मनावर अधिराज्य गाजवणारे कवीवर्य ना.धो.महानोर कालवश
![]()


कवीवर्य ना.धो.महानोर आज आपल्यात नाहीत.पण त्यांच्या कवितेचे मनावर अधिराज्य कायमचे अधोरेखित झालेय-शशिकांत हिंगोणेकर जळगाव
परवाच घरात ना.धो. महानोर यांची आठवण काढली होती. महानोरांचे सगळे कवितासंग्रह पुन्हा वाचून काढण्यासाठी कपाटातून टेबलावर ठेवलेही होते. माझ्या सर्वदूर तापलीय हवा या नव्या संग्रहावर महानोरांचे ब्लर्ब घ्यावे . अशी चर्चा कवीमित्र मंगेशराव काळे यांचेशी केलीही होती. लवकरच भेटायला जायचे मनात होते.मागच्या वर्षी सुलोचनाताईंच्या दुःखद निधनानंतर सात्वंनपर भेटीसाठी मी आणि कवीवर्य दा. गो. काळे पळासखेडा येथे गेलोही होता. ताईंच्या आठवणीत महानोरांचे पाणावलेले डोळे पाहून आमचेही डोळे भरून आले होते. आयुष्यभर कविता जगणारे महानोर हे नेहमीच कवितेची विचारपूस करायचे. प्रोत्साहीतही करायचे.आपणास ज्ञानपीठ मिळायला हवे असे मी मनातले बोललो तेव्हा ते सहज म्हणाले रसिकांच्या मनात माझी कविता आहे. हा ज्ञानपीठ पेक्षाही मोठा सन्मान आहे. मनाने नेहमीच समृद्ध असलेले महानोर हे मराठी कवितेचे बोलते विद्यापीठच होते. साहित्य अकादमीचा पुरस्कार घोषित झाला त्यादिवशी ते भुसावळ येथे माझे निवासस्थानी भेटायला आले होते. पहिला घरगुती सत्कार उषा हिंगोणेकर यांनी शाल श्रीफळ देऊन केला होता. शिवशाहिर मित्रवर्य दादा नेवेही त्यावेळेस उपस्थित होते.आता महानोरांच्या सहवासातील आठवणींचे क्षण उरलेले आहे. आणि डोळ्यात वाहते पाणी आहे. विनम्र श्रद्धांजली. शशिकांत हिंगोणेकर साहित्यिक जळगाव

