दहावीला खान्देशातून प्रथम आलेल्या ऋतुजा चव्हाणचा डॉ.कलाम पुस्तक भिशीतर्फे सत्कार
![]()
दहावीला खान्देशातून प्रथम आलेल्या ऋतुजा चव्हाणचा डॉ.कलाम पुस्तक भिशीतर्फे सत्कार
निवृत्त शिक्षण उपसंचालकांनी सुकन्येचा निवासस्थानी केलेल्या सत्काराने
गहिवरले मातापिता
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये इयत्ता दहावीत खान्देश मधून ९९ . ८० % गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावत ऐतिहासिक यश मिळविणाऱ्या कु.ऋतुजा सुशिल चव्हाण हिचा हृदय सत्कार भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी तर्फे निवृत्त शिक्षण उपसंचालक ( प्राथमिक विभाग ) तथा सुप्रसिद्ध साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांच्या अध्यक्षतेत डॉॅ.कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक प्रमुख विजय लुल्हे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ,बुके व ” भारतातील कर्तृत्ववान स्त्रिया ” हा ग्रंथ देऊन ऑटो नगर जळगाव येथील निवासस्थानी दि.१४ जून २०२३ रोजी करण्यात आला.गणितात पैकीच्या पैकी १०० गुण व संस्कृत व समाजशास्त्रात ९९ गुण प्राप्त केल्याबद्दल लुल्हेंनी ऋतुजाचे विशेष कौतुक केले.सत्कारा प्रसंगी विजय लुल्हे म्हणाले की,’ ध्येयनिष्ठ कुशाग्र विद्यार्थ्यांसाठी प्रज्ञावंत कर्तृत्वसिद्ध अधिकार्यांचे मार्गदर्शनपर कृपाशिर्वाद हे चैतन्यस्रोत व विधायक छंदोपासना हे मानसिक तसेच भावनिक संतुलनाचे अक्षय केंद्र असतात.’ ऋतुजा ही मेहरूण येथील विद्या इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी असून ती इंग्रजी व मराठीतून काव्य लेखन करते.ऋतुजाने इंटरमिजीएट ड्रॉईंग परिक्षेला ‘ ए ‘ श्रेणी प्राप्त केली असून निसर्गचित्रे व व्यक्तीचित्रे जलरंग व वॅक्स माध्यमांतून स्केच करण्याची व गायनाची तीला आवड आहे.नामवंत व्यक्तिंच्या नावाच्या अक्षर रेखाटनातून प्रासंगिक शुभेच्छा देण्यात ऋतुजाचा विशेष हातखंडा आहे.आजोबा निवृत्त सुप्रसिद्ध कलाशिक्षक आर.डि.सुतार ( अमळनेर ),ए.टी.डी.कलाशिक्षित मातोश्री सौ.अर्चना चव्हाण यांचा कलावारसा ऋतुजा आपल्या छंदातून जोपासत आहे.निवृत्त एस.बी.आय.बॅक कर्मचारी पुरुषोत्तम चव्हाण यांनीही गौरवपर मनोगत व्यक्त केले.ऋतुजा सत्काराला उत्तर देतांना म्हणाली की,’अखंड नियोजनबद्ध स्वयं अध्ययन,शिक्षकांचे अमूल्य मार्गदर्शन,माता पित्यांचे सातत्याने प्रेरणा व प्रोत्साहन ही माझ्या ऐतिहासिक यशाची त्रिसूत्री आहे.भविष्यात इंजिनियर होण्याचा माझा मानस आहे.सध्या मी जे.ई.व नीट स्पर्धा परीक्षेची अदम्य जिद्दीने तयारी करीत आहे.आई-वडिलांचा विश्वास सार्थ करून त्यांची स्वप्नपूर्ती करणे हे माझे एकमेव ध्येय आहे. साहेबांनी केलेला सत्कार हा माझ्या जीवनाला दिशा दिग्दर्शक असल्याने ऐतिहासिक व संस्मरणीय आहे ‘ कवि शशिकांत हिंगोणकर यांनी अनौपचारिक चर्चेतून ऋतूजाच्या मातापित्यांना बोलते करून ऋतुजाच्या शैक्षणिक गुणवत्तेचे टप्पे जाणून घेत शैक्षणिक भवितव्याबाबत समुदेशन केले.भिशीच्या सत्कारानंतर हिंगोणेकर साहेबांनी ऋतुजाचा वैयक्तिक शाल व बुके देऊन सत्कार करून पुढील शैक्षणिक मार्गक्रमणाला शुभाशिर्वाद दिले.कृतज्ञतापूर्वक चव्हाण कुटूंबियांतर्फे शशिकांत हिंगोणेकर साहेबांचा भावपूर्ण सत्कार ऋतुजाचे पिताश्री सुशिल चव्हाण व मातोश्री अर्चना चव्हाण उभयतांनी केला.अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना निवृत्त शिक्षण उपसंचालक हिंगोणेकर म्हणाले की ,’ बहुजनांनी गुणवत्तेच्या नभांगणात गरुडझेप घेण्यासाठी अचल ध्येयनिष्ठा व निरंतर कठोर परीश्रमाचे पंख क्षणोक्षणी सजगतेने बळकट करायला हवे. प्रशासकीय अधिकारी होऊन भौतिक सुबत्तेने सक्षम होण्यापेक्षा आत्मोन्नतीसह देशसेवा करून मातृपितृऋण फेडणे आणि समाजाचा नावलौकीक वाढविणे हे मेरीटच्या विद्यार्थ्यांचे ध्येय असावे.’ कार्यक्रमास सौ.वासंती चव्हाण,हितेंद्र चव्हाण,सौ.प्राजक्ता चव्हाण यांसह आप्तेष्ट उपस्थित होते.प्रस्तावना व सूत्रसंचालन विजय लुल्हे यांनी केले.आभार प्रदर्शन सुशील चव्हाण यांनी केले.



