1 min read

व्यवस्था परिवर्तक – महात्मा जोतिराव फुले

Loading

व्यवस्था परिवर्तक – महात्मा जोतिराव फुले

महात्मा जोतिराव फुले एकदा त्यांचे मित्र सखाराम यशवंत परांजपे यांच्या लग्नाच्या वरातीत एकदा सामील झाले होते. निव्वळ जात कनिष्ठ असल्याच्या कारणावरून त्यांना लग्नाच्या वरातीतून अपमानास्पदरित्या हाकलून देण्यात आले. झालेल्या अपमानाबद्दल जोतिरावांना वाईट वाटले. घडल्या प्रकाराबाबत त्यांनी चिंतन केले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्यासारख्या कनिष्ठ वर्गातील आर्थिक दृष्ट्या सुस्थितीत असणाऱ्या व्यक्तींची अशी मानहानी होते आणि अपमानाला तोंड द्यावे लागते तर त्यांच्यापेक्षा खालच्या जातीत जन्माला आलेल्या व अशिक्षित असलेल्या वर्गातील लोकांचे किती हाल होत असतील, त्यांना किती दयनीय अवस्थेत जगावे लागत असेल, किती अपमानाला सामोरे जावे लागत असेल. खूप विचारांती त्यांच्या लक्षात आले आणि त्यातूनच महात्मा जोतिराव फुले यांनी शुद्रादीशुद्रांकरीता शैक्षणिक कार्य करण्याचे मनाशी निश्चित केले. शिक्षणाची सुरुवात त्यांनी आपल्या घरापासून केली. प्रथमतः त्यांनी सावित्रीमाई फुले यांना शिकवले. सावित्रीमाई सोबतच स्वतःची आत्या सगुनाबाई यांना देखील शिकविले. सावित्रीमाई या देशातील पहिल्या स्त्री शिक्षिका झाल्या त्यांच्या माध्यमातून महात्मा जोतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाची व्यवस्था केली.

प्रास्ताविक
महात्मा जोतिराव फुले हे स्री शिक्षणाचे उद्गाते म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कटगुन येथील माळी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई असे होते. जोतिरावांची आई लहानपणीच वारली होती. आजीने व चुलत आत्याने जोतिरावांचा बालपणी सांभाळ केला. त्यांच्या जन्मतिथीची निश्चित नोंद कुठे आढळत नाही. जोतिरावांनी आपल्या आठवणीत असे म्हटले आहे की, त्यांच्या आजीच्या मतानुसार शनिवार वाडा जळाला त्याच्या आदल्या दिवशी त्यांच्या जन्म झाला. जोतिराव नऊ महिन्याचे असताना त्यांच्या आईचे निर्वाण झाल्यामुळे त्यांना मातृसुख फारसे मिळाले नाही. जोतिरावांना बालपणापासूनच शिक्षणाची आवड होती. गोविंदराव फुले हे देखील त्यांना शिक्षण देण्यास तयार होते. त्यामुळे सण 1833 ते 1836 या काळापर्यंत त्यांचे शिक्षण व्यवस्थित सुरू होते. पण पुढे एका ब्राह्मणाने गोविंदरावांना सांगितले की ‘ब्राह्मणेतरांनी शिकणे महापाप आहे’. या भ्रामक समजूतीमुळे सण 1836 मध्ये ज्योतिरावांचे शिक्षण थांबले. पण पुढे गोविंदरावांचे एक स्नेही गफ्फार मुंशी बेग यांनी गोविंदरावांचे मत परिवर्तन घडवून आणले आणि ज्योतिरावांच्या शिक्षणाला पुन्हा प्रारंभ झाला. मध्यंतरीच्या काळात जोतिरावांनी कसून शारीरिक व्यायाम केला आणि बल संवर्धन केले. आत्मरक्षणासाठी उस्ताद लहुजी मांग यांच्याकडून मल्लविद्या आणि दांडपट्टा शिकून घेतला.
तत्कालीन काळाच्या प्रथेनुसार सन 1840 मध्ये म्हणजे वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील खंडोजी नेवसे पाटील यांची नऊ वर्षाची कन्या सावित्री यांच्याशी झाला. जोतिरावांनी स्वतः सावित्रीमाईंना शिकवले. सावित्रीमाई सोबतच स्वतःची आत्या सगुनाबाई यांना देखील शिकवले. सावित्रीमाई फुले प्रशिक्षित शिक्षिका बनल्या. महाराष्ट्रातील प्रथम शिक्षिका बनण्याचा बहुमान त्यांनी प्राप्त केला. ‘ज्योतिरावांनी आधी केले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे स्त्री शिक्षणाची सुरुवात आपल्या घरापासून केली.
थॉमस पेन या फ्रेंच तत्त्वज्ञाचा ग्रंथ ‘राइट्स ऑफ द मॅन’ जोतिरावांनी तरुणपणीच वाचला होता. अनेक संस्कृत ग्रंथ,स्मुर्ती,वेद, पुराने यांचे देखील त्यांनी वाचन केले होते. इंग्रजी साहित्याचे त्यांनी वाचन केले होते. कबीरांच्या विचाराचा देखील त्यांनी अभ्यास केला होता. अनेक पाश्चिमात्य विचारवंतांचे ग्रंथ त्यांनी वाचले. बालवयात जातीयतेचे आणि सामाजिक विषमतेचे चटके त्यांनी सहन केले. या सर्व बाबींचे त्यांनी सखोल चिंतन केले. या चिंतनातून त्यांना खात्री झाली की जातीभेद हा मानवनिर्मित आहे. ईश्वरनिर्मित नाही. मानवी हक्क आणि अधिकार हे प्रत्येक व्यक्तीला मिळायला हवेत. हे त्यांचे नैसर्गिक अधिकार आहेत. मानवी हक्क आणि अधिकारांसाठी सामाजिक क्रांतीची गरज आहे. सामाजिक आणि वैचारिक क्रांतीसाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. शिक्षणाच्या माध्यमातून लोकांची विचारधारा व मानसिकता बदलवता येऊ शकते अशी त्यांना खात्री झाली. ते म्हणतात
“विद्येविना मती गेली,
मती विना गती गेली,
गतीविना नीती गेली,
नीतीविना वित्त गेले
वित्त विना शूद्र खचले
एवढे सर्व अनर्थ एका अविद्येने केले…”

