विल्यम शेक्सपियरच्या जन्मदिनी जन्माला आलेले आर्किटेक चेतनभाऊ सोनार !
![]()

विल्यम शेक्सपियरच्या जन्मदिनी जन्माला आलेले आर्किटेक चेतनभाऊ सोनार !
जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ लेखक कोण? हा प्रश्न कोणालाही केला तर सर्वच बाजूने फक्त एकच उत्तर येणार, ते म्हणजे इंग्लंडचे महान लेखक सर विलियम शेक्सपियर! या थोर लेखकाचा जन्मदिवस व मृत्यू दिवसही एकच आहे. तो म्हणजे 23 एप्रिल. त्यामुळे या महान विभूतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी संपूर्ण जग हा दिवस म्हणजे 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करीत असतात. ही थोर ऐतिहासिक परंपरा संपूर्ण जग मागील चारशे वर्षांपासून साजरा करीत आहे. त्याच थोर सर विल्यम शेक्सपियरच्या जन्मदिनी जन्माला आले आमचे संयुक्त खानदेशातील सुप्रसिद्ध आर्किटेक मा. श्री भाऊसाहेब चेतन वासुदेवराव सोनार. आज चेतनभाऊ वयाची 60 वर्ष पूर्ण करून 61 साव्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्याबद्दल त्यांना संयुक्त खानदेशवासियांतर्फे मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! तसेच अमळनेरात होत असलेल्या परमपूज्य साने गुरुजी स्मारकाचे काम लवकरच पूर्ण व्हावे हीच याप्रसंगी त्यांना समस्त खानदेशवसियातर्फे मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !!
ब्रिटिश राज घराण्याचे सर्वच वारसदार हे जन्माला येताना तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात असं म्हणतात त्याचप्रमाणे आमचे चेतनभाऊ जन्माला येताना साहित्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आहे कारण की, चेतनभाऊंचे पिताश्री महाराष्ट्रातील एक अग्रगण्य साहित्यिक होते. कै. तात्यासाहेब वा.रा. सोनार हे पु ल देशपांडे, वि. दा. करंदीकर, शंकर पाटील, मंगेश पाडगावकर, कुसुमाग्रज भालचंद्र नेमाडे, ना. धों. महानोर, यदुनाथ थत्ते, राजा मंगळवेढेकर आदि साहित्यिकांचे समकालीन होते. त्यामुळे चेतनभाऊंवर साहित्य आणि साहित्यिकांचा एक वेगळाच पगडा आहे. अगदी त्यांच्या लहानपणापासूनच त्यांच्या घरी अनेक नामवंत साहित्यिकांनी आवर्जून भेटी दिलेल्या आहेत आणि त्यांच्या घरी नेहमीच साहित्यिक मैफिली होत असत. आज चेतन भाऊ व्यवसायाने आर्किटेक्ट आहेत. जर ते आर्किटेक्ट झाले नसते तर आपल्या पिताश्री सारखे उत्कृष्ट लेखक, साहित्यिक झाले असते. पिताश्री कै. वा.रा. तात्यांचा जन्म 14 फेब्रुवारीचा (व्हॅलेंटाईन डे ), मोठी बहीण प्राध्यापिका सौ अनुराधा पोतदारांचा जन्म 1 मे (महाराष्ट्र दिन) व चेतनभाऊंचा जन्म 23 एप्रिलचा (जागतिक पुस्तक दिन ) आहे. बघा ना ! परमेश्वराने कसा विलक्षण योगायोग घडवून आणला. आमच्या चेतनभाऊंच्या घरी मां सरस्वती आणि महालक्ष्मी या दोन्हीही बहिणी मोठ्या गुण्या गोविंदाने नांदत आहे. फार कमी ठिकाणी या दोन्हीही बहिणी एकत्र नांदतात.
आर्किटेक चेतनभाऊंचा जन्म दिनांक 23 एप्रिल 1963 रोजी अमळनेर येथे झाला. पिताश्री वासुदेव व मातोश्री यशोदा मैय्या यांच्या पोटी जन्माला आलेले हे बाळ लहानपणापासूनच तल्लख बुद्धीचे होते. त्यात मोठ मोठ्या साहित्यिकांच्या भेटीगाठी व साहित्यिक मैफिलींमुळे हे बाळ पूर्णपणे परिपक्व झाले. आणि पाहता पाहता चेतनभाऊ सन 1986 साली आर्किटेक्ट झाले व आपला व्यवसाय करू लागले. या व्यवसायात त्यांना अमळनेरचे मोस्ट सीनियर आर्किटेक मा. श्री राम कुलकर्णी साहेबांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ते आज भारतीय पुरातत्व विभागाचे सल्लागार असून एल.आय.सी. हाऊसिंग कॉर्पोरेशनचे प्रमुख व्हॅल्यूअर आहेत. तसेच म्हाडाचे आर्किटेक पॅनलचे सदस्य असून केंद्र सरकार व राज्य सरकारच्या घरकुल योजनेचे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक ठिकाणी हे उपक्रम राबविले जात आहे. चेतनभाऊ हे मागील 36 वर्षापासून आपल्या व्यवसायाशी बांधील आहेत. त्यांची साधी राहणी व उच्च विचारसरणी आहे. त्यांची ‘वास्तू चैतन्य’ या नावाची फर्म आहे. ह्या ‘वास्तू चैतन्य’ अंतर्गत महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, रायगड, धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार इत्यादी जिल्ह्यात त्यांची कामे जोमाने सुरू असतात. ते संयुक्त खानदेशातील एक अग्रगण्य आर्किटेक्ट म्हणून ओळखले जातात.
आमच्या चेतनभाऊंची खरी ओळख आहे ती म्हणजे प.पू. साने गुरुजींची आचार-विचारांची पालखी पुढे नेणारा भोई. अमळनेर ही प. पू. साने गुरुजींची कर्मभूमी. या कर्मभूमीतून साने गुरुजींनी शेकडो स्वातंत्र्यसैनिक तयार केली. साने गुरुजींनी दिनांक 15 ऑगस्ट 1948 रोजी राष्ट्रसेवा दलाची स्थापना करून पुण्यातून साप्ताहिक साधना हे मासिक सुरू केले होते. राष्ट्रसेवा दल हा गुरुजींचा प्राण होता. चेतनभाऊंचे पिताश्री कै. वा. रा. तात्या सोनार हे कट्टर राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते होते. त्यामुळे चेतनभाऊहि नैसर्गिक रित्या राष्ट्रसेवा दलाकडे वळले. वा. रा. तात्यांनी प. पू. साने गुरुजींचे साहित्य महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचविले आणि आजच्या पिढीला साने गुरुजींचे विचार सांगितले. मागील पन्नास वर्षापासून वा. रा. तात्यांचे घर हे राष्ट्रसेवा दल व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांची हक्काचे माहेरघर आहे.
आमचे चेतनभाऊ हे राष्ट्र सेवा दलाचे प्रमुख कार्यकर्ते असून प. पू. साने गुरुजी कर्मभूमी प्रतिष्ठानचे विद्यमान कार्याध्यक्ष आहेत. तसेच ते मुक्ताई प्रतिष्ठानचे अध्यक्ष असून सुप्रसिद्ध चेतश्री प्रकाशन याचे संचालक आहे. अमळनेर प. पू. सानेगुरुजी कर्मभूमी स्मारकाचे अनेक वर्षापासून जोमाने काम सुरू आहे. अमळनेर तालुक्याचे माजी आमदार व खानदेशाची मुलुख मैदान तोफ म्हणून प्रसिद्ध असलेले मा. श्री. गुलाबरावबापू पाटील व प्रताप कॉलेजचे कर्तव्यदक्ष माजी प्राचार्य मा. श्री प्रा.डॉ.अरविंदभाई सराफ यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली चेतनभाऊंनी कामाचा विडा उचललेला आहे. या प्रकरणी अनेक वेळा आर्थिक संकटावर मात करून प्रतिष्ठानची कामे सुरळीत रित्या सुरू आहे. मागील महिन्यातच या जागेतील वृक्षांना अचानक आग लावून काही विघ्न संतोषी नथुरामी प्रवृत्तीच्या लोकांनी कु कृत्य केले होते. परम पूज्य साने गुरुजींच्या पुरोगामी कर्मभूमीत नथुरामी प्रवृत्ती वाढत आहे. हीच मोठी चिंतेची बाब आहे. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो.
परमपूज्य साने गुरुजी स्मारक लवकरात लवकर व्हावे हीच खरी खानदेशवाशीयांची मनापासून इच्छा आहे. त्यासाठी चेतनभाऊ हे तन-मन-धनाने नेहमीच अग्रेसर आहेत. यासाठी त्यांना सर्वश्री अविनाशभाई पाटील, दर्शना पवार, गोपाळ नेवे, डॉक्टर मिलिंदभाई वैद्य, डॉ. उदयकुमार खैरनार, डॉ. अतुलभाई चौधरी, डॉ. दिनेश पाटील, भारती गाला, संदीप घोरपडेसर देशमुख सर, रवी मोरे, एम. ए. पाटील सर, गोविंद गोजरेकर, पत्रकार किरण पाटील, दीपक सिसोदे, नितीन निळे, जितेंद्र पाटील, सुनील पाटील, एडवोकेट रियाजउद्दीन काझी, उमेश काटे युवराज पाटील, नितीन भदाणे, अमोल माळी, सुभाष पाटील घोडगावकर, प्राध्यापिका सौ. शिला पाटील, बी. बी. सोनवणे, भाऊसाहेब देशमुख, पक्षी मित्र अश्विन पाटील, विक्रांत पाटील, विजयकुमार वाघमारे, गौतमभाई मोरे, दिलीप कदम, महेश पाटील, डी. ए. धनगर, विजयकुमार वाणी, जितेंद्रभाई वाणी आदींचे बहुमूल्य सहकार्य मिळत आहे, पुनश्च एकदा चेतनभाऊंना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
सदरच्या लेखासाठी चेतनभाऊंच्या मोठ्या भगिनी प्रा. अनुराधा पोतदार पुणे व मुलगा राही सोनार याचे बहुमूल्य सहकार्य मिळालेले आहे
जय हिंद जय महाराष्ट्र
सदरचा लेख मुंबई येथील मुक्त पत्रकार श्री राजेंद्र माधवराव सुतार मूळ अमळनेरवासी यांनी लिहिलेला आहे व या लेखाचे शब्दांकन श्री योगेश पाने यांनी केलेले आहे.

