1 min read

कसोटी विश्व अजिंक्यपद फायनल
कडेलोट करून हद्दपार केलेला अजिंक्यच अखेर मदतीला धावला !

Loading

कसोटी विश्व अजिंक्यपद फायनल
कडेलोट करून हद्दपार केलेला अजिंक्यच अखेर मदतीला धावला !

डब्ल्यूटीसी फायनलच्या सुरुवातीच्या दोन दिवसात केवळ एकच संघ सामन्यात वर्चस्व मिळवून होता आणि तो म्हणजे ऑस्ट्रेलिया. खेळाच्या सर्वच क्षेत्रात करामत करताना ऑस्ट्रेलियाने सामन्यावर घट्ट पकड मिळविली होती. त्यावेळी वाटत होते की, सामना व विश्वकरंडक ऑस्ट्रेलिया तिसऱ्या दिवशीच खिशात घालणार. मात्र तसे होणे नव्हते. सलग दोन दिवस क्षेत्ररक्षण करून थकलेले भारतीय खेळाडू फलंदाजीला आले खरे. परंतु त्यांच्यात लढण्याचे त्राणच दिसत नव्हते. जगविख्यात विराट कोहली, दि वॉल चेतेश्वर पुजारा, हिट मॅन रोहित शर्मा व न्यु फाईंड शुभमन गिल अवघ्या ७१ धावात धारातिर्थी कोसळल्याने समस्त भारतीयांच्या तोंडचे पाणीच पळाले होते. मात्र त्याच वेळी अठरा महिन्यांच्या वनवासानंतर संघात परतलेल्या माजी कर्णधार -उपकर्णधार -अजिंक्य राहणेने सुरुवातीला रविंद्र जडेजाला घेऊन किल्ला लढविला. डाव सावरतोय असे दिसत असताना जडेजाही लायनच्या जाळ्यात फसला. त्यावेळी सर्व काही संपलं असे वाटत होते. तेंव्हा फक्त डोळ्यासमोर फॉलोऑन व त्यानंतर होणारा लाजीरवाणा पराभवच दिसत होता. तेंव्हा दुसऱ्या बाजूने संघाची होणारी वाताहत बघणाऱ्या अजिंक्य राहाणेच्या मनात वेगळंच काही शिजत होतं. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी २९ धावांवर नाबाद परतलेल्या अजिंक्य राहाणेच्या शिरावरच भारताच्या इज्जतीचा सवाल अवलंबून होता. मात्र त्यावेळी त्याच्यावर किती जणांचा विश्वास होता हा सुध्दा एक संशोधनाचाच विचार होता. सामन्याच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात अतिशय निराशजनक झाली. यष्टीरक्षक फलंदाज श्रीकर भरत आल्या पावलीच परतला. अजिंक्यच एकमेव मान्यता प्राप्त फलंदाज मैदानावर होता. केवळ शार्दूल ठाकूरच बऱ्यापैकी फलंदाजी करू शकणारा फलंदाज शिल्लक असल्याने भारतीय संघासमोर प्रश्नांचा डोंगर उभा होता. त्यातच सुरूवातीलाच यश मिळाल्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाज चांगलेच चढले होते. शिवाय सकाळचे वातावरण जलदगती गोलंदाजीला पोषक असल्याने पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, कॅमरून ग्रिन, बोलँड या गोलंदाजांना चांगलाच चेव चढला. यॉर्कर, बाऊंसर्स, बिमर्स टाकून त्यांनी राहाणे शार्दूलला जंग जंग पछाडले. त्यांच्या शरीराचा प्रत्येक अवयव त्यांनी अक्षरशः झोडपून काढला. मात्र एवढया मोठया सत्वपरीक्षेनंतर हे दोन मुंबईकर डगमगले नाही. त्यामध्ये अग्रेसर होता अजिंक्य राहाणे. त्याने आपल्या लौकीका साजेसा खेळ करत संघाला फॉलोऑन मधून मुक्त होण्याची स्थिती निर्माण केली. षटकार मारून अर्धशतक साजरे केले. उपहाराला ८९ धावांवर परतला, मात्र त्यानंतर एकही धाव त्याच्या खात्यात जमा झाली नाही व मागील दोन वर्षात प्रथमच खुणावू पाहणारे कसोटी शतक त्याला हुल देऊन गेले. अजिंक्यच्या पतनानंतर शार्दूलने ओव्हलवर अर्धशतकांची हॅट्रीक साधली मात्र भारताचा डाव तो व इतर फलंदाज लांबवू शकले नाहीत. परंतु भारताची फॉलोऑनची नामुष्की टळली आणि त्यामुळे भारतीय गोलंदाजांना लढण्याची नवी उमेदही मिळाली. हे दुसऱ्या डावात गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीवरून लक्षात आले आहेच. अजिंक्य जानेवारी २०२२ पासून संघाबाहेर आहे. दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या कसोटी मालिकेनंतर खराब फॉर्ममुळे त्याच्यावर संक्रांत आली होती. आयपीएलमध्येही केकेआरने त्याला नारळ दिले. इतके नाही तर बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मधील हा हा ए- ग्रेडचा खेळाडू नंतर बी ग्रेडमध्ये ढकलला आणि मग कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधूनच बाहेर हाकलला. त्यानंतर त्याच्यावर अनेक संकटं आले. भारताचे त्याने नेतृत्व केलेल्या सामन्यात शंभर टक्के अपराजित राहाण्याची कामगिरीही त्याने केली आहे. इतकेच नाही तर भारताचा नियमीत कर्णधार बनण्याची पात्रताही त्याच्यात होती. मात्र काही खराब डावांमुळे त्याचा डावच उद्वस्त झाला होता. मात्र त्यांना तो पुरून उरला. प्रथम रणजी स्पर्धेत आपलं नाणं खणखणीतपणे वाजवलं, नंतर एमएस धोनीने त्याला सीएसकेमध्ये स्थान दिलं. चेन्नईच्या विजेतेपदात अजिंक्यचा मोठा वाटा होता. या सर्वांचे फळ त्याला मिळत गेले. त्यामुळेच तर आज भारताची लाज जागतिक स्तरावर वाचली. आता भारतीय गोलंदाजांनी कागारूंना जास्त वळवळू न देता त्यांची आघाडी ३८० च्या वर जाणार नाही याची काळजी घ्यावी. भारतातील खेळपट्टयांपेक्षा सेना देशातील खेळपट्टया वेगळ्या असतात प्रत्यक्षात त्या फाटत- तुटत नाहीत. केवळ फलंदाजी संयम, जिगर व जिद्द दाखविण्याची गरज आहे. असं जर झालं तर भारत आपलं विश्वविजेते बनण्याचं स्वप्न नक्कीच साकारू शकतो, आणि हो या पुढील खेळात भारतीय संघाकडून पुढे कोणीही चमत्कारीक खेळ करू शकतो. मात्र या सर्वांची पायाभरणी करणारा एकच खेळाडू आहे, आणि तो म्हणजे अजिंक्य राहाणे ! हे मात्र विसरून चालणार नाही बरका !!!

लेखक –
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *