1 min read

गाईला आई मानणाऱ्या मातृहृदयी समाजाने मरण यातना भोगणाऱ्या गाईंकडे लक्ष द्यावे-ज्येष्ठ पत्रकार गो.पि. लांडगे यांचे आवाहन

Loading

गाईला आई मानणाऱ्या मातृहृदयी समाजानेमरणयातना भोगणाऱ्या गाईंकडे लक्ष द्यावे-ज्येष्ठ पत्रकार गो.पि. लांडगे यांचे आवाहन

धुळे- शेतीत राबणारी बैलं आणि दुधदुभती जनावरं लम्पी आजाराने ग्रस्त असल्याने शेतकरी समाज त्रस्त झाला आहे. अशातच विचित्र अशा ‘खूर’ आजाराने ग्रस्त गाई काही परिसरात दिसू लागल्या आहेत. विशेषत: साक्री रोडवरील विद्यावर्धिनी परिसरातील मित्रकुंज, मलेरिया ऑफीस, कृषी नगर, साईकृपा, सुंदरच कॉलनी, सप्तश्रृंगी, महावीर कॉलनी, अजबे नगर, बाहुबली नगर, जनरल अरुणकुमार वैद्यनगर, सुरभी कॉलनी, आदी परिसरात या गाई आढळून येत आहेत. पालकांच्या अवकृपेमुळे या गाईंची खुरं वेळोवेळी काढली गेल्या नसल्यामुळे चालतांना ही खुरं अगदी तळपायात घुसुन जखमा होत आहेत. निष्काळजी गोपालकांमुळे या जनावरांना पोटाची खळगी भरण्यासाठी दारोदारी भटकंती करावी लागते. काही मायमाऊल्या दारी येणाऱ्या या गायमाऊलीस खाऊ घालतात, तर काही या खूरेवर काही औषध टाकता येईल का? म्हणून प्रयत्नशीलही असतात. परंतु आता त्या जनावरांच्या खुरांकडे पाहतांनाही हृदय असलेल्या माणसांचे डोळे पाणावतात. ‘दुभत्या गाईंच्या लाथा गोड’ असतात म्हणे. परंतु या गाईंना लाथा उचलणेही अवघड होऊन गेले आहे. गोपालकांचे केवळ या गाईंशी दुधापुरतेच नाते आहे काय? असाही प्रश्न निर्माण होतो. आता या गाईच्या खुरा जवळ मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरु झाला आहे. जखम खोलवर गेली आहे. पावसाचे दिवस असल्याने त्यांना एक पाऊल पुढे टाकणे अवघड होत आहे. काहींचे पाय सडले, जंत पडले आहेत. जखमेवर माशांनी ताबा मिळविला आहे. जखमेचा वास असह्य झाला आहे. त्यामुळे दारात येणाऱ्या या गाईंना सणासुदीच्या नैवद्याऐवजी ‘लाठी’चा प्रसाद मिळू लागला आहे. या गाईच्या मरणयातना पाहणे असह्य झाल्याने एस.एस.व्ही.पी.एस. इंजिनिअरींग पॉलिटेक्नीक कॉलेजचे प्राध्यापक प्रशांत बन्सीलाल चव्हाण, मोराणे (प्र.ल.) (9975639156) येथील रहिवाशी व साईकृपा सोसायटीत स्थायिक असलेले (माझे मित्र बन्सीलाल महाराज पाटील यांचे सुपुत्र) या कोमल हृदयी तरुण मित्राने मला या गाईंचे नुसते फोटो पाठवून न थांबता या गायींसाठी परिसरातील जनतेने पुढे यावे, लोकवर्गणी जमा करावी व त्यात मी स्वत:चा आर्थिक भार उचलण्याची व पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आहे. मला प्रा. प्रशांत चव्हाण यांचे कौतुक वाटले. अशी दृष्टी असलेल्या दोन-चार तरुणांची त्यांना साथ मिळाली तर नक्कीच या जनावरांचा प्रश्न मार्गी लागेल. गायीच्या पोटात 33 कोटी देव असतात असं समाज मानतो. मग तेहतीस कोटी देवांचा वास असलेल्या गाईंना मरणयातनेतून गाईला माता मानणाऱ्या मातृहृदयी समाजही मागे न राहता उक्ती आणि कृतीची सांगड घातल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास ज्येष्ठ पत्रकार गो.पि. लांडगे यांनी व्यक्त केले आहे.

आपल्या शहरात कुत्री, मांजरी, गुरे-ढोरे अशा मुक्या जनावरांवर निर्व्याज प्रेम करणाऱ्यांची संख्या कमी नाही. शहराच्या मध्यभागी (मालक असूनही बिन मालकाचे) मोकाट फिरणाऱ्या धष्ट-पुष्ट जनावरांना खाऊ घालाच पण या व्याधीग्रस्त बेवारस जनावरांचा शोध घेऊन त्यांना गुरांच्या दवाखान्यापर्यंत पोहचविण्याची व्यवस्था करावी म्हणजे एका कोपऱ्यात असलेल्या जनावरांच्या दवाखान्यातील गुरांच्या डॉक्टरांच्या हातालाही काम मिळेल आणि सेवेचेही पुण्य मिळेल. शहरातील चॅरिटेबल ट्रस्ट, गोशाळा, आणि विघ्नहर्ता गणरायाच्या उत्सवात मनोभावे दंग असणाऱ्या भाविकांनी मनावर घेतले तर या गाईही आजारातून विघ्नमुक्त होणे अशक्य नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *