खाजगी शाळांच्या विनाअनुदानाचा कलंक राज्य सरकारने पुसून टाकावा – ज्ञानदेव हांडे
![]()


खाजगी शाळांच्या विनाअनुदानाचा कलंक राज्य सरकारने पुसून टाकावा – ज्ञानदेव हांडे
मुंबई | प्रतिनिधी : राज्यातील अंशतः अनुदानित प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांवर काम करणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 15 नोव्हेंबर 2011 व 4 जून 2014 च्या शासन निर्णयानुसार नैसर्गिक टप्पा वाढ सूत्र लागू करून शंभर टक्के अनुदान देणे क्रमप्राप्त असताना राज्य सरकारने तत्कालीन परिस्थितीत अनुदान टप्पा दिला नाही. त्यामुळे 2001 पासून विनावेतन ज्ञानदान करणाऱ्या 62 हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शंभर टक्के अनुदानास पात्र असूनही सरसकट 20 टक्के अनुदान देवून शिक्षक शिक्षकेतरांवर अन्याय झाला. म्हणून शंभर टक्के अनुदानाच्या मागणीसाठी 30 ऑक्टोबर पासून बेमुदत आंदोलन सुरू आहे. आझाद मैदानावर ऐन दिवाळी सणाच्या काळात राज्यातील सर्व संघटनांच्या शिक्षक समन्वय संघाकडून काळी दिवाळी साजरी केली जाणार आहे. यामध्ये राज्यातील बहुतांशी शिक्षक संघटनाही सहभागी आहेत. राज्य सरकारने शंभर टक्के अनुदान देऊन विना अनुदानाचा कलंक पुसून टाकावा असे मत महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे ज्ञानदेव हांडे यांनी व्यक्त केले. तसेच सक्रिय पाठिंबाचे पत्र देताना संघटनेचे राज्य सहसचिव भानुदास शिंदे व मुंबई सचिव दत्तात्रय शंकर यासंह अनेक शिक्षक उपस्थित होते.

