ठाणे जिल्हा अजिंक्यपद आट्यापाट्या स्पर्धेत मातोश्री रखमाबाई गायकवाड विद्यालयाने विजयी
![]()


ठाणे जिल्हा अजिंक्यपद आट्यापाट्या स्पर्धेत मातोश्री रखमाबाई गायकवाड विद्यालयाने विजयी
ठाणे,डोंबिवली ( मनिलाल शिंपी )::ठाणे जिल्हा आट्यापाट्या असोसिएशन चे अध्यक्ष सन्माननीय श्री जगन्नाथजी सखाराम शिंदे (आप्पासाहेब) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, ठाणे जिल्हा आट्यापाट्या असोसिएशनच्या मान्यतेने आरंभ स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या माध्यमातून दि. २७ आणि २८ जानेवारी रोजी आप्पासाहेब शिंदे चषक २०२३ या १ली ठाणे जिल्हा आट्यापाट्या अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन मोठ्या दिमाखात दादासाहेब गायकवाड क्रीडांगण, कल्याण येथे करण्यात आले होते. सदर स्पर्धेसाठी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून १६ मुलांचे आणि १४ मुलींचे संघ सहभागी झाले होते.
स्पर्धेच्या समारोप समारंभ प्रसंगी सन्मानीय श्री. जगन्नाथजी (आप्पासाहेब) शिंदे, महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षा श्रीमती. रुपालीताई चाकणकर, कोळसेवाडी पोलीस स्टेशन चे ए.पी.आई श्री. मल्लिनाथ डोके, शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री. विलास वाघ, ठाणे जिल्हा आट्यापाट्या असोसिएशन चे पदाधिकारी श्री. उदय नाईक आदी मान्यवर उपास्थित होते. श्रीमती. रुपालीताई चाकणकर यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा तर आयोजकांचे भरभरून कौतुक केले. तसेच सर्व मान्यवर व आरंभ स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष रोशन सकपाळ, सेक्रेटरी देवकी कोकाटे, खजिनदार अक्षय बक्कम, सभासद ओंकार सुर्वे, सोहम चव्हाण, विजय बडगुजर यांच्या उपस्थितीत सत्कारमूर्ती श्री. जगन्नाथजी (आप्पासाहेब) शिंदे याचा वाढदिवस देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मुलांच्या गटातील स्पर्धेचा अंतिम सामना मातोश्री विद्यालय विरुद्ध शिवाजी स्पोर्ट्स अकॅडेमी या दोन तुल्यबळ संघात रंगला आणि याच रोमहर्षक सामन्यात २-१ सेट च्या फरकाने, कल्याण पूर्व येथील मातोश्री रखमाबाई गायकवाड विद्यालयाने अंतिम विजेतेपद पटकविले आणि शिवाजी स्पोर्ट्स अकॅडेमी कल्याण पश्चिम या संघाला उपविजते पदावर समाधान मानावे लागले. तर प्रगती विद्यालय, भाल वसार आणि भारतीय सैनिकी विद्यालय, खडवली या संघाना संयुक्त तृतीय क्रमांक मिळाला. तसेच मुलींच्या गटात स्पर्धेत आपले वर्चस्व गाजवणाऱ्या मातोश्री विद्यालय संघाने जे.सी. एस. मराठी शाळा, भाल वसार संघाला २-० अशा सरळ सेट मध्ये पराभूत करून अजिंक्यपदावर आपले नाव कोरले. तर अभिनव विद्यालय आणि वर्तकनगर विद्यालय या संघाना संयुक्त तृतीय पारितोषिक मिळाले.
वैयक्तिक पारितोषिके :
मुले गट
उत्कृष्ट आक्रमक : सार्थक बांद्रे (मातोश्री विद्यालय),
उत्कृष्ट संरक्षक : रोहित साबळे (शिवाजी स्पोर्ट्स अकॅडेमी),
उत्कृष्ट सूर : प्रसाद वाळवंटे (भारतीय सैनिकी विद्यालय)
मुली गट
उत्कृष्ट आक्रमक : देवेश्री पाटील (वर्तकनगर विद्यालय),
उत्कृष्ट संरक्षक : प्राची निवते (मातोश्री विद्यालय),
उत्कृष्ट सूर : ईशिका म्हात्रे (जे. सी. एस. विद्यालय)
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते श्री. अंकुर आहेर व कु. शिवानी गुलाबराव पाटील यांनी केले.

