1 min read

अमळनेर नगरीच्या लौकिकात भर घालणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहा'कर्तुत्वाचा महासन्मान' हा अनोखा शानदार सोहळा उत्साहात संपन्न

Loading

“कर्तुत्वाचा महासन्मान सोहळा (22 जुलै 2023)”

अमळनेर प्रतिनिधी(शरद पाटील सर)

अमळनेर नगरीच्या लौकिकात भर घालणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आज 'कर्तुत्वाचा महासन्मान' हा अनोखा नी शानदार सोहळा पार पडला. याची पार्श्वभूमी म्हणजे तालुक्यातील स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध पदावर गेलेल्या तरुणांचा सन्मान करणे ही होती..हा सन्मान करण्यासाठी नागपूर विभागाचे आयकर आयुक्त व अमळनेर तालुक्यातील मारवड गावाचे सुपुत्र माननीय संदीपकुमार साळुंखे व एरंडोल तालुक्यातील ताडे गावाचे नाव भारतभर रोशन करणारे आय.ए.एस.अधिकारी राजेशदादा पाटील उपस्थित होते. त्यांच्यासमवेत जी.एस.टी.अधिकारी मधुकर पाटील,अमळनेरचे डीवायएसपी नांदवळकर साहेब, अमळनेरचे पीआय विजय शिंदे, नोबेल फाउंडेशन जळगावचे संचालक जयदीप दादा पाटील, खा.शि. मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, प्रताप महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.एस.आर. चौधरी, प्रताप महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य डॉ. एस.ओ. माळी ,ख्यातनाम उद्योजक बजरंग शेठ अग्रवाल आदी उपस्थित होते. 'कार्यक्रम वेळेवर सुरू होईल' ह्या पूर्वीच दिलेल्या सूचनेनुसार कार्यक्रम वेळेवरच सुरू झाला...नाट्यगृहाचा हॉल भरगच्च भरलेला होता...पायऱ्यांवर देखील तरुण आणि पालक वर्ग बसले होते...संदीप कुमार साळुंखे व मान्यवर यांची दमदार एन्ट्री झाली...सर्वीकडे प्रफुल्लीत असे वातावरण होते..संदीप दादा व राजेश दादांना बघण्यासाठी व त्यांना ऐकण्यासाठी सर्व आतुर होते..आपल्या खुमासदार शैलीत वरिष्ठ प्रबंधक युनियन बँक ,शहादा व जवखेडा गावचे सुपुत्र मयूरदादा पाटील सूत्रसंचालन करत होते..सर्व पब्लिकला त्यांनी खिळवून ठेवले होते..सर्व अतिथी व मान्यवरांचा स्वागत व सत्कार झाला..पातोंडा गावचे सुपुत्र, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, लेखक व नागपूर प्राधिकरणाचे उपसंचालक कपिल दादा पवार यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले..या सोहळ्याचे पूर्ण संयोजन त्यांनीच केले होते..त्यामुळे प्रास्ताविकातून बोलतांना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक जाणवत होती...

सुरुवातीला एमपीएससी व यूपीएससी परीक्षा पास होऊन विविध पदांवर गेलेल्या तरुणांचा व परिवारांचा सन्मान करण्यात आला..त्यापैकी काही सन्मानार्थिंना बोलण्याची संधी मिळाली..बोलतांना ते खूप भारावलेले होते.. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदच आनंद होता… विविध उपक्रमांचे व फिरते वाचनालय याचे सूत्रसंचालन सकाळचे पत्रकार उमेश काटे यांनी केले… मी पीएच.डी. करत असलेल्या विषयात संदीप कुमार साळुंखे यांचे ‘धडपडणाऱ्या तरुणाईसाठी’ व राजेश पाटील यांचे ‘ताई मी कलेक्टर व्हयनू’ या पुस्तकांचा समावेश केला आहे.. त्या संशोधनाचा संकल्पित आराखडा मी संदीप कुमार साळुंखे व राजेश पाटील यांना दिला. त्यांना खूप आनंद झाला.. आपल्या पुस्तकांवर कोणीतरी संशोधन करतयं.. याचा दोघांना आनंद झाला.. पुढील कार्यासाठी मदत करण्याचे आश्वासन देखील त्यांनी मला दिले… राजेश दादांनी त्यांच्या खिशातून पाकीट काढून मला त्यांचे कार्ड दिले.एका आय.ए.एस. अधिकाऱ्याने मला कार्ड द्यावे..हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता.. माझ्या पीएचडीच्या संशोधनाचा विषय घेणे सार्थकी झालं.. असं मला वाटलं.. पण माझे मार्गदर्शक(गाईड) असलेले डॉ.रमेश माने यावेळी उपस्थित नव्हते, याची खंत देखील वाटली…
त्यानंतर ज्याची सर्वांना उत्सुकता होती ते राजेशदादा पाटील यांचे मार्गदर्शकपर भाषण सुरू झाले…बोलतानां त्यांच्या शब्दात माधुर्य होते..विनम्रता होती.. एकेक ठासिव व प्रेरणादायी शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडत होते.. ते म्हणाले की, ‘यश मिळवणं ही गोष्ट एवढी सोपी नाही व एवढी अवघडही नाही..’ यशाबद्दल अति आत्मविश्वास असलेल्यांना व नकारात्मक विचार असल्यांना ठिकाणावर आणणारा हा विचार होता..पुढे ते म्हणाले, ‘आपल्या क्षमतेला पूरक वातावरण असेल तरच आपल्याला यश मिळू शकते..आपण निवडलेल्या क्षेत्रात आपण विधायक काम केले पाहिजे..आपल्या कार्यक्षेत्रात आपण आपला ठसा उमटविला पाहिजे..आपण जीवन जगत असतांना आपल्या तत्त्वज्ञानाबद्दल कधीच साशांक राहू नये.’ शिक्षणाबद्दल बोलतांना ते म्हणाले की,’ शिक्षण कधीच थांबू देऊ नका.. जरी आपण नोकरीला लागलो असलो.. तरी आपण काही ना काही शिकत राहिलं पाहिजे..आपल्या ज्ञानाची कक्षा निरंतर वृंदावत राहिली पाहिजे..सध्याच्या काळात व नोकरी करतांना आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही टिकू शकतात..त्याचबरोबर आर्थिक नियोजन ही करणं गरजेचं आहे..टर्म इन्शुरन्स व बचतीचे विविध पर्याय त्यासाठी उपलब्ध आहेत..’ हे त्यांचे विचार ऐकून खूपच समृद्ध असं वाटत होतं..अजून पुढे ते म्हणाले, ‘पोझिशन मिळाली म्हणजे रिस्पेक्ट मिळत नाही..पोझिशन ही अल्पकाळासाठी असते परंतु माणुसकी ही चिरकाल टिकते…म्हणून माणूस म्हणून जगा.. सिस्टीम मध्ये असतांना जबाबदाऱ्यांचे भान ठेवा..’ त्याचबरोबर करियर करतांना वैचारिक समृद्धी करणं गरजेचे आहे..असे देखील ते म्हणाले.त्यांचे हे विचार ऐकून अगदी मन भानावर आलं होतं..एक अधिकारी म्हणून सामान्य लोक ज्या व्यक्तीकडे पाहतात त्यांच जगणं हे तितपत सोपं नसतं..त्या पदापर्यंत पोहचणं जेवढं अवघड असतं तेवढं ते पद टिकवणं जास्त अवघड असतं, असं जाणवलं.. मध्यंतरीच्या विद्युत प्रवाह खंडित होत व प्रेक्षकांच्या टाळ्या घेत त्यांचे भाषण संपले..त्यानंतर अजून काही सत्कार झाले..राजेश दादांना जायचं होतं म्हणून त्यांनी सर्वांचा निरोप घेतला..डीवायएसपी नांदवळकर साहेबांनी काही विचार मांडले.. आणि मग मेन बॅटिंग करण्यासाठी आले ते संदीपदादा साळुंखे..ज्याची खरोखर सर्व पालक व तरुण वर्ग आतुरतेने वाट पहात होते..’ नव्यानव टक्के पोटासाठी व फक्त एक टक्के हृदयासाठी माणसाने काहीतरी केले पाहिजे..’ ह्या त्यांच्या ओपनिंग वाक्याने सर्व प्रेक्षक भानावर आले..हजार ते दीड हजार प्रेक्षकांमध्ये टाचणी पडेल तरी आवाज येईल अशी अवस्था होती..सर्व लोक दादांचा एकनेक शब्द चिडीचूप ऐकत होते..ते म्हणाले,’ ज्या ठिकाणी आपल्याला काम करायचे आहे त्या ठिकाणी माणसांचा कधीच हिशोब ठेवू नका देवासाठी ठेवा..कोणतेही काम करतांना स्तुतीची अपेक्षा करू नका..अपेक्षा नसेल तर दुःख येत नाही..म्हणून माणसं जुळत जातात.. आणि समाजासाठी चांगलं काम करता येतं..’ ते दहावीला असतांना त्यांच्या मराठी विषयाच्या शिक्षिका गोघाटे मॅडम यांचा दाखला देत म्हणाले,’ कोणतही काम छोटं नसतं त्यात निष्ठा असावी लागते ..मॅडम शिकवत असतांना वर्गात एक विद्यार्थी असला तरी सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना ज्या तल्लीनतेने शिकवतात त्याच तल्लीनतेने शिकवायच्या.. म्हणून कामाप्रती समर्पित रहा’ असा सल्ला त्यांनी दिला..पुढे ते म्हणाले, ‘ज्या ठिकाणी स्वातंत्र्य सेनानी व तल्लीनतेने काम करणारे सर्व लोक राहिले तिच खरी मंदिर आहेत आणि ती आपण जपली पाहिजेत..जगण्यासाठी पाणी आणि शिक्षण महत्त्वाची साधने..त्यात ‘शिक्षण’ हे अतिशय महत्त्वाचे.! आम्ही या पदापर्यंत केवळ शिक्षणामुळे पोहचू शकलो.. असेही ते आवर्जून म्हणाले.
त्याचबरोबर पुढे बोलतांना ते म्हणाले की, यश हे सहजासहजी मिळत नाही..आपल्या सोयी सुविधांचा व सुख स्वप्नांचा त्याग करावा लागतो.. तरच यश मिळत असतं..प्रत्येकाची लायकी वेगवेगळी असते.. त्यामुळे मी भाऊ म्हणून सर्वांना सल्ला देतो की, ज्याच्यात जे गुण आहेत त्यानुसार क्षेत्र निवडा.. उगाचच प्रेरित होऊन एखाद क्षेत्र निवडू नका..आपल्याला काय आवडतं याच्यावर फोकस करा..त्यानुसार करिअर करा..असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.’ ज्या मातीत आपण जन्मलो त्याला कधीच विसरू नका..’ असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘यशाची पतंग वर जावी वाटत असेल तर संयमाचा दोरा खाली खेचावा लागतो..जीवनातला एकही क्षण वाया घालवू नका..मन लावून कोणतेही काम करणं म्हणजे ‘योग’च होय..खूप वाचन करा वेगवेगळी पुस्तक वाचा..’Work and it’s Secret’ हे पुस्तक वाचा..मी बऱ्याच ठिकाणी व्याख्याने दिलीत आणि त्या व्याख्यानाच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन बरीच विद्यार्थी विविध पदावर पोहचले..त्याचं क्रेडिट मी घेणार नाही देवाने ते माझ्या हातून करून घेतले आहे.. प्रेरणेच्या आगीला धग मिळावी यासाठी मी व्याख्यान देत असतो..असे विनम्र विचार संदीपदादांनी मांडले.
सारं सभागृह सद्गदीत झालं होतं..दादांना सगळ्यांना अजून ऐकायचं होतं परंतु कार्यक्रमाची वेळ पाहून दादांनी आटोपते घेतले..मध्ये बोलतांना दादांनी स्वतःचे प्रेरणादायी प्रसंग सांगितले..गोष्टी व दाखले देत त्यांनी भाषण थांबवलं.. त्यांच्या विचारांनी सारे जण तृप्त झाले होते.. काहीतरी करण्याची प्रेरणा,ऊर्जा सगळ्यांना मिळाली होती..असं त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवत होतं..’कर्तुत्वाचा महासन्मान’ या सोहळ्याचे हेच फलित होतं…शेवटी काही सन्मान पार पडले आणि साने गुरुजी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक व गणित मंडळाचे तालुका अध्यक्ष डी.ए .धनगर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली..

या सोहळ्याचे आयोजन अमळनेर तालुक्यातील सर्व विकास मंच, श्री. अंबरीष ऋषी महाराज टेकडी ग्रुप, अमळनेर साने गुरूजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र, शिवशाही फाऊंडेशन, प्रताप तत्त्वज्ञान केंद्र, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, सी.सी.एम.सी.प्रताप कॉलेज, अमळनेर माजी प्रतापियन्स प्रबोधिनी, अमळनेर PTA (कोचिंग क्लासेस ) यांनी केले. यात कार्यरत असलेल्या सर्व सदस्यांनी या कार्यक्रम पार पाडण्यासाठी खूप खूप मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *