कमी निकालास शिक्षक- मुख्याध्यापक जबाबदार नाहीत,मुंबई महापालिकेच्या मुख्याध्यापक-शिक्षकांचे मेमो मागे घ्या-अनिल बोरनारे
![]()

कमी निकालास शिक्षक- मुख्याध्यापक जबाबदार नाहीत,मुंबई महापालिकेच्या मुख्याध्यापक-शिक्षकांचे मेमो मागे घ्या-अनिल बोरनारे
मुंबई:ठाणे (मनिलाल शिंपी) प्रत्येक मुलांची शिकण्याची क्षमता ही भिन्न असून वेगवेगळ्या कुवतीच्या विद्यार्थ्यांना शिक्षक मेहनतीने घडवीत असतात. शिकणे ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असल्याने एखाद्या वर्षी कमी निकाल लागला तर मुख्याध्यापक व शिक्षकांना जबाबदार धरू नका तसेच त्यांना दिलेले मेमो तातडीने मागे घ्या अशी मागणी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य व मुंबई मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे.
दहावी बोर्डाच्या परीक्षेत ८५ टक्क्यांहून कमी निकाल लागलेल्या शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांना मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने १९ ऑक्टोबर रोजी मेमो पाठवून दोन दिवसात खुलासा मागितला आहे खुलासा न पाठविल्यास कारवाई करण्याची धमकी या पत्रात दिली आहे
वास्तविक पाहता प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र च्या शासन निर्णयात गुणवत्ता मिळविणे ही दीर्घकाळ ची बाब आहे असे म्हटले आहे कारवाई करणे ही क्षणिक बाब असल्याने दोन्हींचा संबंध लावता येणार नाही असं म्हटलं आहे. कारवाई न करता शिक्षकांना प्रेरित करण्याची गरज असल्याचेही म्हटले आहे. अशा कारवाई मुळे शिक्षक हा नैराशेच्या गर्तेत सापडेल व अध्ययन अध्यापन प्रभावी होण्यात अडथळे निर्माण होतील त्यामुळे मुंबई मनपा ने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी अनिल बोरनारे यांनी केली आहे
दिवसेंदिवस शिक्षकांवरील अशैक्षणिक कामे वाढत असून त्याचाही परिणाम शिकविण्यावर होत असून अध्यापनाच्या व्यतिरिक्त अन्य कामे शिक्षकांना देण्यात येऊ नये अशीही मागणी शिक्षण वर्तुळातून होत आहे.

