शेळावे गणातील दुष्काळी प्रश्नांसाठी प्रशासनाकडे निवेदन , पाणी, पीकनुकसान भरपाई, चारा व रोजगाराच्या तातडीच्या उपाययोजनांची मागणी

अमळनेर प्रतिनिधी
शेळावे गणातील गावांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर, पशुपालक व विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री यांना तहसीलदार, पारोळा यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.
शेळावे गणातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई, शेतीपिकांचे नुकसान, पशुधनासाठी चाऱ्याची समस्या तसेच ग्रामीण भागातील रोजगाराचा प्रश्न गंभीर होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
या आहेत प्रमुख मागण्या
निवेदनात पीकनुकसानीचे पंचनामे करून पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या गावांमध्ये तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा तसेच पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी आहे.
पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध करून देऊन आवश्यक त्या ठिकाणी चारा छावण्या सुरू कराव्यात, मनरेगा व रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
याशिवाय पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार पीककर्ज पुनर्गठन व कर्जवसुलीस मुदतवाढ अथवा स्थगिती, पात्र विद्यार्थ्यांना लागू शासन निर्णयानुसार शैक्षणिक व परीक्षा शुल्क सवलत, तसेच पात्र शेतकऱ्यांना शेतीपंप व वीजसवलतींचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी नाला खोलीकरण, बंधारे, गाळ काढणे, शेततळे व इतर जलसंधारणाची कामे प्राधान्याने हाती घेण्याची मागणीही करण्यात आली आहे.
डॉ. समाधान मैराळे यांची प्रतिक्रिया
डॉ. समाधान मैराळे म्हणाले, “शेळावे गणातील नागरिकांना दुष्काळी परिस्थितीचा थेट सामना करावा लागत आहे. पिण्याचे पाणी, शेतकऱ्यांचे पीकनुकसान, पशुधनासाठी चारा आणि रोजगार हे प्रश्न नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहेत. त्यामुळे या मागण्यांकडे केवळ कागदोपत्री न पाहता संबंधित विभागांनी तातडीने प्रत्यक्ष कार्यवाही करणे आवश्यक आहे. पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार मदत मिळावी आणि पाणी व चाऱ्यासारख्या अत्यावश्यक बाबींमध्ये विलंब होऊ नये, ही आमची प्रमुख मागणी आहे.”
या निवेदनावर डॉ. समाधान मैराळे, प्रदीप पाटील, गणसिंग पाटील, गोरख भिल, शुभम पाटील, जितेंद्र पाटील, रोहिदास पाटील, मयूर पाटील, महेंद्र पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदनाद्वारे शेळावे गणातील दुष्काळी प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
गझलेची मैफल, साहित्यिकांच्या भेटीगाठी अन् आठवणींचा सुंदर प्र...
नगराध्यक्षा लिलाताई चौधरी व नगरसेविका ज्योती पाटील यांना "सम...
दुष्काळाच्या वणव्यात शेतकरी होरपळतोय; महाविकास आघाडीचा सरकार...
अमळनेरवासियांना आपल्या तालुक्याचा खासदार असल्याचा फायदा मिळत...
गझलेच्या दोन ओळींत उमटतो समाजाच्या वेदनांचा हुंकार! , ‘गझ...
ज्ञानाची सरस्वती, सेवाभावाची शक्ती अन् नेतृत्वाची दुर्गा! ...