1 min read

पाकिस्तानी प्रसारमाध्यमात कोहली – राहुलवर स्तुतिसुमनांचा वर्षाव !

Loading

पाकिस्तानी प्रसारमाध्यमात कोहली – राहुलवर स्तुतिसुमनांचा वर्षाव !

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या तेराव्या संस्करणात पाच वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला यजमान भारताने बिकट परिस्थितीतून सावरत लिलया पराभूत केले आणि या विजयाचे शिल्पकार होते केएल राहुल आणि विराट कोहली. विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या व अवघड स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला सारख्या तगड्या संघाला हरविणे येड्यागबाळ्याचं काम नाही. पण ते टिम इंडियाने अतिशय खराब सुरूवातीनंतर नऊ षटके व सहा गडी पूर्ण केले आणि संपूर्ण भारतात एकच जल्लोष करण्यात आला. भारतातील प्रसारमाध्यमात या गोष्टीचं कौतुक होणं वाजवी होतं व ते व्हायलाही पाहिजे. अगदी अपेक्षा पेक्षाही चांगलं ते झालंच. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर भारताने तीन फिरकी गोलंदाज खेळवून योग्य निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्मा व संघ प्रबंधानाचा हा निर्णय फिरकी गोलंदाजांनी सार्थ ठरविला. त्याबरोबरच तीनही वेगवान गोलंदाजांनी आपली जबाबदारी ईमाने इतबारे पार पाडली व त्यांना क्षेत्ररक्षकानींही योग्य साथ दिल्याने विजेतेपदाची जोरदार दावेदारी घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांची भंबेरी उडाली. कांगारू फलंदाज पूर्ण पन्नास षटकेही खेळू शकले नाहीत. तसेच दोनशे धावांचा भोजाही पार पाडता आला नाही. तेंव्हा भारत एक सहजसुंदर विजय मिळवेल असे समस्त क्रिकेट पंडित व रसिकांना वाटत होते. पण साधी गोष्ट सहज मिळवतील ते भारतीय फलंदाज कसले ? भारताचा डाव सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या क्षमतेची सर्वांनाच जाणीव होती. मात्र ऑस्ट्रेलियन गोलंदाज एवढी सनसनाटी सुरूवात करून देतील असे कुणालाच वाटले नव्हते. भारताचे ईशान किशन, रोहित शर्मा व श्रेयस अय्यर प्रत्येकी शुन्यावर बाद झाले तेंव्हा भारताच्या धावा होत्या अवघ्या दोन ! या तिघांपैकी रोहित शर्माला हेजलवूडचा चेंडू अफलातून होता. त्यामुळे रोहितच्या पायचित होण्याचे फारसे दुःख कोणालाच झाले नाही. मात्र ईशान व श्रेयस अय्यर यांचे बाद होणे एखाद्या आत्महत्येपेक्षा कमी नव्हते. ईशानचे शॉट सिलेक्शन चुकले. तर श्रेयस अय्यरला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आलेच नाही. नेहमी प्रमाणे पुढ्यात क्षेत्ररक्षक दिसत असतानाही त्याच्या हातात झेल देऊन मोकळा झाला. आशिया चषकात पाक विरूध्द साखळीत चांगल्या सुरुवातीनंतर फखर झमानला असाच लॉलीपॉप देऊन संघाला ४ बाद ६६ असे संघाला अडचणीत सोडून निघून गेला होता. पुढे भारतात ऑस्ट्रेलिया विरुद्ध एका पाटा खेळपट्टीवर शतक ठोकून त्याने विश्वचषक खेळण्याची दावेदारी केली होती. त्यामुळेच तो हा सामना खेळला. मात्र फलंदाजांना आव्हान देणाऱ्या खेळपट्टीवर त्याचे पितळ उघडे पडते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. तीन बाद दोन अशा परिस्थितीत लोकेश राहुल व विराट कोहली जोडी एकत्र आली. त्यानंतर त्यांनी खेळपट्टी व परिस्थितीचा अभ्यास करून डाव उभा करण्यास सुरुवात केली. दरम्यान कोहलीला एक जिवदान मिळाले. त्याचा त्याने अचूक लाभ उठवत भारताला विजयीपथापर्यंत नेऊन ठेवले. कोहली शतकापासून वंचित राहिल्याने प्रत्येकाला वाईट वाटले. कोहली पेक्षा राहुलचा खेळ जास्त निर्दोष होता. विजयी फटका मारताना धावांचं गणित जुळवता न आल्याने त्याला शतकापासून वंचित राहावं लागलं. परंतु भारताच्या विजयाने त्याच्या त्या दुःखाचे निवारणही झाले. भारताचा हा शानदार विजय व कोहली - राहुलची शिस्तबद्ध खेळी जगभरातील सर्वच क्रिकेटरसिक, तज्ञ व माजी खेळाडूंना मंत्रमुग्ध करून गेली. सामन्यानंतर जिथे जावं तिथं या दोघांच्या खेळाचे तोंड भरून कौतुक होते. यामध्ये भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानही अपवाद नव्हता. पाकिस्तानातील सर्वसामान्य क्रिकेटप्रेमी, माजी खेळाडू, प्रसारमाध्यमे, सोशल मिडीया कोहली -राहुलच्या खेळाचे कौतुक करताना थकत नव्हते. पाकिस्तानच्या अनेक माजी खेळाडूंचे युट्यूब चॅनेल्स आहेत. त्यामध्ये माजी कर्णधार रमिज राज, सलमान बट, रशिद लतिफ , यष्टीरक्षक कामरान अकमल, वेगवान गोलंदाज शोएब अख्तर, फिरकीपटू सईद अजमल, दानिश कनेरीया, प्रसिद्ध पत्रकार मोहसिन अली -रिजवान हैदर, वासी हबीब, सवेरा पाशा हे तर भारतावर स्तुतीसुमनांचा वर्षावच करत होते. टेन स्पोर्टस चॅनेलवर माजी कर्णधार वासिम अक्रम, शोएब मलिक, मिसबाह उल , मोहम्मद युसुफ तर ''समा टिव्ही '' वर शाहिद आफ्रिदी, मोहम्मद युसुफ, मुश्ताक अहमद, महिला टिमची माजी कर्णधार निदा डर, महिला पत्रकार सवेरा पाशा यांनी तर भारताची वारेमाप स्तुती केली. भारताविरुद्ध सातत्याने वादग्रस्त विधानं करणारा शाहिद आफ्रिदीही भारतीय संघ व खेळाडूंच्या कामगिरीचं तोंडभरून कौतुक करताना दिसला. इतकंच नाही तर कोहलीची मोठी फॅन असणारी निदा डरने तर

‘ कोहली खेळत असताना त्याचा खेळ बघतच राहावा’ असे धाडसी विधान केले, तेंव्हा स्टुडिओमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्वांनीच डोळे विस्फारून बघितले.
भारताने बलाढ्य ऑस्स्ट्रेलियाला धुळ चारल्याने १४ ऑक्टोबरला अहमदाबाद मध्ये पाकिस्तान विरूद्ध लढत होत आहे. त्यामध्ये भारताचेच पारडे जड राहिल व भारतच बाजी मारणार या कल्पनेनेच पाकचे माजी खेळाडू व प्रसार माध्यमे चिंताग्रस्त बनले आहे. आधीच वनडे विश्वचषकात भारताचे पाकविरूद्ध ७-० असे वर्चस्व व टिम इंडियाला खतरनाक फॉर्मात बघून आता संपूर्ण पाकिस्तानलाच भारताचा सलग आठवा विजय खुणावत आहे.
येथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ही क्रिकेट या दोन देशातील दरी दूर करू शकते. मात्र दोन्ही देशांच्या राज्यकर्त्यांनी त्यावर सखोल विचार करण्याची गरज आहे. मात्र त्यासाठी पाकने आधी भारताविरूध्द सिमेपलिकडून होणारे छुपे कारस्थाने थांबवावे. तसेच भारताविरूध्दच्या बेताल वक्तव्यांना लगाम घालावा. असं जर झाले तर दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यास वेळ लागणार नाही आणि असे झाले तर भारतापेक्षा पाकिस्तानच जास्त फायद्यात राहिल.

लेखक -.
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *