अक्षय्य तृतीया: अक्षय्य आनंदोत्सव
![]()

👉अक्षय्य तृतीया: अक्षय्य आनंदोत्सव
वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया होय.या दिवसाला हे नांव पडण्याचं कारण श्रीकष्णाने धर्मराजाला सांगितलं की,या दिवशी केलेलं दान,हवने क्षयाला जात नाहीत म्हणून या दिवसाला अक्षय्य तृतीया म्हटलेलं आहे.काहींच्या मते हा दिवस त्रेता युगाचा आरंभ दिन आहे.तर काहींच्या मते कृतयुगाचा आरंभ दिन आहे.उत्तर हिंदुस्थानात हा दिवस सत्य युगाचा आरंभ दिन मानतात.उत्तर हिंदुस्थान आणि बंगालमध्ये हा सण जोरात साजरा होतो.बंगालमध्ये या दिवशी चंदनयात्रा भरते.चंदनाचं तेल लावलेले पंखे आणि फुलं यांचं दान देतात.जगन्नाथपुरी येथे मदनमोहनाची मूर्ती मिरवणुकीने नेवून तलावात फिरवतात.याच दिवशी विष्णुचे सहावे अवतार परशुराम यांचा जन्म झाला अशी आख्यायिका आहे.
जैन धर्मियांच्या दृष्टीनेही अक्षय्य तृतीयेला महत्त्व आहे.हा दिवस जैन धर्माची माणसं पवित्र मानतात.जैन धर्मातील आदिनाथ म्हणजेच वृषभदेव यांनी एका वर्षाहून अधिक काळ उपवास केला होता.हस्तिनापूरचा राजा श्रेयांस याच्या घरी ऊसाचा रस पिऊन आदिनाथांनी आपला उपवास सोडला होता.त्यामुळे राजाची भोजनशाळा अक्षय झाली होती.त्यावरून या दिवसाला अक्षय्य तृतीया हे नांव पडले अशी जैन धर्मियांची श्रध्दा आहे.
तसेच चैत्र शुद्ध तृतीयेला चैत्र गौर बसवली जाते.एक महिन्यानंतर या गौरीच्या उत्सवाची अक्षय्य तृतीयेला समाप्ती होते.यावेळी महिलांना हळदीकुंकू देऊन कच्ची कैरी घालून केलेली डाळ आणि पन्हं देण्याची पध्दत आहे.ओल्या हरभर्यांनी स्त्रियांची ओटी भरतात.यामागे ऋतुतील महत्त्वाचे फळ आंबा त्याचं पूर्वरुप कच्ची हिरवी कैरीचा वापर केला जावा हा हेतू आहे.याचं कारण आरोग्य दृष्टीनेही महत्त्वाचं आहे.उन्हाळा वाढल्याने घामावाटे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असते.कच्च्या कैरीमधे आम्लता आणि क्षार यांचं प्रमाण जास्त असते.कैरीचे पाणी आणि गूळ घालून पन्हं केलं की ते पोटात जातं आणि आरोग्यवर्धक ठरते.हरभरा डाळीमधे प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.त्यामधे कच्ची कैरी घालून केलेली डाळ खाल्ली तर पाणी आणि क्षार यांचा समतोल टिकून राहतो.त्यामुळे त्वचेचे कार्य आणि रक्ताभिसरण सुरळीत चालते.अक्षयतृतीयेला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे म्हणून ही महत्व आहे.या दिवशी पितरांचे श्राद्ध ही केले जाते.
स्त्रियांसाठी हा दिवस म्हणजे आनंदाची पर्वणीच आहे.रणरणत्या उन्हात पोळून निघालेली धरणी, माळरानावर गवताच्या शोधात वणवण भटकणारी गुरे,उन्हाने बेजार झालेले विहंग, उनाड उष्ण वारा अंगलट करतो आणि दुपारच्या वेळी सुने सुने वाटणारे रस्ते,त्यातच मनाला धुंद करणारा आमराईतून उमटणारा कोकिळ स्वर,हा सारा विरोधाभास वाटतो.मात्र सासुरवाशिणींना आखाजीच्या म्हणजेच अक्षय्य तृतीयेच्या सणाच्या चाहुलीने दिलासा मिळतो.सासुरवाशिणींच्या उत्साहाला पारावार नसतो.त्या माहेरी जायची स्वप्ने पाहू लागतात आणि आपोआपच त्यांच्या ओठांवर शब्द उमटतात.
“माहेरनी वाट,वाट वाटे वन सोनानी
आखाजीले भेट व्हयी,मनी माय काशीनी”.
“आखाजीच्या सण वाट धरू माहेरनी
सोनानी दहेली मना भाऊ भासासनी.”
सोन्याचा उंबरठा असलेल्या भावाच्या घरी जाण्यासाठी ही सासुरवाशिण आसुसलेली असते.अशा प्रकारे आई-लेक एकमेकींच्या भेटीसाठी आसुसलेली असतात.या सणाला दोन गावांमधील सीमेवर आखाजी खेळली जाते.कुस्त्यांची दंगल ही पाहण्यासारखी असते.मुली टिपरी खेळतात.झाडाला झोके बांधतात.गौराईची गाणी गायली जातात.
“एवढीशी गौराई ठुमकडी माय ठुमकडी.”
“आथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका काय वन.”
असा हा आनंदाची पर्वणी घेऊन येणारा अक्षय्य तृतीयेचा सण घराघरात हर्षाची बरसात करतो.या आनंदोत्सवात व्यापारी, कारखानदार आपल्या नवीन कामांचा शुभारंभ करतात.सालदारांचे नवीन साल ठरवले जाते.त्यांच्या नववर्षाला सुरूवात होते.शेतीच्या कामांनाही अक्षय्य तृतीयेनंतर वेग येतो.वर्षा ऋतुची चाहूल लागते.निरभ्र,निळ्या आकाशात तुरळक ढग दिसू लागतात.त्राही त्राही करणारी सजीव सृष्टी मलूल होऊन पावसाच्या आगमनाची वाट पाहते.अशा प्रकारे दरवर्षी अक्षय्य तृतीया येते, सृष्टीत बदल होतच असतो.परंतु संगणकाच्या युगात दिवसेंदिवस सणांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असून,सणांचं महत्व कमी होत असल्याचे जाणवते.पण आपल्या खान्देशच्या सांस्कृतिक वारसा लाभलेल्या सणांचं जतन करणं ही आपण सार्यांची जबाबदारी आहे.
💐लेखन💐
सो.वसुंधरा दशरथ लांडगे
संचालिका अर्बन बँक अमळनेर
विश्वस्त खा.शि.मंडळ अमळनेर🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

