निरपेक्ष भावनेतून तटस्थपणे लिहिलेली कलाकृती सर्वोत्तम असते –साहित्यिक राजू बाविस्कर
![]()

निरपेक्ष भावनेतून तटस्थपणे लिहिलेली कलाकृती सर्वोत्तम असते : साहित्यिक राजू बाविस्कर
[ डॉ.कलाम पुस्तक भिशीच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त सत्कार ]
निरपेक्ष भावनेतून तटस्थपणे लिहिलेली कलाकृती सर्वोत्तम असते असे मार्मिक प्रतिपादन साहित्यिक तथा चित्रकार राजू बाविस्कर यांनी केले.
भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव चा तृतीय वर्धापन दिन व वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने केलेल्या सत्काराप्रसंगी मनोगत व्यक्त करताना बाविस्कर बोलत होते.अध्यक्षस्थानी निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर असून प्रमुख अतिथीह.भ.प.मनोहर खोंडे,कमलताई पाटील,सौ.भारती बाविस्कर उपस्थित होते.
प्रारंभी डॉ.कलाम व बाविस्करांच्या बा व मायच्या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण तसेच डॉ.कलाम लिखित ग्रंथांचे विशेष प्रतिभा पुजन करण्यात आले.
राजू बाविस्कर यांच्या ‘ काळ्या निळ्या रेषा ‘आत्मकथनाचा अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयात एम.ए प्रथम वर्ष मराठीच्या मराठी आत्मकथने अभ्यासक्रमात समावेश झाल्याच्या सन्मानार्थ डॉ.कलाम पुस्तक भिशीतर्फे सिद्धार्थ नेतकर यांच्या हस्ते बाविस्करांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.महात्मा जोतिबा फुले स्थापित सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला दीडशे वर्ष पूर्ण झाल्या निमित्त ग्रंथप्रेमी विजय लुल्हे यांच्या हस्ते महात्मा फुले लिखित वाङ्मयाची अकरा पुस्तके व कपडे देऊन राजू बाविस्कर यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.बाविस्कर यांच्या धर्मपत्नी सौ.भारती बाविस्कर यांना शाल,श्रीफळ व साडी देऊन श्रीमती कमलताई पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.लंडन बुक ऑफ रेकॉर्डने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भाकरीवर विश्वात प्रथम चित्र काढणारे चित्रकार सुनील दाभाडे यांना सन्मानित केल्याबद्दल किर्तनकार मनोहर खोंडे यांच्या हस्ते दाभाडे यांचा शाल,श्रीफळ व श्यामची आई पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
गौरवपर भाषणात खोंडे यांनी कलावंताची साधना व धर्मपत्नीने सहजीवनात भरलेले प्रेमरंग याचे गुपीत उलगडले.भिशीचे संस्थापक जिल्हाप्रमुख विजय लुल्हे गौरवपर भाषणात म्हणाले की,’ दीनदलितांच्या व अन्याय पिडीत,शोषित, उपेक्षितांच्या संघर्षात जीवन मूल्यांची बिजं असतात.शोषितांची स्पंदने टिपायला संस्कार व निर्लेप तरल संवेदनशीलतेचे अंतःचक्षू कलावंताला असले की ‘ काळ्या निळ्या रेषा ‘ सारखे अभिजात आत्मचरित्र लेखन वारसा नसतांनाही साहित्य प्रांगणात साहित्यिकांच्या व साक्षेपी समिक्षकांना झपाटून टाकते! बाविस्करांनी आत्मचरीत्राचा अतुलनीय लेखनाभिव्यक्तीचा मानदंड निर्माण केल्याने आत्मचरित्राला समिक्षेच्या मूल्यमापनाची पारंपारीक परिमाणं निष्प्रभ ठरताहेत !
जन्मदात्री देवकाईने दिलेले त्याग व सेवेचे बाळकडू आणि पिताश्रीं न्हानूजींनी दिलेला तत्वनिष्ठ जीवन संघर्षाचा मुलमंत्र ही दाभाडे यांच्या कलेची अक्षय
उर्जाशक्ती आहे.’
सत्कारार्थींच्या मनोगतातील प्रेरणादायी विचार शलाका
साहित्यिक राजू बाविस्कर : – ‘ माझे शालेय गुरु,मित्रपरिवार व परिसराने मला अंतर्मुख व चिंतनशील कलावंत केले.भारतरत्न डॉ.बाबासाहेब यांच्या जीवनसंघर्षाने मला दिव्यदृष्टी दिली.युगवाणीचे साक्षेपी गुणग्राही संपादक प्रफुल्ल शिलेदार व प्रख्यात साहित्यिक राजन गवस,अशोक कोतवाल, परिवर्तनचे रंगकर्मी शंभू पाटील व हर्षल पाटील यांनी माझ्यातला लेखक जागृत करून लेखनासाठी प्रेरणा दिली.हक्काने अखंड पाठपुरावा अन् पाठराखण केल्याने माझे यश मी त्यांना कृतज्ञतापूर्वक समर्पित करतो.’
चित्रकार सुनील दाभाडे : – डॉ.बाबासाहेबांची तत्वशील संघर्षमयी जीवनप्रणाली मला सदैव कला निर्मिती व समाजसेवेची प्रेरणा देते.
अध्यक्षीय मार्गदर्शनात सिद्धार्थ नेतकर म्हणाले की,’ तथागत गौतम बुद्धांच्या अष्टांगमार्गाच्या तत्त्वज्ञानाचा परिसस्पर्श व डॉ.बाबासाहेब यांच्या जीवनमूल्यांनी राजू बाविस्कर यांच्या आत्मचरित्रातील पात्रे प्रेरणादायी आहेत.
कार्यक्रमास भिशी सदस्य महेश शिंपी,सुदाम बडगुजर,राजकुमार गवळी यांचेसह अन्य सदस्यांसह सुनील कोतकर,टोनी कोतकर उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना,सुत्रसंचालन महेश शिंपी सरांनी केले.

