1 min read

२४ डिसेंबर “राष्ट्रीय ग्राहक दिन” विविध कार्यक्रमांनी साजरा करावा.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची जिल्हा प्रशासनाकडे मागणी.

Loading

२४ डिसेंबर “राष्ट्रीय ग्राहक दिन” विविध कार्यक्रमांनी साजरा करावा.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची जिल्हा प्रशासनाकडे मागणी.
जळगाव प्रतिनिधी
दिनांक २४ डिसेंबर हा दिवस “राष्ट्रीय ग्राहक दिन” म्हणून साजरा केला जातो. २४ डिसेंबर, १९८६ रोजी ग्राहक संरक्षण कायदा पास झाला, तेव्हापासून संपूर्ण भारतभर शासकीय, निमशासकीय पातळीवर, शैक्षणिक संस्था व ग्राहक चळवळ संबंधित संस्था राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करतात.
भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी व ग्राहक कल्याण उच्चाधिकार समितीचे भूतपूर्व मंत्रिस्तरीय अध्यक्ष ग्राहकतीर्थ स्व.बिंदुमाधव जोशी यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शक तत्त्वांवर कार्यरत असलेली “ग्राहक पंचायत महाराष्ट्र” ही संस्था ग्राहक जागृतीचे पवित्र कार्य करीत आहे. मागील बारा वर्षात महाराष्ट्रातील अनेक जिल्हे व तालुक्यांमध्ये विस्तारलेली ही चळवळ निरलस, निरपेक्ष व समाजशरण वृत्तीने कार्यरत असणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी आपल्या खांद्यावर उचलून धरली आहे. ग्राहक संघटन, ग्राहक प्रबोधन, ग्राहकांच्या अडचणीवर मार्गदर्शन आणि प्रशासनाला सहकार्य करीत शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे कार्यकर्ते विभाग, जिल्हा आणि तालुका पातळीवर कार्य करीत आहेत. संवाद समन्वयात ग्राहक कल्याण आणि प्रशासनाचा सहकारी म्हणून संस्था कार्य करीत आहे.
दि.२४ डिसेंबर हा “राष्ट्रीय ग्राहक दिन” आणि दि.२४ ते ३० डिसेंबर हा ग्राहक सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. दि.२४ रोजी रविवार आणि दि.२५ रोजी नाताळची सुट्टी असल्याने
दि.२६ ते ३० डिसेंबर या कालावधीत राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात यावा अशी विनंतीवजा मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर विभाग, लातूर जिल्हा शाखेने मा. जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे प्रत्यक्षात एका निवेदनाद्वारे लेखी व तोंडी तसेच ई-मेल, मेलद्वारे शासननियुक्त अशासकीय सदस्य ग्राहक संरक्षण परिषद तथा लातूर जिल्हा संघटक ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी केली आहे. यांच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष ग्राहक संरक्षण परिषद, जिल्हापुरवठा अधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद, जिल्हाशिक्षणधिकारी, जिल्हा कृषीअधिक्षक, कृषीविकास अधिकारी, अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता महावितरण, उपनियंत्रक वैध मापन शास्त्र, अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, प्रादेशिक परिवहन अधिकारी, सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार, सर्व गटशिक्षणधिकारी, सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक महाविद्यालय, कॉलेज, शाळा, लॉ कॉलेज, पदवीधर कॉलेजच्या प्राचार्य, मुख्यद्यापक कडे केली आहे.
जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने साजरा केला जातो आणि तालुकास्तरावर तहसील कार्यालयामध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो. काही तहसिल कार्यालयामध्ये आपल्या सोईने आणि औपचारिकता म्हणून साजरा केला जातो. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्याची सूचना देण्यात यावी. अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या सर्वसामान्य ग्राहक राजाला जागृत करण्यासाठी शासकीय पातळीवर हा दिवस एक “राष्ट्रीय उत्सव” म्हणून साजरा झाला पाहिजे. याकामी ग्राहकाला केंद्रबिंदू मानून काम करीत असलेल्या “ग्राहक पंचायत महाराष्ट्र” या संस्थेचे जिल्हा व तालुका शाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या प्रशासनाला सहकार्य करीत असतात. ग्राहकांशी संबंधित विविध क्षेत्रातील आस्थापना प्रमुखांना आमंत्रित करून हा दिवस साजरा करण्यात यावा, जेणेकरुन ग्राहक संरक्षण कायद्याचा खरा उद्देश सफल होण्यास मदत होईल, अशी विनंती ग्राहक पंचायत महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर विभाग, लातूर जिल्हा शाखेच्यावतीने संस्थेचे विभागीय अध्यक्ष सतीश माने, विभाग संघटक प्रा.हेंमत वडणे, जिल्हाध्यक्ष डॉ.प्रल्हाद तिवारी, लातूर जिल्हासंघटक बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, लातूर, रेणापूर, औसा, निलंगा, देवणी, उदगीर, जळकोट, अहमदपूर, चाकूर, शिरूरआनंतपाल शाखाध्यक्ष, तालुकाअध्यक्ष, तालुकासंघटक यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *