1 min read

ज्येष्ठ पत्रकार बापू ठाकूर यांना,भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्कार जाहीर

Loading

ज्येष्ठ पत्रकार बापू ठाकूर यांना

भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्कार जाहीर

धुळे- येथील ज्येष्ठ पत्रकार सा. ‘आक्रंदण’चे संस्थापक संपादक बापू ठाकूर यांना मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने अकोला येथील पत्रमहर्षि स्व. भगवंतराव इंगळे यांच्या नावाने देण्यात येणारा भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्काराची घोषणा काल मुंबई येथे संपन्न झालेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या बैठकीत मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी केली. यावेळी परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, विभागीय सचिव दिपक कैतके, मुंबई अध्यक्ष राजा आदाटे आदी उपस्थित होते. बापू ठाकूर यांना हा पुरस्कार मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व पुरस्कारार्थींसोबत मुंबई येथे देण्यात येईल.

भालचंद्र पुंजू ठाकुर उर्फ बापू ठाकूर हे ज्येष्ठ पत्रकार असून धुळे जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आहेत. परिषद प्रतिनिधी, अधिस्विकृती समिती अध्यक्ष नाशिक विभाग यावर काम केले असून गेली 50 वर्ष पत्रकारितेत सक्रीय होते. जनशक्ती, स्वतंत्र भारत दैनिकांसह, आक्रंदण नावाच्या साप्ताहिकाचे 36 वर्ष संपादक म्हणून कार्यरत होते. ते अध्यक्ष असतांना धुळे जिल्हा पत्रकार संघाचा सुवर्ण महोत्सव तत्कालीन मुख्यमंत्री मनोहरपंत जोशी यांच्या उपस्थितीत जोरदार साजरा झाला होता. मराठी पत्रकार परिषदेने दिलेल्या आदेशानुसार विविध आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. समाजवादी चळवळीत काम करीत असतांना अनेकदा सत्याग्रह करून तुरुंगवासही भोगला आहे. परिषदेच्या असंख्य अधिवेशनात हजेरी लावली आहे. एक ध्येयवादी पत्रकार म्हणून त्यांची खान्देशात ओळख आहे. आता पत्रकारितेतून ते निवृत्त झाले आहेत. योग्य व्यक्तीस पुरस्कार मिळाल्याबद्दल खान्देशच्या पत्रसृष्टीने आनंद व्यक्त केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *