निसर्गाचे काळीज मांडणारा कवी :ना.धों. महानोर-प्रा प्रविण दवणे
![]()

निसर्गाचे काळीज मांडणारा कवी :ना.धों. महानोर
- प्रा. प्रवीण दवणे
ज्येष्ठ कवीवर्य ना. धों. महानोर यांच्या कवितांमध्ये जगण्याचा सच्चेपणा होता. ते प्रत्यक्षात जे जीवन जगले ते त्यांनी कवितांमधून मांड लं होतंं. आपल्या समग्र जीवनाचे ते लेखनिक होते. कविता आणि गाणं यांच्या एका अरुप सीमेवर त्यांनी आपल्या कवितांची राहुटी बांधली होती. लोकगीताचं चांदणं वैभव त्यांच्या कवितेत होतं. रानाला असं मानवी व्यक्तिमत्व देणारा कवी हा रानासारखा चिरंतन राहणार आहे. जात्यावरल्या ओव्या असतील, आईच्या भाकरीचा वात्सल्याचा स्पर्श असेल, उसाच्या मळ्यातला गर्दभारला शृंगार असेल, दुष्काळी शेतीतलं आसवांचं काहूर असेल या सर्व भावना कवी महानोरांनी आपल्या कवितेतून व्यक्त केल्या. आज त्या सर्व कविता, गाणी ते ठेवून गेले आहेत.
मी महाविद्यालयीन जीवनात अकरावी-बारावीला असताना पॉप्युलर प्रकाशनाने ‘रानातल्या कविता’ हा ना. धों. महानोरांचा कविता संग्रह प्रकाशित केला होता. कवि ग्रेस यांच्या ‘संध्याकाळच्या कविता’, वसंत सावंत यांची कविता याबरोबरच ‘रानातल्या कविता’ हा अतिशय वेगळा प्रकार होता. या कवितेतील पहिल्या चार ओळींनीच माझ्यातल्या शहरी मनाला पूर्ण रानाचा कवी केलं आणि एका अर्थानं बेधुंद केलं. आज ५० वर्षं उलटूनही माझ्या मनावरचं ते गारुड अजून ओसरलेलं नाही. काय होतं असं त्या कवितेत, असा विचार करताना जाणवतं की महानोर यांच्या त्या कवितांमध्ये जगण्याचा सच्चेपणा होता. ते प्रत्यक्षात जे जीवन जगले ते त्यांनी या कवितांमधून मांडलं होतंं. महानोर हे आपल्या समग्र जीवनाचे लेखनिक होते. तसं पाहिलं तर परसखेडचा निर्सग हा एका अर्थाने दुष्क़ाळी आहे. पण या हाडाच्या शेतकर्याने तशा परिस्थितीतही शेतीत अनेक प्रयोग करून जे काही पीक पिकवलं त्या झाडा-रोपांवर लेकरांसारखी माया केली. याबाबत त्यांनी कवितेत लिहिलं आहे-
गुंतलेले प्राण हे रानात माझे
फाटकीही झोपडी काळीज माझे,
मी असा आनंदुनी बेहोश होता
शब्दगंधे तु मला बाहूत घ्यावे….
या ओळींनी मला विलक्षण भारावून टाकलं. आपल्या कवितेला शब्दगंधा हे आगळंवेगळं मानवी रुप त्यांनी दिलं. जणू काही ही कविता म्हणजे त्यांची सखी, प्रेयसी, आई, बहिण, देवता आहे. ही कविताच अखेरपर्यंत त्यांच्या सोबतीला राहिली.
महानोरांच्या कवितेची लयही वेगळी होती. त्यापूर्वी मी बहिणाबाई चौधरी यांची निसर्ग कविता रक्तात भिनवलेली होती. त्याआधी बालकवींचा निर्सग माझ्या संवेदनेमध्ये होता. पण महानोरांचा निसर्ग त्याहून वेगळा होता. त्यामध्ये मानवी मनाची स्पंदनं होती. केवळ निसर्गसौंदर्य नव्हतं. निसर्गाच्या सोबतीनं त्यांनी हाडामांसाचा, काळजाच्या स्पंदनाचा, स्पंदनातल्या तारांचा, तारांमधल्या व्याकुळतेचा माणूस मांडला. त्यांनी लिहिलेले ‘पालखीचे अभंग’ म्हणजे एका निसर्गसंताने लिहिलेले अभंग म्हणावे लागतील. या अभंगांमध्ये शेती हाच पांडुरंग आहे, निसर्ग हाच त्यामधील वारकरी आहे. पाऊस न आल्यामुळे त्या निसर्गाची जी अवस्था झालेली आहे त्याविषयीची एक ओवी अत्यंत सुंदर आहे.
करपून गेले दुष्काळाने रान
तसे माझे मन पांडुरंगा|
शेतीमाऊलीची गेली सारी रया|
सोयरांची माया ओसरली॥
अशा ओवी या चिरंतन आहेत. शेतीच्या सुखदुःखांशी ते एकरुप झाले होते. एका कवितेत महानोर म्हणतात,
या शेताने लळा लाविला असी की
सुख-दुःखाला परस्परांशी हसलो रडलो
आता तर हा जीवच अवघा असा जखडला
मी त्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो….
रानातल्या कवितांच्या या आरंभीच्या ओळी आहेत. पालखीचे अभंग त्यामानाने नंतरचे म्हणजे अलीकडील काळातील आहेत. पण या सर्व कवितांमध्ये रानातील रुपरंग भरून आहेत. ते रान कुठंही निसटलेलं नाही. रानाला असं मानवी व्यक्तिमत्व देणारा कवी हा रानासारखा चिरंतन राहणार आहे.
महानोरांच्या कवितांची लयही विलक्षण होती. शब्दांची नक्षी पेरतच त्यांची कविता यायची. त्याचा अनुभव मी घेतला आहे. त्यांच्यावरचं, कवितेवरचं प्रेम मी कवी असण्याइतकंच जुनं आहे. म्हणूनच ती लय माझ्या सोबतीनंच चालत गेली.
जरा अस्मान झुकले
शुभ्र तारकांचे झेले
क्षितिजाचे रंगरेखा
संथ पाण्यात न्हालेले,
रान मुकाट झालेले
पक्षी पंखात मिटले
हळू चाहूल घेताना
पाणी दांडात हासले
अशा ओळींमधील लय जणू तो अनुभवच घेऊन येतात.
या नभाने या भुईला दान द्यावे
आणि या मातीतून चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लखडून जावे
ही महानोरांची सुप्रसिद्ध कविता. या कवितेतून त्यांनी निसर्गातून उभं राहिलेलं नक्षत्रदान व्यक्त केलं. यातील लखडून या शब्दाला दुसरा पर्याय नाही. जोंधळ्याला चांदणे लखडून जावे यातील लखडण्यामध्ये एक गोडवा आहे. तशीच एक उत्कट लंपटता आहे. रत्नांचा चुरा ओल्या तळहातावर उन्हात धरला तर तो जसा झगमगेल तसे कवीवर्य महानोरांचे शब्द मला झगमगताना दिसतात. म्हणूनच त्यांच्या कवितांची गाणी झाली. त्यांनी एका पुस्तकामध्ये लिहिलं आहे की, कविता आणि गाणी मी वेगळं मानतच नाही. हे विधान त्यांच्याबाबत मला महत्त्वाचं वाटतं. कारण त्यांच्या कविता आणि गाणी एकरुप आहेत. त्यांच्या कवितेतलं गाणं नामवंत संगीतकारांनी टिपलं. पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी ‘माझ्या आजोळची गाणी’ नावाची एक ध्वनीमुद्रिका केली होती. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांनी ती गाणी गायिली होती. ती गाणी महानोरांनी मुद्दामहून लिहिली नाहीत. त्यांनी त्यांच्या सर्व कविता हृदयनाथांपुढं ठेवल्या आणि त्यातून पंडितजींनी ती गाणी टिपली. म्हणजेच त्या कवितांमध्येच ते गाणं होतं. ‘सांग केवड्याची रात…’, ‘आज उदास उदास…’ अशी कितीतरी गाणी त्यांनी लिहिली. ‘जैत रे जैत’ मधील गाणी तर अजरामर झाली. ही गाणी म्हणजे स्वतंत्र कवितारुप गीतांचा संशोधनाचा विषय आहे. कारण या गाण्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील गीतांना एक अतिशय वेगळा चेहरा दिला. पन्हाळगडाच्या पायथ्याजवळच्या आदिवासींची दुःखं, आनंद हे त्यांच्या कवितांना एक निमित्त झालं. ‘सर्जा’ चित्रपटातील ‘चिंब पावसानं रान झालं आबादानी, झाकू कशी पाठीवरची चांदणं गोंदणी’ या गीतातील आबादानी हा शब्द इतका मातीतला आहे की त्याला बहर, सुगीचा दिवस असा कोणताही शब्द पर्याय ठरत नाही. कवितेत जेव्हा कुठल्याही शब्दाला पर्यायच सुचत नाही तेव्हा त्याचं महत्त्व वेगळं असतं. चांदणं गोंदणी हे शब्दही मराठी कवितेमध्ये अतिशय वेगळे आहेत. ‘जैत रे जैत’मधलं ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’ असेल किंवा ‘आम्ही ठाकर ठाकर’ असेल, या ओळी लिखित शब्दांत वाचताना मनात गाणं ऐकू येतं.
माझ्यासारखा त्यांचा एक चिंब भिजलेला काव्यरसिक त्यांच्या कवितेमध्ये वाहून जातो. त्यांच्या कवितांबद्दल बोलणं म्हणजे शब्दांच्या माहेरी जाणं आहे. शब्दांच्या माहेरी गेलं की त्या लेकीला निघावंसं वाटत नाही. तसं त्यांच्या कवितांच्या आठवणी सांगणं म्हणजे त्यांच्या कवितांंनी दिलेल्या आनंदाप्रतीची कृतज्ञता व्यक्त करणं आहे.
ना. धों. महानोरांचं वैशिष्ट्य म्हणजे कवी संमेलनांमध्ये त्यांना सर्वांत शेवटी ठेवलं जायचं. कवीवर्य सुरेश भट, कवीवर्य महानोर, पाडगांवकर ही मंडळी केवळ नामवंत नव्हती; तर रसिकांना खात्री असायची की यांच्या कविता ऐकण्यासाठी थांबलं की आपण चिंब भिजून जाणार आहोत. महानोरांसाठी रसिक थांबून राहायचे. विशेष म्हणजे ते पाहून महानोरांच्या कवितेतलं काळीज जायला लागायचं. मग लोक ‘वन्स मोअर’चा पाऊस पाडायचे आणि महानोर अधिक बहरून जायचे. वा. रा. ढवळे त्यांच्याविषयी एकदा म्हणाले होते की, कविता ऐकताना वाटतं की हे धोधो महानोर आहेत !
एकदा योगायोगानं विदर्भ एक्सप्रेसमध्ये ते माझ्या डब्यामध्ये होते. त्यांनी हात हातात घेऊन माझी विचारपूस केली. मी त्यांच्या कवितेतल्या गाण्यांविषयी बोलू लागलो आणि अक्षरशः त्या प्रथमवर्गाच्या डब्यात त्यांनी कवितेची मैफिल सुरू केली.
विस्तीर्ण नदीचा काठ, पसरली दाट फुलांची नक्षी
गर्दीत हरवली वाट, कुणी सैराट बावरा पक्षी
ही कविता तुमच्या तोंडून ऐकायची आहे, असं मी त्यांना सांगितलं आणि ते गायला लागले. इतके ते मनमोकळे होते. कवी असण्याचा त्यांना आनंद होता; पण अहंकार नव्हता.
कुठलंही मातीचं ढेकूळ हाती घेतलं की ते त्यातल्या बीजासह येतं आणि हातातच धरुन ठेवलं तर दोन दिवसांनी उगवतंही. तशाच प्रकारे कवी म्हणून महानोरांसोबत माझे जे क्षण गेले त्यामध्ये त्यांच्या कवितांचं बीज होतं. पुढं ते अंकुरलं आणि मला त्याचा आनंद मिळाला.
काही शासकीय समित्यांवर त्यांच्यासोबत मी काम केलं. त्यावेळी मला एक नवा कवी म्हणून, रसिक म्हणून, एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी साथ दिली. शासकीय रुक्ष बैठकीला त्यांच्यामुळं वृक्षपण यायचं. रुक्षपण वृक्षपण करण्याचं सामर्थ्य महानोरांमध्ये होतं. कविता आणि गाणं यांच्या एका अरुप सीमेवर त्यांनी आपल्या कवितांची राहुटी बांधली होती. लोकगीताचं चांदणं वैभव त्यांच्या कवितेत होतं. जात्यावरल्या ओव्या असतील, आईच्या भाकरीचा वात्सल्याचा स्पर्श असेल, उसाच्या मळ्यातला गर्दभारला शृंगार असेल, दुष्काळी शेतीतलं आसवांचं काहूर असेल या सर्व भावना कवी महानोरांनी आपल्या कवितेतून व्यक्त केल्या. आज त्या सर्व कविता, गाणी ते ठेवून गेले आहेत.
असा हा महान कवी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्यास योग्य होता. नंतरच्या काळात त्यांना याबाबतचा प्रस्ताव देण्यात आला तेव्हा प्रकृतीच्या कारणास्तव नकार दिला. पण ते तब्येतीनं उत्तम होते तेव्हाही उत्कृष्ट कवीच होते; पण त्यावेळच्या व्यवस्थेनं त्यांचा विचार केला नाही. गात गात जर अध्यक्षपदावरुन त्यांनी भाषण केलं असतं तर सरस्वती मंडपाचंही हिरवं रान झालं असतं. पण ते आपल्या व्यवस्थेच्या आणि रसिकांच्या नशिबी नव्हतं. साहित्याचा वारकरी म्हणून, त्यांच्या कवितांवर जीव जडवणारा रसिक म्हणून माझ्या मनात ही खंत सदैव राहील. अर्थात महानोर त्यापलीकडे होते. ते पदासाठी नव्हते तर पदाला मोठं करणारे होते.

