1 min read

मानवी कल्याणासाठी धम्म तत्त्वज्ञान सर्वश्रेष्ठ..!
——- प्रा.डाॅ.संबोधी देशपांडे

Loading

विचार मंचावर विद्या गायकवाड, प्रतिभा शिंदे ,संबोधी देशपांडे, यशोदा तायडे, देविदास अडकमोल…

मानवी कल्याणासाठी धम्म तत्त्वज्ञान सर्वश्रेष्ठ..!
——- प्रा.डाॅ.संबोधी देशपांडे

जळगाव : महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ वी जयंती निमित्त एन. रामाराव मागासवर्गीय गृहनिर्माण सोसायटी, पिंप्राळा येथे “आंबेडकरी समाज : काल आज आणि उद्या” या विषयावर बौद्ध संघर्ष समितीच्या संघटक व समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथील प्रा.डॉ. संबोधी देशपांडे यांचे व्याख्यान आज रविवारी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आले.
मानवी जीवनाच्या कल्याणाचा आणि विकासाचा सर्वश्रेष्ठ वस्तूपाठ बौद्ध तत्त्वज्ञानात पहावयास मिळतो. मी अनाथ म्हणून जन्माला आली आणि अभ्यासांती मी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. माझ्या आयुष्यामध्ये रोजचा दिवस नवा उल्हासाचा ,चैतन्याचा असतो. याचे सर्व श्रेय बौद्ध धम्माला आहे. मी देखील ज्या ब्राह्मणी कुटुंबात वाढली त्या व्यवस्थेच्या कर्मठ आणि सनातनी रूढीपरंपरांनी मला जखडून ठेवले होते. उपासतापास ,जपताप, ईश्वरी संकेत, कर्मकांड यात मी पूर्णपणे बुडालेली होती. ज्यावेळेस मला समजले आणि मला बुद्ध तत्त्वज्ञानाने आकर्षित केले त्या दिवशी मला माझ्या नव्या जन्माचा अनुभव आला. बुद्धाचे तत्त्वज्ञान हे मानवतेचे ,समतेचे,बंधुतेचे आणि न्यायाचे आहे. धम्मामध्ये कर्मकांड नाही. उपासतापास नाही. भीती दाखवून विविध व्रत वैकल्य करून घेणे अशा प्रकारे कुठल्याच वाईट रूढी परंपरा प्रथा नाहीत. म्हणून मला हा धम्म स्त्री- पुरुष समानतेचा आणि मानवतेचा, समतेचा संदेश देणारा वाटतो. म्हणून मी बुद्ध धम्माचा स्वीकार केला. आणि आज ताठ मानेने, अभिमानाने आणि गर्वाने सांगते की मी बुद्धाची लेक आहे, असे परखड प्रतिपादन प्रा. डॉ.संबोधी देशपांडे यांनी आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून सांगितले. आपल्या अमोघ शैलीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत, विविध विषयांना हात घालीत, परिपूर्ण आकलनाचे समाज जीवनाचे आलेख त्यांनी श्रोत्यांसमोर मांडले. मानवता हाच मानवाच्या आयुष्याचा अमूल्य दागिना आहे. असे देखील त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड हया होत्या, त्यांनी देखील आपली जडणघडण आपल्या मनोगतातून व्यक्त केली. मध्यमवर्गीय परिस्थिती मधून यश मिळवत प्रशासन सेवेमध्ये दाखल झाले. प्रशासनात काम करताना आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला पाहिजे. आपण आपली कार्याने अमिट छाप सोडली पाहिजे. त्याशिवाय गत्यंतर नाही. बऱ्याचदा आपल्याला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न देखील होतो. पण तो प्रयत्न सफल होऊ देता कामा नये. त्यासाठी सतत जागृत असले पाहिजे. सजग असले पाहिजे. नव्या पिढीने विशेषतः तरुणांनी मोक्याच्या जागा पटकवल्या पाहिजेत. त्यासाठी पालकांनी आपल्या कमाईतील ७० टक्के खर्च हा शिक्षणावर आणि उरलेला ३० टक्के खर्च राहणीमान ,खानपान यावर खर्च केला पाहिजे. अशी नव संकल्पना त्यांनी मांडली. प्रत्येक विहारांमध्ये दर रविवारी “धम्म मैत्री संवाद” आयोजित केला पाहिजे. आणि भवतालामध्ये होणाऱ्या घडामोडींचा आणि घटकांचा अभ्यास आणि चर्चा त्या ठिकाणी घडल्या पाहिजेत. असे देखील ते आपल्या अध्यक्षीय मनोगत म्हणाल्या.
प्रमुख अतिथी म्हणून लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे यादेखील उपस्थित होत्या. त्यांनी देखील याप्रसंगी आपले मनोगत मांडले, परिस्थिती बिकट आहे .काळ मोठा कठीण आहे. आपण सर्वांनी अखंड सावधान असणे गरजेचे आहे. व्यवस्था “गंगाभागीरथीचा” नवीन प्रयोग करून स्त्रियांना परत गुलामी मध्ये ढकलण्याचा सोयीस्करपणे डाव रचत आहे. तो डाव वेळीच ओळखला पाहिजे ,तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री मुक्तीसाठी केलेल्या कार्याचे चीज होईल. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी स्त्रियांच्या मुक्तीचा जाहीरनामा मांडला. पण तथाकथित धर्म मार्तंडांनी तो कायदा पास होऊ दिला नाही.कायदा पास झाला नाही म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायदामंत्री पदाचा राजीनामा दिला. स्त्रियांसाठी मंत्री पदांचा राजीनामा देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर उभ्या जगातील एकमेव नेते आहेत .हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन संघर्ष त्यांनी उभारलेल्या कार्य अखंडित चालू ठेवण्यासाठी प्रत्येकाने जीवाची बाजी लावली पाहिजे. संविधान धोक्यात आहे ,हे वेळीच ओळखलं पाहिजे आणि संविधान विरोधी लोकांना संविधानाने चोख उत्तर दिलं पाहिजे, तरच भारतीय संविधान जिवंत राहील. त्यासाठीच प्रत्येक कार्यकर्त्यांनी जीवाची बाजी लावली पाहिजे, असे स्पष्ट मत प्रतिभा शिंदे यांनी मांडले.मंचावर रमाई जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष यशोदाबाई तायडे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या
सुरुवातीला महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्प अर्पण करण्यात केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन .रामाराव सोसायटीचे चेअरमन आयु. देविदास एम. अडकमोल यांनी केले. त्यांनी सोसायटीच्या जडणघडणीचा संघर्ष आपल्या शब्दांमधून मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार संस्थेचे सचिव आयु. श्रीकांत तायडे यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ.मिलिंद बागुल, प्राचार्य यशवंत मोरे,बौध्दाचार्य बावीस्कर गुरूजी, प्रा.डाॅ. संजीव साळवे ,प्रा. डॉ. संजय रणखांबे, प्रा. डॉ.प्रवीण गांजरे, प्रा. नितीन इंगळे ,प्रा.योगेश खैरनार ,विजयकुमार मोर्य,प्रा.डॉ. महेंद्र सोनवणे, देवेंद्र पाटील,विनोद निकम, प्रा.दीपक साळवे तसेच एन. रामाराव सोसायटीच्या संचालिका अंजनाबाई अडकमोल,माया पवार,सर्व संचालक व सर्व रहिवासी माता भगिनी,षुरूष ,सानथोर मंडळी आणि श्रीरत्न कॉलनीतील व संजीवनी नगर मधील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *