1 min read

अमळनेरमधील महिला खुली मॅरेथॉन स्पर्धेत आंतरराष्ट्रीय धावपटू क्रांती साळवी यांचा सहभाग

Loading

अमळनेरमधील महिला खुली मॅरेथॉन स्पर्धेत आंतरराष्ट्रीय धावपटू क्रांती साळवी यांचा सहभाग

जळगावची जान्हवी रोझोदे प्रथम, आश्विनी काटोले द्वितीय, तर आश्विनी मोरे तृतीय

अमळनेर प्रतिनिधी: राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद यांची जयंती अर्थात युवा दिनानिमित्ताने आज शुक्रवार, १२ जानेवारी रोजी सकाळी ९.०० वाजता देशातील क्रमांक एकची पत्रकार संघटना व्हॉईस ऑफ मीडिया व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला खुली मॅरेथॉन स्पर्धेत आंतरराष्ट्रीय धावपटू क्रांती साळवी (शिंदे) यांनी सहभाग नोंदवून स्वतः धावत स्पर्धकांना प्रेरित केले.

शहरातील महाराणा प्रताप चौक ते धुळे रस्त्यावरील नूतन प्रवेशद्वार व तेथून परत महाराणा प्रताप चौक या सुमारे चार किलोमीटर अंतराच्या या स्पर्धेत जळगावच्या जान्हवी संजय रोझोदे ही प्रथम, आश्विनी नामदेव काटोले – द्वितीय, आश्विनी सुनील मोरे – तृतीय, अमळनेरच्या ज्योती बापू महाजन चतुर्थ, तर गडखांब (ता. अमळनेर) येथील मंजुषा संतोष पाटील – पाचवी विजेती ठरली. विजेत्यांना अनुक्रमे रोख पाच हजार, तीन हजार, एक हजार, सातशे व पाचशे रुपये पारितोषिकासह सन्मानपत्र देण्यात आले. या स्पर्धेस मुली व महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत अमळनेरसह जळगाव, धुळे, नंदुरबारसह विविध ठिकाणचे स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेचे मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर प्रायोजक होते.

व्हॉईस ऑफ मीडियाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष तथा मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष जयंतलाल वानखेडे, व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष अजय भामरे यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले. सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर अमळनेरसह खानदेशातील नवोदित स्पर्धक मुली व महिलांना प्रेरक आणि आदर्शवत ठरणाऱ्या या स्पर्धेचे आंतरराष्ट्रीय धावपटू व गीनिज बुक ऑफ दी वर्ल्ड रेकॉर्ड धारक असलेल्या क्रांती साळवी (शिंदे) यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन झाले. याप्रसंगी शहरातील प्रतिष्ठित महिला पदाधिकाऱ्यांनी काही अंतर धावून स्पर्धेला सुरूवात झाली. माजी आमदार स्मिता वाघ, डॉ. अपर्णा मुठे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील, अॅड. ललिता पाटील, प्रा. रंजना देशमुख, आदित्य भारद्वाज, आनंद पवार, वैशाली पाटील, दीपिका सोनवणे, गीतांजली घोरपडे, योगीता गुजर, पूनम पाटील, शीतल देशमुख, आदींसह मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेच्या सुरूवातील राष्ट्रीय पंच क्रीडाशिक्षक मिलिंद पाटील यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन करताना सूचना व नियम समजावून सांगितले. स्पर्धेवेळी अमळनेर पोलीस प्रशासन विभागाची वाहतूक शाखा, ग्रामीण रुग्णालय, अमळनेर नगरपरिषद यांचे बहुमोल सहकार्य लाभले. स्पर्धकांसाठी थंड पाणी व शक्तीवर्धक गोळ्यांची व्यवस्था मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आली होती. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा बघ्यांची गर्दी झाली होती. विजेत्यांसह सर्व सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

स्पर्धा यशस्वितेसाठी दोन्ही पत्रकार संघटनांचे उमेश धनराळे, रवींद्र मोरे, उमेश काटे, जयेश काटे, उमाकांत ठाकूर, बापूराव ठाकरे, गौतम बिऱ्हाडे, जितेंद्र पाटील, ईश्वर महाजन, सुखदेव ठाकूर, आत्माराम अहिरे, दिनेश नाईक, मधुसूदन विसावे, कमलेश वानखेडे, हितेंद्र बडगुजर, संजय सूर्यवंशी, यदूवीर पाटील,डी. आर. कन्या शाळेचे उपशिक्षक विनोद कदम, दिनेश पालवे, जे. व्ही. बाविस्कर तसेच मंगळग्रह सेवा संस्थेचे सेवेकरी यांनी परिश्रम घेतले. मंगल सिक्युरिटी सर्व्हिसेसच्या सुरक्षारक्षकांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *