माजी मंत्री विजय नवल पाटलांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट
![]()
माजी मंत्री विजय नवल पाटलांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट
अमळनेर प्रतिनिधी- तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या काळात अपारंपरिक ऊर्जा खात्याचा मंत्री म्हणून काम केले. निसर्ग ऊर्जा चे महत्व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी माझे काम आजही सुरू आहे. आता तर निसर्ग ऊर्जा ही आजच्या काळाची गरज बनली आहे, असे मत माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी व्यक्त केले. शुक्रवारी (ता.15) जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी झालेल्या सदिच्छा भेटी प्रसंगी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यात रुजू झाल्यानंतर सौर ऊर्जा अर्थात निसर्ग ऊर्जा यावर मोठया प्रमाणात काम सुरू केले. याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री पाटील यांनी श्री प्रसाद यांची भेट घेतली. सुरुवातीला त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी निसर्ग ऊर्जा (सौर ऊर्जा) या संदर्भात चर्चा केली व आजच्या काळात निसर्ग ऊर्जा याचे महत्त्व विषद करताना जिल्हाधिकारी श्री प्रसाद यांनी माजी मंत्री पाटील यांचे योगदानाबद्दल आभार मानले, तसेच पुढील काळात निसर्ग ऊर्जा तंत्रज्ञान संदर्भात सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. माजी मंत्री पाटील यांनी ही छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समितीच्या (नवी दिल्ली) माध्यमातून महाराष्ट्र सह मध्य प्रदेश, गुजरात यासारख्या राज्यात निसर्ग ऊर्जेवर विविध उपक्रम राबविले आहेत. अनेक महिला बचत गटांना सौर ऊर्जेवर चालणाऱ्या चुली भेट देऊन निसर्ग ऊर्जेला प्रोत्साहन दिले आहे. यावेळी नवलभाऊ प्रतिष्ठानचे मानद शिक्षण संचालक प्रा. सुनिल गरुड, पिंपळकोठा हायस्कुलचे मुख्याध्यापक एन.एस.पाटील, जगदीश पाटील, रामलाल पाटील, सुनिल पाटील, दीपक पवार (ममुराबाद) आदी उपस्थित होते.
जळगाव- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा सत्कार करताना माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील. शेजारी प्रा सुनील गरुड, एन एस पाटील आदी.

