भारताच्या पराभवाचे असली गुन्हेगार !
![]()

भारताच्या पराभवाचे असली गुन्हेगार ! भारतात क्रिकेटला धर्म व क्रिकेटपटूंना देवता मानतात. क्रिकेटवर भरभरून प्रेम करणारे चाहते खेळाडूंच्या प्रत्येक अदांवर फिदा होतात. मात्र हे खेळाडू केवळ अप्पलपोटी वागणं करतात. गडगंज संपत्ती, भरपूर प्रसिद्धी मिळवितात. तर प्रत्यक्ष क्रिकेट व त्यांच्या चाहत्यांना कस्पटा समान लेखतात. आता तर आयपीएल सारखा कुबेराचा खजिना हाती लागल्याने ओरिजनल क्रिकेट असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला तर किरकोळीत घ्यायला लागलेत, आणि हो खानदानी भाऊबंदकी सारखे एकमेकांशी प्रतिस्पर्धा करता करता कट्टर दुश्मनीही करू लागले आहेत. आपल्याच संघात राजकारणासारखे गट करून प्रत्येक गट विजयाचं श्रेय दुसऱ्याला मिळणार नाही याची पुरेपुर काळजी घेत आहे, आणि हिच गटबाजी भारताची आयसीसी स्पर्धांमध्ये अपयशाचे प्रमुख कारण बनली आहे. प्रत्यक्षात हे खेळाडू द्विपक्षीय मालिकेत एकदिलाने खेळताना दिसतात. मग जेंव्हा आयसीसी स्पर्धा येतात तेंव्हा त्यांच्यात एकमेकांची जिरवायची व बदला घ्यायची भावना जागृत होते. वरवर बघितले तर तेथेही ते प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे दाखवितात, परंतु अशी एक नाजूक चूक करून जातात की, ती त्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला मोठा फायदा करून देतात. मागील दहा वर्षात भारतीय संघातील दोन प्रमुख मातब्बर खेळाडूं मध्ये हि जुगलबंदी जाहीरपणे सुरू आहे. हे समस्त क्रिकेट जगत उघडया डोळ्यांनी बघत आहे. मात्र हेच प्रमुख खेळाडू भर मैदानात एकमेकांच्या हातात हात व गळ्यात गळे घालून मिरवताना दिसतात. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या मनात काय चाललेलं असतं हे देवच जाणो ? खरं सांगायचं म्हणजे हे दोन खेळाडू पूर्णतः संघातून गेल्याशिवाय किंवा त्यांच्या दोघांपैकी एकही नेतृत्व करणार नसेल तरच टिम इंडियाला भविष्यात आयसीसीच्या मानाच्या स्पर्धा जिंकता येतील. आयसीसीने सन २०२१ पासून कसोटी क्रिकेटला संजिवनी देण्यासाठी कसोटी क्रिकेटचा विश्वचषक घेण्यास सुरुवात केली. आतापर्यंत या दोन स्पर्धा झाल्या. दोन्ही स्पर्धांमध्ये टिम इंडिया अंतिम फेरीत पराभूत झाली. विशेष म्हणजे दोन्ही वेळी अतिशय खडतर व बिकट परिस्थितीतून अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात गाठ पडलेल्या दोन्ही संघांना भारताने मायदेशात व प्रतिस्पर्ध्यांच्या घरी जाऊन जोरदार मार दिला. मग प्रतिस्पर्धी तोच, आपले खेळाडूही जवळपास तेच व स्वतः ते व्यावसायिक खेळाडू असल्याने वातावरणाशी जुळवून घेण्याची कला अवगत असतानाही नेमके निर्णायक सामन्यातच यांचे घोडे कुठे पेंड खाते ? येथे नाचता येईना अंगण वाकडे नाही तर जिंकायचीच ईच्छा नाही तर जिंकायचे कशाला ? अशा मानसिकतेने वागलं जातं. करोडो रूपये मानधन, अमर्याद सुविधा असूनही हे खेळाडू केवळ स्वतःच्या आत्मीक आनंदासाठी समस्त क्रिकेट प्रेमी व देशवासीयांना वेठीस धरत आहे. अशा धोकादायक मनोवृत्तींना तातडीने लगाम घालण्याची गरज आहे. गलेलठ्ठ मानधन घेणारे कर्णधार, प्रशिक्षक त्यांचा सर्व सपोर्टींग स्टाफ यांना साधी खेळपट्टी ओळखता येऊ नये याचे आश्चर्यच वाटते. कोणता खेळाडू संघात असावा, संघाची रचना कशी असावी हे न समजण्याइतपत हि मंडळी नक्कीच दुधखुळी नाही. ज्या खेळाडूच्या उत्कृष्ठ कामगिरीच्या बळावर देश विदेशात सामने, मालिका जिंकल्या त्यालाच महत्वाच्या सामन्यात बाहेर बसवायचं हे तर आता नेहमीचच झालं आहे. सामन्यानंतर पत्रकार / टिव्ही वाहिन्यांसमोर गुळमुळीत बोलून वेळ मारून नेणारे संघाचे प्रमुख अधिकारी प्रत्यक्षात वरून हुशार दिसत असले तरी एक तर ते मुर्ख आहेत नाहीतर संघाशी बेईमानी करत आहेत. अशा मुजोर, नाठाळ व धोकेबाज लोकांना बीसीसीआयने आवर घालून त्यांच्या ऐवजी प्रामाणिक व केवळ संघहिताचाच विचार करणाऱ्या कर्णधार, प्रशिक्षक व सहाय्यक चमूची निवड करावी नाहीतर त्याच तिकीटावर तोच खेळ चालायचा व सभ्य गृहस्थांचा क्रिकेट खेळ हकनाम बदनाम होऊन जनाश्रय गमवायचा. मग रिकाम्या स्टेडियममध्ये कोणासाठी, कोणाच्या जिवावर क्रिकेट खेळणार ? अजूनही वेळ गेली नाही, वेळीच सुधरा नाही तर बाबाही जातील आणि दशम्याही ! लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

