1 min read

स्व.रंजना जगदाळे यांच्या स्मृतिनिमित्त वाघापूरच्या डॉ.बी.आर.आंबेडकर विद्यालयातील १०० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप!

Loading

स्व.रंजना जगदाळे यांच्या स्मृतिनिमित्त वाघापूरच्या डॉ.बी.आर.आंबेडकर विद्यालयातील १०० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप!

धुळे : निजामपूर-जैताणे (ता.साक्री) येथील स्व.रंजना भगवान जगदाळे यांच्या १४व्या स्मृतिदिनानिमित्त जगदाळे परिवारातर्फे नुकतेच राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्था, धुळे संचलित डॉ.बी.आर.आंबेडकर माध्यमिक विद्यालय, वाघापूर (ता.साक्री) या शाळेतील ५ वी ते १० वीच्या सुमारे १०० गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रा.भगवान जगदाळे, सुशीलकुमार जगदाळे, श्रुती जगदाळे व श्रेयस जगदाळे यांच्या हस्ते संस्कारक्षम पुस्तके, वह्या, पेन आदी शालेय शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. यावेळी चॉकलेट वाटपही झाले.

प्रा.भगवान जगदाळे, श्रुती जगदाळे व श्रेयस जगदाळे आदी प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ.बी.आर.आंबेडकर विद्यालयातर्फे त्यांचा सत्कार झाला. यावेळी प्रा.भगवान जगदाळे यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनीही प्रातिनिधिक मनोगते व्यक्त केली व गीते सादर केलीत. वाचन संस्कृतीची जोपासना व्हावी म्हणून स्व.रंजना जगदाळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना भेट देण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये सामान्यज्ञान, भाषणसंग्रह, निबंधमाला, बोधकथा, शालेय संस्कार गीते, देशभक्तीपर गीते, इंग्रजी व्याकरण, इंग्लिश स्पिकिंग कोर्स, गणितीय नियम व सूत्रे आदी ज्ञानवर्धक पुस्तकांचा समावेश आहे.

राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संजयअण्णा भामरे, सचिव वंदनाताई भामरे, मुख्याध्यापक कमलेश भामरे यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी या सेवाभावी व शालोपयोगी उपक्रमाचे विशेष कौतुक केले. शिक्षक सुशीलकुमार जगदाळे, उमेश बोरकर, जयेश पाटील, देवेंद्र चौधरी, शिक्षकेतर कर्मचारी मनोहर पाटील, प्रशांत बोरसे आदी उपस्थित होते. शिक्षक प्रवीण सूर्यवंशी, कल्पेश पाटील, उमेश मोरे, दीपक भामरे, नीलिमा पाटील, योगेश बागुल आदी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. शिक्षक जयेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले व उपस्थितांचे आभार मानले.

प्रा.जगदाळे यांनी यापूर्वीही आपल्या मुलांच्या वाढदिवसासह अर्धांगिनीच्या स्मृतिनिमित्त विविध अनोखे उपक्रम राबविले आहेत. त्यात शालेय शैक्षणिक साहित्य वाटपासह विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून गितगायन स्पर्धा, शालेय पोषण आहारासाठी फोफादे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मोफत प्लेटवाटप, जैताणे येथील अंगणवाडी केंद्रास महापुरुषांच्या प्रतिमांची भेट, स्मशानभूमीसह जैताणे ग्रामीण रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक व अन्य मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण, कोविडग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आर्थिक मदत, पोलिसांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व मास्कवाटप, फळवाटप, रक्तदान, गुणवंतांचा गुणगौरव, वाचनालयांसह शाळांना शिवचरित्र, फुले समग्र वाङ्मय, संविधान, ग्रामगीता, श्यामची आई आदी प्रकारचे शेकडो अनमोल ग्रंथ आतापर्यंत भेट दिले आहेत. यापुढेही निरंतर असे समाजोपयोगी विधायक व सेवाभावी उपक्रम राबविण्यात येतील असे प्रा.जगदाळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *