स्वामी मुक्तानंद हायस्कूलची वाचन संस्कृतीवर आगळीवेगळी गुरुपौर्णिमा साजरी
![]()
स्वामी मुक्तानंद हायस्कूलची वाचन संस्कृतीवर आगळीवेगळी गुरुपौर्णिमा साजरी
गुरुदक्षिणेतून समृद्ध झाला वाचन कट्टा


मुंबई,ठाणे (मनिलाल शिंपी) शिक्षकांना आज गुलाबपुष्प अथवा भेटवस्तू न देता गुरुपौर्णिमेनिमित्त चेंबूरच्या स्वामी मुक्तानंद हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांना १२५ पुस्तकांची भेट दिली. शिक्षकांनीही मग ती विद्यार्थ्यांच्या वाचन कट्ट्याला देऊन आज खर्या अर्थाने गुरुपौर्णिमेनिमित्त वाचन संस्कृतीचे संवर्धन गुरुशिष्यांनी केले.
गुलाबाची फुले दिली असता ती काही वेळाने कोमजून जाते व त्याचे निर्माल्य होते. गुरुपौर्णिमेला गुलाबाची फुलेही १० ते २० रुपयांपर्यंत मिळतात. शाळेतील सर्वच मुले आर्थिक दृष्ट्या मागासलेली असल्याने शिक्षकांनी मागील दहा वर्षांपासून कोणतीही भेट वस्तू घेण्यास नकार दिला. व विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षी केवळ १ रुपया जमा करायला सांगितला. जवळपास दोन हजार रुपये जमा झाली त्यातून पुस्तके विकत घेऊन वाचन कट्टा सुरू केला. दुसर्या वर्षी २ रुपये जमा करून आणखी अनेक पुस्तकांची खरेदी करून वाचन कट्यात पुस्तकांच्या संग्रहात वाढ झाली. शाळेचे मुख्याध्यापक विवेक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला आणि विद्यार्थ्यांनी १२५ पुस्तके खरेदी केली व वाचन कट्टा समृद्ध केला.
शिक्षण विभागाने भाषा विषयाची एक तासिका पूरक वाचनासाठी ठेवल्याने शिक्षक पूरक वाचनेच्या एक तासिकेला तसेच ऑफ पिरीयडला वाचन पेट्या वर्गात नेऊन विद्यार्थ्यांना वाचायला देतात. या महिन्यापासून वाचलेल्या पुस्तकावर महिन्यातून एकदा चर्चा देखील करणार आहेत.
वाचन कट्ट्याच्या या पुस्तकांमध्ये बालकथा, चरित्रात्मक, वैज्ञानिक, साहित्यिक, क्रीडा विषयांचे मराठी हिंदी व इंग्रजी पुस्तके आहेत.
आजच्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन विद्यार्थ्यांनीच केले होते विद्यार्थ्यांमध्ये सभाधिटपणा यावा यासाठी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीच करतात यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळते. आजच्या या अनोख्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचा माजी विद्यार्थी बिझिनेस लाईफ कोच वक्ता व लेखक विनोद मेस्त्री उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक आप्पासाहेब शेळके, पर्यवेक्षक शुभांगी नाईक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