महात्मा फुले यांच्या काळातील स्त्री जीवन–
महात्मा फुले यांच्या काळात स्त्रियांचे जीवन अत्यंत हलाखीचे व दयनीय होते. स्त्रीला फक्त एक भोग वस्तू म्हणून बघितले जात होते. स्त्रीला गुलाम म्हणून वागणूक दिली जात होती. स्त्रियांना कोणत्याही प्रकारचे हक्क आणि अधिकार नव्हते. सगळीकडे पुरुषप्रधान व्यवस्था असल्यामुळे स्त्रियांच्या मताला किंवा विचारांना कोणतीही किंमत नव्हती. स्रीया देखील मानव आहेत, त्यांना देखील जीव आहे, भावना आहेत, त्यांना देखील विचारात घेतले पाहिजे, त्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे असे कोणालाही वाटत नव्हते. स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारामुळे त्या देखील मुक्या व अबोल बनल्या होत्या. ही परमेश्वराचीच इच्छा आहे आणि याकरिताच त्यांचा जन्म झालेला आहे हे त्यांच्या मनावर बिंबवले गेले असल्याने त्या सर्व निमूट पणे सहन करीत होत्या. स्त्रियांना शिक्षणाचा लिखाणाचा वाचनाचा कोणताही अधिकार नसल्यामुळे त्यांना त्यांचे हक्क आणि अधिकार कळत नव्हते. बालजरठ विवाह, द्विभार्या विवाह, सतीची चाल, पतीच्या मृत्यूनंतर केशवपन, विधवा स्त्रियांवरील विविध अमानुष बंधने यामुळे त्यांचे जीवन नरका समान झाले होते.

शुद्रादीशूद्रांच्या शिक्षणाबाबत ज्योतिरावांचे विचार —
शिक्षणापासून वर्षानुवर्षे वंचित ठेवल्यामुळे शूद्र आणि अतिशूद्र वर्गाची परिस्थिती अतिशय दयनीय झाली होती. या दैनंदिन्यातून बाहेर निघण्यासाठी शिक्षण हाच एक उपाय आहे असे त्यांना वाटत होते. शिक्षणाचे महत्त्व सांगताना ज्योतिराव म्हणतात, “आपल्या गुलामगिरीला इंग्रज जबाबदार नाहीत, तर आपले अज्ञान जबाबदार आहे” त्यासाठी लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार करून त्यांच्यात जाणीव जागृती निर्माण करणे हे गुलामगिरी नष्ट करण्याचे प्रभावी साधन आहे असे ते मानत. भारतात शिक्षणाचा प्रचार प्रसार व्हावा या इंग्रजांच्या धोरणाबद्दल त्यांच्या मनात काही शंका होत्या, पण इंग्रजांच्या नि:पक्षपातीपणावर त्यांचा विश्वास होता. त्यांच्या मते इंग्रज शासन शैक्षणिक क्षेत्रात भेदभाव करीत नाहीत. इंग्रज शासनाने सर्व जाती-धर्मांच्या मुलांसाठी शाळा खुल्या केलेल्या आहेत. पण ज्योतिरावांच्या मनात वेगळीच खंत होती. त्यांना असे वाटायचे की, शाळेत शिकविण्याचे काम ब्राह्मण पंतोजी करतात आणि ते जातीयतेमुळे शूद्रादी शुद्रांच्या मुलांना शिक्षण देण्यात आंतर ठेवतील. परिणामी महार मांगास सुयोग्य शिक्षण मिळू शकणार नाही. म्हणून शूद्र जातीतील शिक्षक म्हणजे पंतोजी (शिक्षक) निर्माण व्हावे असे त्यांना वाटत असे. जेणेकरून शूद्र विद्यार्थी विकसित व्हावा असे त्यांचे प्रामाणिक मत होते. सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथात ते म्हणतात, “आर्य लोकांच्या एकतर्फी ग्रंथात शूद्रादीशुद्रास विद्या न देणे विषयी कडेकोट बंदोबस्त केला आहे आणि धूर्त आर्यभट्ट ब्राह्मण आपली पोटे भरण्याकरिता खेडेगावातील अतिशुद्रांची मुले शाळेतून शिकून विद्वान होणार नाहीत असे खात्रीने सांगतो.”
शिक्षणाबाबतचे जोतिरावांचे विचार त्यांच्या अभ्यासातून, स्व अनुभवातून चिंतनातून, निरीक्षणातून, श्रवणातून अतिशय परिपक्व आणि निश्चित झालेले होते. स्वतःचा उद्धार करण्यासाठी धर्मभेद, जातीभेद, वर्णभेद इ. दूर करण्यासाठी शिक्षणाशिवाय तर उपाय नाही असे त्यांचे ठाम मत होते. शिक्षणाच्या प्रवाहात सर्वसामान्यांना आणण्यासाठी त्यांनी आणि सावित्रीमाई फुले यांनी सर्व आयुष्य खर्च केले.
स्री शिक्षणाची सुरुवात
महात्मा जोतिराव फुले यांनी सन 1848 मध्ये पुणे येथील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. अशा प्रकारची फक्त मुलींसाठीची शाळा भारतात इतरत्र कोठेही नव्हती. बंगालचे सुप्रसिद्ध समाजसेवक ईश्वरचंद्र विद्यासागर हे महात्मा जोतिराव फुले यांचे समकालीन होते सन 1853 साली त्यांनी आपल्या गावात एक शाळा सुरू केली. आणि मग नंतर त्या शाळेला मुलींच्या शाळेची शाखा जोडली केवळ मुलींची स्वतंत्र शाळा काढण्याचे धाडस महात्मा जोतिराव फुले यांच्याशिवाय इतर कोणीही केले नाही. भारतात तो मान फक्त महात्मा जोतिराव फुले यांच्याच नावावर आहे. पुण्यासारख्या कर्मठ सणातण्यांच्या बालेकिल्ल्यात जोतिरावांनी मुलींसाठी शाळा सुरू केली त्यावेळेस त्यांचे वय फक्त 21 वर्षे होते.
महात्मा जोतिराव फुले यांनी दुसरी शाळा बहुजन करिता 1851 मध्ये सुरू केली सन 1855 मध्ये अस्पृश्यांकरिता शाळा सुरू केली. सन 1848 ते सन 1855 या काळात त्यांनी एकूण 18 शाळा सुरू केल्या. महात्मा फुले यांच्या पहिल्या शाळेत खालील सहा विद्यार्थिनी होत्या. त्यात चार ब्राह्मण विद्यार्थीनी होत्या एक विद्यार्थिनी मराठा समाजाची होती तर एक विद्यार्थिनी धनगर समाजाची होती. त्यांची नावे खालील प्रमाणे
1.अन्नपूर्णा जोशी
2.दुर्गा देशमुख
3.माधवी थत्ते
4.सुमती मोकाशी
5.सोनू पवार
6.जनी कर्डिले
या वरून आपल्या लक्षात येईल की महात्मा ज्योतिराव फुले हे ब्राह्मण व्यक्तीच्या विरोधात नव्हते तर ब्राह्मण्यवादी, सनातनी, कर्मठ, जातीयवाद जोपासणाऱ्या आणि माणसामाणसात भेद निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात होते.
महात्मा ज्योतिराव फुले शिक्षणाबाबत म्हणतात,
” विद्या शिकताच पावल ते सुख,
घ्यावा माझा लेख जोती म्हणे …!!!
आता तरी तुम्ही मागे येऊ नका,
झुगारून टाका मनू मत …!!!
विद्या शिकताच पावर ते सुख
घ्यावा माझा लेख जोती म्हणे…!!! “
स्री शिक्षणाची सद्यस्थिती
महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी हजारो हालअपेष्टा सोसत, शिव्या – शाप, दगड विटांचा मारा सहन करत स्री शिक्षणाचे रोप लावले. आज ते रोप चांगलेच बहरले आहे. त्याचे रूपांतर आज वटवृक्षात झालेले आपणास आढळून येते. आज समाजात स्त्रियांची शिक्षणाचे प्रमाण वाढलेले आहे. स्त्रीया जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात हीरहिरीने भाग घेताना दिसतात. कालपर्यंत फक्त “चूल आणि मूल” सांभाळणारी स्री आज प्रधानमंत्री, संरक्षणमंत्री किंवा राष्ट्रपती देखील बनू लागली आहे. आत्मनिर्भर होऊन स्वावलंबी जीवन जगत आहे. राष्ट्रविकासात, समाजविकासात. कुटुंब विकासात अत्यंत हिरहिरीने आपले योगदान देत आहे. कालपर्यंत गावकुसाबाहेर राहणारा अस्पृश्य समाज आज समाजाच्या मुख्यप्रवाहात सामील झालेला आहे. शिक्षणाच्या माध्यमातून मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहे. शिक्षणाचे प्रमाण त्यांचे वाढले आहे. शिक्षणामुळे आज स्वाभिमानाने आणि आत्मसन्मानाने जीवन जगत आहे. शैक्षणिक व्यवस्था परिवर्तनाचे सर्व श्रेय महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी घेतलेल्या कष्टाला जाते त्यांच्या या महान मानवतावादी, क्रांतिकारी कार्यास आणि विचारास माझे शतशः नमःन….🙏🙏🙏

