शासन आपल्या दारी योजना म्हणजे सरकारी इव्हेंट -शुभांगीताई पाटील
![]()

शासन आपल्या दारी योजना म्हणजे सरकारी इव्हेंट शुभांगी ताई पाटील
शासन आपल्या दारी ही योजना म्हणजे शिंदे फडणवीस सरकारचा इव्हेंट फंडा असून केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या इव्हेंट सरकारच्या धरतीवर राज्यात देखिल स्वतः चे मार्केटिंग करण्यासाठी चालवण्यात येणारी एक योजना आहे असे पत्रक शिवसेना उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी च्या संपर्क प्रमुख शुभांगी ताई पाटील यांनी काढले आहे. केंद्रातील भारतीय जनता पार्टीचे सरकार हे इव्हेंट सरकार असून आपल्या मालाची मार्केटिंग कशाप्रकारे करावी याचे एक उत्तम उदाहरण आहे. प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट तयार करून दिवसभर मीडियासमोर व वर्तमानपत्रांमध्ये स्वतःची प्रसिद्धी करून लोकांच्या भावनांसोबत खेळून राज्य कारभार करायचे असा या सरकारचा फंडा आहे. संसद भवनाचे उद्घाटन असो की मंदिराचे उद्घाटन असो दिवे लावणे असो की थाळी ठोकणे असो प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करून दिवसभर मीडियासमोर प्रसिद्धी करणे हाच या सरकारचा उद्योग असून त्याच धर्तीवर आता राज्यातील शिंदे फडणवीस सरकार देखील काम करत आहे. शासन आपल्या दारी ही योजना देखील त्याचाच एक भाग असून जर सरकारला खरोखर लोकांपर्यंत योजना पोहोचवायचा आहेत तर त्यासाठी शासकीय यंत्रणा सक्षम आहे त्याचा इव्हेंट करण्याची सरकारला गरज नाही. परंतु स्वतःच्या सरकारची प्रसिद्धी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रत्येक जिल्ह्यात जाऊन या गोष्टीचा एक इव्हेंट तयार करून जिल्ह्यातील संपूर्ण शासकीय यंत्रणेचा वापर करत या योजनेचा उपयोग प्रसिद्धी करून निवडणुकी पूर्वी आपल्या सरकारची मार्केटिंग करत आहेत. राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित असताना त्याकडे लक्ष देण्याऐवजी सरकार स्वतः चे मार्केटिंग व तोडफोडीच्या राजकारणाकडे लक्ष देत आहे. राज्यात बेरोजगारीचा ,महिला सुरक्षे चा प्रश्न अत्यंत गंभीर असताना, शासकीय भरतीची केवळ सोशल मीडिया, मीडिया वर प्रसिद्धी केली जाते ,परंतु वास्तवात कुठलीही भरती होत नाही. गेल्या दोन महिन्यापासून राज्याचे शिक्षण मंत्री शिक्षकांची मेगा भरती, महाभरती अश्या मोठं मोठ्या घोषणा करत असताना वास्तवात अद्याप कुठलीही शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली नाही. व याउलट नुकताच राज्य शासनाने सेवा निवृत्त शिक्षकांना पुन्हा मानधनावर नोकरीस घेऊन डीएड बीएड धारक बेरोजगार तरुणांच्या पोटावर लाथ मारण्याचे काम केलेले आहे. व त्याच प्रकारे इतरही सर्वच बाबतीत हे सरकार निव्वळ खोटी प्रसिद्धी व पोकळ आश्वासने देत इव्हेंट निर्माण करून स्वतः चे मार्केटिंग करत आहे. त्यामुळे लोकांना “शासन आपल्या दारी पण आम्ही आपल्या घरीच बरे असे म्हणण्याची वेळ आलेली आहे.” असे ही पत्रकात नमूद केले आहे.

