कल्याणच्या अभिनव विद्यामंदिरात शिवराज्याभिषेक दिन जल्लोषात साजरा.
![]()

कल्याणच्या अभिनव विद्यामंदिरात शिवराज्याभिषेक दिन जल्लोषात साजरा.
ठाणे,कल्याण:( मनिलाल शिंपी ) छत्रपती शिक्षण मंडळ, कल्याणचे- अभिनव विद्यामंदिर,पारनाका या शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वे वर्ष सुरू झाल्याचे औचित्य साधून अभिनव विद्यामंदिर, पारनाका- कल्याण व कल्याण विकास मंडळ, कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील पारनाका चौकात शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. गगनभेदी तुतारी वादनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. गायिका प्राजक्ता मोरे यांनी सुमधुर शिवस्तुती गायन करून उपस्थितांची मने जिंकली. यानंतर उपस्थित पाहुण्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन केले. तद्नंतर पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाराजांचे जीवनकार्य थोडक्यात मांडले. आश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांची लेझिम पथकासह भव्य मिरवणूक काढण्यात आली, त्याचसोबत विद्यार्थी कलाकारांनी शिवराज्याभिषेक दिनावर आधारीत भव्य असा नृत्य-नाट्य कार्यक्रम सादर केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे पात्र साकारणाऱ्या आश्वारूढ विद्यार्थी कलाकारावर उपस्थितांनी पुष्पवृष्टी केली. संजय उतेकर यांनी शिवाघोषणा अर्थात गारद देताना सर्व भारावून गेले. यानंतर छत्रपतींची महाआरती करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार नरेंद्र पवार त्यांच्या पत्नी, कल्याण विकास मंडळाच्या अध्यक्षा हेमलता पवार, बाजारपेठ पोलीस चौकी कल्याणचे पोलीस निरीक्षक सुनील पवार, जेष्ठ शिवसैनिक व समाज सेवक बाळ हरदास तसेच शिवसैनिक दिनेश शेट्ये उपस्थित होते. तसेच शाळेचे माजी विद्यार्थी कमालाकर गायकर,सूर्यकांत गठडी, संजय पाटील, वैशाली नेर, मंगेश मोहिते उपस्थित होते. छत्रपती शिक्षण मंडळाचे सरचिटणीस निलेश रेवगडे, संस्थेचे पदाधिकारी व माजी सरचिटणीस मनोहर ठाकुरदेसाई, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक मंदार कुलकर्णी, संस्थेचे पदाधिकारी अशोक फर्डे, नागेश पवार तसेच अंबरनाथ शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर सचिव विलास आंग्रे, आणि शिवव्याख्याते प्रकाश नलावडे, शाळेचे मुख्याध्यापक संपत गिते, पर्यवेक्षक अरुण आवटे, परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, पालक तसेच शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आवर्जून उपस्थित होते. नृत्य दिग्दर्शिका किरण मोरे तसेच सर्व कलाकार विद्यार्थी यांनी हा भव्य कार्यक्रम साजरा करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेतील शिक्षिका संगीता आंबेरकर यांनी केले. हा कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील शिवभक्तांची प्रचंड गर्दी जमली होती. बाजारपेठ पोलीस चौकीच्या उत्कृष्ठ नियोजनामुळे हा कार्यक्रम शिस्तबद्ध पार पडला. समाजाच्या सर्व स्तरातून या कार्यक्रमाचे कौतुक होत आहे.