स्त्री शिक्षणाबाबत ज्योतिरावांचे विचार —
महात्मा जोतिराव फुले यांचा स्त्री शक्तीवर विश्वास होता. समस्त स्त्री वर्गाविषयी त्यांच्या मनात आदराचे स्थान होते.
“लग्नाची ती एक पत्नी सोडूनी, दुज्या सर्व भगिनी”
या तत्त्वाचे ते जीवनात कसोशीने पालन करीत होते. स्त्री शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे असे त्यांचे मत असल्याने त्यांनी आपल्या शैक्षणिक कार्याचा प्रारंभ स्त्री शिक्षणापासून केला. मुलींना शिक्षण दिल्यास ती माहेर आणि सासर या दोन्ही घराण्यांचा उद्धार करेल, त्यांचा विकास घडवून आणेल असे त्यांचे मत होते. स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकेल. स्त्री तिच्या लेकराबाळांना देखील शिकवेल आणि संपूर्ण कुटुंब शहाणे होईल. जोतिराव म्हणतात, स्त्रियांच्या शाळेने सर्वप्रथम माझे लक्ष वेधले “पूर्ण विचारांती माझे मत असे झाले की, पुरुषांच्या शाळेपेक्षा स्त्रियांच्या शाळेची आवश्यकता अधिक आहे. स्त्रीया आपल्या मुलांना त्यांच्या वयाच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी जे वळण लावतात त्यातच त्यांच्या शिक्षणाची बिजे असतात. “

लेखक-

प्रा.डॉ.राहुल यशवंतराव निकम,
समाजकार्य महाविद्यालय, चोपडा, जि.जळगाव.
संपर्क क्र.9823222659

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *