कविता जीवन जगण्याचे सुत्र विषद करते
द्वारकाई फिरत्या व्याख्यानमालेत कवी विलास मोरे यांचे प्रतिपादन
![]()


कविता जीवन जगण्याचे सुत्र विषद करते
द्वारकाई फिरत्या व्याख्यानमालेत कवी विलास मोरे यांचे प्रतिपादन
‘ कविता जीवन जगण्याचे सुत्र विषद करते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी तथा निवृत्त तहसीलदार विलास मोरे ( एरंडोलकर ) यांनी केले.जय गणेश फाउंडेशन भुसावळ आयोजित स्वर्गीय द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘ द्वारकाई फिरती व्याख्यानमाला ‘अंतर्गत द्वितीय पुष्पात प्रमुख व्याख्याते म्हणून मोरे मार्गदर्शन करतांना बोलत होते.’ चला बाळांनो,फुलवू कवितेचा मळा ‘ या विषयांसंदर्भात व्याख्यान भुसावळ येथील दादासाहेब रामदास गणपत झांबरे विद्यालयात ए.एन.शुक्ला ( चेअरमन आर.जी.झांबरे विद्यालय ) यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक २६ जुलै २०२३ रोजी उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी सर्वश्री बी.जी.सरोदे ( सचिव,सातपुडा शिक्षण संस्था ),आर.आर.बावस्कर (अध्यक्ष,जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघ ),मुख्याध्यापक एस.बी.कुमावत, व्याख्यानमालेचे संयोजक माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे,चैत्राम पवार (अध्यक्ष,जय गणेश फाऊंडेशन ) मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. व्याख्यानात पुढे कवी विलास मोरे यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करतांना कवितेचे विविध पदर ऊलगडून दाखविले.कविता म्हणजे जीवन जगण्याची कला असं सांगतांना त्या संदर्भाने जीवन मुल्यांची कवितेतून केलेली पेरणी स्पष्ट करीत विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.जीवनमूल्ये विकसित करणाऱ्या निसर्ग कन्या बहिणाबाई चौधरी यांची
“अरे, संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताले चटके
तव्हा मियते भाकर “
ही ‘ संसार ‘ कविता,बालकवी त्र्यंबक ठोंबरे यांची ‘आनंदी आनंद गडे ‘, वा.भा.पाठक यांची ‘ खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे ‘ या काव्यपंक्ती, कुसुमाग्रज यांची ‘ कणा ‘ कविता,भा.रा.तांबे यांची ‘ या बालांनो या रे या ‘, ग.ह.पाटील यांची ‘ देवा तुझे किती सुंदर आकाश,सुंदर प्रकाश सूर्य देतो ‘,वसंत बापट यांची ‘ सदैव सैनिका पुढे जायचे ‘, संत तुकडोजी महाराज यांची ‘ या झोपडीत माझ्या ‘ या कवितांचे चपखल दाखले देत आणि कवितांचे सुरेल गायन करीत समयोचित कवितेतील जीवनभाष्यासह देशभक्ती,गुरुनिष्ठा,तत्वनिष्ठा,सत्यनिष्ठा,निर्भयपणा आदी नैतिकमूल्ये सुगम भाषेत सांगून विद्यार्थ्यांची मने जिंकली.
कवी विलास मोरे यांनी व्याख्यान्यात कवितेच्या केलेल्या अर्थपूर्ण व्याख्या
- कविता जीवन जगण्याची कला शिकवते.
- कविता जीवनाच्या संघर्षात धीराने आणि धैर्याने मार्गक्रमण करण्याचं बळ देते .
आनंदाचा प्रत्येक क्षण शोधता आता पाहिजे.तो क्षण नेमका वेचून सहर्ष जगण्याचा मार्ग दाखवते. - कविता गुरुनिष्ठा,धीर,धैर्य,शौर्य व ध्येयप्राप्ती,विरत्व,देशभक्ती ,मातृपितृभक्ती रुजवून जीवन समर्थ करण्यास कारणीभूत ठरते .
विद्यार्थ्यांना कविते संदर्भात कवी मोरे यांनी केलेले आवाहन - कवितेतील नेमके संदर्भाचे क्षण टिपता येण्यासाठी तुम्ही हंस झाले पाहिजे.
* कविता वाचली,पाठ केली, गायन केले म्हणजे कविता समजली असे नाही … तर कवितेचा आत्मभाव आणि शब्दा पलीकडचा अर्थभाव ज्ञात करून घेण्यासाठी , ती आत्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी चिंतन व मनन करून सर्वार्थाने गर्भित अर्थ उलगडून अभ्यासली पाहिजे.
कविराज विलास मोरे यांनी स्वलिखित ५ बाल साहित्याच्या पुस्तकांचा संच शालेय ग्रंथालयासाठी मुख्याध्यापक व चेअरमन यांना सविनय सादर भेट दिला.आत्मस्तुती व आत्मप्रौढीचा दोष नाकारून त्यांनी सुरवातीला इतर कविंच्या कवितांचे सादरीकरण केले.तथापी संयोजकांच्या आग्रहास्तव कवि विलास मोरे यांनी विद्यार्थ्यांच्या मनात कवितेचे बिजारोपण झाले की नाही याचे मूल्यमापन करण्यासाठी स्वलिखित कविता सादर केल्या.’अजब घोडा ‘ ही कविता ठेक्यात सादर केली.’ छकुलीचा रुसवा ‘ व ‘ नको परीकथा ‘ तालबद्ध कवितेवर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त ठेका धरून मोरेंना साथसंगत केली.’ कामधेनू गाय ‘ कवितेतून संगणकाचे महत्व अधोरेखित केले.मात्र यांत्रिक युगात भौतिक संपत्तीच्या मागे धावण्याने बालकांकडे होणारे जन्मदात्यांचे दुर्लक्ष,आजी आजोबा यांची आत्ममग्नता व दादा ताईंच्या प्रेम,सहवास व मार्गदर्शनाला आसुसलेल्या बालकांच्या अव्यक्त भावनांची कवी मोरे यांनी केलेली वकीली व तिन्ही पिढ्यांमधील वाढत चाललेला दुरावा व हरवत चाललेले भावसंस्कार या आलेखाने उपस्थित ज्येष्ठ मंडळीला अंतर्मुख केले.ज्येष्ठांच्या वैचारीकतेला हात घातला.पालकनितीला संस्कारांची जाणीव दिली आणि विद्यार्थ्यांच्या भावनेचा तळ मनोरंजनाने ढवळून ध्येय व शिस्तीची जाणीव दिल्याने कार्यक्रम दर्जेदार व संस्मरणीय झाल्याचे संयोजक उमेश नेमाडे यांनी कवी विलास मोरेंना कृतज्ञतापूर्वक कार्यक्रमाची पावती दिली.प्रारंभी स्व.मातोश्री द्वारकाबाई नेमाडे यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण मान्यवरांच्या हस्ते झाले.विद्यार्थीनींनी सुरेल आवाजात स्वागतगीताचे गायन केले.व्याख्याते कवीवर्य तथा ॲडव्होकेट विलास मोरे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन संयोजक तथा संस्थापक उमेश नेमाडे यांनी जय गणेश फाऊंडेशन तर्फे तर संस्थेतर्फे चेअरमन ए.एन.शुक्ला यांनी हृद्य सत्कार केला.प्रास्ताविकात उमेश नेमाडे यांनी द्वारकाई व्याख्यान अंतर्गत राबविलेल्या सांस्कृतिक व शैक्षणिक दर्जेदार उपक्रमांचा संक्षेपाने आढावा सादर केला.आर.आर.बावस्कर यांनी शालेय गुणवत्तेच्या परंपरेचा आणि विद्यार्थीभिमुख उपक्रमांचा लेखाजोखा सादर केला.समारोपाच्या अध्यक्षीय भाषणात ए.एन.शुक्ला यांनी मातापित्यांचे महात्म्य सांगून विद्यार्थ्यांनी शालेय गुणवत्ते बरोबर व्यक्तिमत्व संपन्नतेवर कटाक्षतेने लक्ष देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास प्रा.म.सी.हळपे, प्रा.ए.व्हि.चौधरी,माजी पर्यवेक्षक शशिकांत झांबरे, ज्येष्ठ पत्रकार संजयसिंग चव्हाण,भुसावळचे सांस्कृतिक प्रेरणास्तंभ ज्येष्ठ पत्रकार आनंदा पाटील,संचालक जितेंद्र चौधरी धानोरेकर ,भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हाप्रमुख विजय लुल्हे ( जळगाव ),कलाशिक्षक ज्ञानेश्वर बोरोले,एस.डि.बाविस्कर,निलांबरी झांबरे,खुशबू चौधरी शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.सुत्र संचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख राजेश महाजन सर आणि आभार प्रदर्शन गणेश फेगडे सर ( समन्वयक,जय गणेश फाऊंडेशन ) यांनी केले .

