1 min read

नागपूर येथील पत्रकार कृष्णा मस्के यांच्यावरील हल्ल्याचा अ.भा.मराठी पत्रकार परिषदेसह पत्रसृष्टीतून तीव्र निषेध

Loading

नागपूर येथील पत्रकार कृष्णा मस्के यांच्यावरील हल्ल्याचा अ.भा.मराठी पत्रकार परिषदेसह पत्रसृष्टीतून तीव्र निषेध

हल्लेखोरांच्या मुसक्या बांधा- एस.एम.देशमुख

मुंबई- शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या प्रसिद्ध झालेल्या बातमीचा राग येऊन नागपूर येथील पत्रकार कृष्णा मस्के यांच्यावर तीन अज्ञात युवकांनी हल्ला केला असून या हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या बांधून त्वरीत अटक करावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केली आहे. पत्रकारांवर वाढते हल्ले ही चिंतेची बाब असून पत्रकार संरक्षण कायदा कुचकामी ठरत असल्याचे हे द्योतक आहे. शासनाच्या निष्क्रियतेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत असून पत्रकारांना रस्त्यावर उतरण्याची पाळी येऊ देऊ नये असा इशाराही एसेम देशमुख यांनी दिला.

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने काढलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, नागपुरातील पत्रकार कृष्णा मस्के यांच्यावर सोमवारी रात्री 12 वाजता तीन अज्ञात युवकांनी हल्ला केल्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे. या हल्ल्यात पत्रकार कृष्णा मस्के थोडक्यात बचावले. या प्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून डीसीपी झोन 4 नेही गंभीर दखल घेतली आहे. हल्लेखोरांच्या तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. पूर्व नागपुरातील वाठोडा येथे 14 सप्टेंबर रोजी “शासन आपल्या दारी” कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . या शिबिराला स्थानिक पदाधिकाऱ्याचे सहकार्य होते असे मस्के यांनी बातमीत म्हटले होते.. शिबिरात दलालांचा सुळसुळाट असल्याची बातमीही कृष्णा मस्के यांनी त्यांच्या वेबपोर्टलवर लावली होती. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या नंतर पूर्व नागपुरात वाठोडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून मस्के यांना अटक करण्याची मागणी केली गेली होती.. त्यानंतर त्यांना पदाधिकाऱ्यांतर्फे धमक्या येऊ लागल्या. त्या संदर्भात नंदनवन पोलिस ठाण्यात पत्रकार कृष्णा मस्के यांचा समर्थनार्थ सामाजिक संघटनानी धमक्या देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून संरक्षण देण्याची मागणीही करण्यात आली होती. परंतु काल रात्री अचानक त्यांच्यावर भर चौकात रात्री हल्ला करण्यात आला. यातून ते थोडक्यात बचावले.अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, डिजिटल मिडिया परिषदेने हल्ल्याचा निषेध केला असून हल्लेखोराना तातडीने अटक करावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलींद अष्टीवकर, सरचिटणीस हाजी मन्सुरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, डिजीटल मिडियाचे अध्यक्ष अनिल वाघमारे, महिला आघाडीच्या जान्हवी पाटील, शोभा जयपुरकर आदींनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *