1 min read

निवडणूक प्रक्रियेची विद्यार्थिनींनी घेतली प्रत्यक्ष अध्ययन अनुभूती!

Loading

निवडणूक प्रक्रियेची विद्यार्थिनींनी घेतली प्रत्यक्ष अध्ययन अनुभूती!

सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा उपक्रम

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – नियमित अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकातील ज्ञान विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षक हे अध्यापनाचे कार्य करीत असतात, मात्र याच पाठ्यपुस्तकातील ज्ञानाचा व्यवहारिक जीवनाशी सांगड घालून अध्यापन केले तर विद्यार्थ्यांना ते ज्ञान सहज लक्षात येते. याच पार्श्वभूमीवर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकशाही पध्दतीने निवडणूक घेऊन “विद्यार्थी मंत्रिमंडळा”ची निवड करण्यात आली. पर्यायाने विद्यालयातील सर्व विद्यार्थिनींनी निवडणूक प्रक्रियेची प्रत्यक्ष अध्ययन अनुभूती घेतली. या उपक्रमामुळे मतदान जनजागृतीचा संदेश विद्यार्थिनीच्या मनात तर बिंबला तसेच त्यांच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहचला, एवढे मात्र निश्चित!

दहावीत राज्यशास्त्र या विषयातील “निवडणूक प्रक्रिया” या प्रकरणाची प्रत्यक्ष अध्ययन अनुभूती विद्यार्थ्यांना व्हावी या दृष्टिकोनातून शाळेत निवडणूक घेण्याचे ठरविण्यात आले. प्राचार्या गायत्री भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यशास्त्र शिक्षक उमेश काटे यांनी पुढाकार घेतला. “विद्यार्थिनी मुख्यमंत्री” पदासाठी पाच उमेदवार, “विद्यार्थिनी शिक्षण मंत्री” पदासाठी दोन, “विद्यार्थिनी अर्थमंत्री” पदासाठी तीन, शिस्त-अनुशासन मंत्री पदासाठी सहा, तर पर्यावरण व स्वच्छता मंत्री पदासाठी पाच असे 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
निवडणूक प्रचारात जाहीरनामा, मतदानाचा हक्क, मतदान जनजागृती या विषयावर प्रकाशझोत टाकण्यात आला. ज्या पद्धतीने लोकनियुक्त सरपंच, लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडले जातात याच पार्श्वभूमीवर जर “लोकनियुक्त मुख्यमंत्री” निवडला गेला तर…! या नवीन वैचारिक संज्ञाने ही निवडणूक घेण्यात आली. यामुळे योग्य उमेदवाराला योग्य पदापर्यंत यानिमित्ताने पोहोचवता येते. नवीन संदेश या निमित्ताने बिंबवण्यात आला. लोकनियुक्त विद्यार्थीनी मुख्यमंत्री सह इतर मंत्री निवडण्यात आले. विशेष म्हणजे काही विद्यार्थिनींनी NOTA या मतदानाचा नकाराधिकारही बजावला.
मतदान करतांना उमेदवाराच्या शाळेतील विविध उपक्रमातील सहभाग, शैक्षणिक प्रगती व त्यांच्यातील नेतृत्व गुणांचा विचार करून योग्य उमेदवाराला मतदान करण्यात आले. निवडणूकीचे महत्त्व, मतदानाचा हक्क, लोकशाही प्रक्रिया समजावी या उद्देशाने ही आगळी वेगळी निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शाळेच्या प्राचार्या गायत्री भदाणे यांनी तर केंद्राध्यक्ष म्हणून जेष्ठ शिक्षिका कल्पना महंत यांनी काम पाहिले. जी पी हडपे, एन बी खंडारे यांनी मतदान अधिकारी म्हणून काम पाहिले. संपुर्ण निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी उमेश काटे, व्ही सी पाटील, लता पवार, निलिमा पाटील, दिलीप मनुरे व प्रवीण उशीर यांनी सहकार्य केले. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, मार्गदर्शिका शीलाताई पाटील, प्रशासकीय अधिकारी डी बी पाटील, प्रा शाम पवार, शिक्षण मानद संचालक प्रा सुनील गरुड, शिक्षणाधिकारी विकास पाटील, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी पी डी धनगर, शिक्षण विस्तार अधिकारी कविता सुर्वे यांनी कौतुक केले आहे.

चौकट

असे आहे नवीन मंत्रिमंडळ

लोकनियुक्त “विद्यार्थिनी मुख्यमंत्री” म्हणून प्राची पाटील विजयी झाली. विद्यार्थिनी शिक्षण मंत्री म्हणून डिंपल पाटील, विद्यार्थिनी अर्थमंत्री म्हणून कनिष्का पाटील, शिस्त व अनुशासन मंत्री म्हणून प्रतीक्षा पाटील तर पर्यावरण व स्वच्छता मंत्री म्हणून पल्लवी मोरे यांची निवडणुकीच्या माध्यमातून निवड करण्यात आली. विशेष म्हणजे नवीन मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला होता. निवडणुकीनंतर विजयी उमेदवार सह पराभूत उमेदवारांनी जल्लोष करीत खेळाडूवृत्ती चे दर्शन घडविले.

चौकट

विद्यार्थीनी मुख्यमंत्रीच्या हस्ते झाले ध्वजारोहण

नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित रुक्मिणीताई महिला महाविद्यालय, सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच (स्व) राजीव गांधी प्राथमिक विद्यामंदिर परिसरात नवीन “विद्यार्थिनी मुख्यमंत्री” प्राची पाटील हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस जे शेख, विद्यालयाच्या प्राचार्या गायत्री भदाणे, मुख्याध्यापिका मीनाताई सूर्यवंशी, निवृत्त शिक्षक बी जे पाटील, आर एन पाटील, संजय ठाकरे आदी सह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सांस्कृतिक विभाग प्रमुख उमेश काटे यांनी सूत्रसंचालन केले.

कोट

पुढील वर्षी लोकसभा, विधानसभा निवडणुका आहेत. याची पूर्व तयारी म्हणून नवमतदार नोंदणी अभियान ही सुरु आहे. मतदान जनजागृती साठी विविध उपक्रम राबविले जातात. या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले विद्यालयाने घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असून ही विद्यार्थी निवडणूक जनजागृती साठी उपयोगी ठरणार आहे.

महादेव खेडकर

प्रांताधिकारी, अमळनेर विभाग

अमळनेर- मतदान करताना विद्यार्थिनी मतदार

अमळनेर- मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी लागलेली विद्यार्थिनी मतदारांची रांग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *