर अध्यक्ष स्थान भूषविणार आहेत.
सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व मराठी विभाग प्रमुखांना परिपत्रक व कार्यक्रम पत्रिका पाठविल्या असून चर्चासत्राचा लाभ प्राध्यापक-संशोधक-अभ्यासक यांनी घेऊन जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन संस्थेच्या संचालक प्रा. डॉ. वंदना महाजन आणि आदर्श कला, वाणिज्य महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. संदीप भेले यांनी केले आहे.

