पत्रकारांनी संकटांकडे संधी म्हणून पाहावे ः राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के व्हॉईस ऑफ मीडियाच्या सांगलीतील केडर कँपला पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगली (प्रतिनिधी) ः व्हॉईस ऑफ मीडियाचा जन्मच संकटातून झाला आहे. जेव्हा जगावर कोरोनासारखे महाभयंकर संकट होते त्या संकटातून व्हॉईस ऑफ मीडियाचा जन्म झाला. त्यामुळे संकटे आले की संधी निर्माण होते. पत्रकारांनी संकटांकडे संधी म्हणून पाहावे असे आवाहन व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अनिल मस्के यांनी केले.
व्हॉईस ऑफ मीडिया व व्ही. ओ. एम. इंटरनॅशनल फोरमच्या वतीने सांगली येथे संघटनेचा पश्चिम महाराष्ट्र विभागीय केडर कँप उत्साहात पार पडला. यावेळी सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे यासह राज्यभरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के यांनी भूषविले. यावेळी प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया, उपाध्यक्ष संगम कोटलवार, महिला आघाडीच्या राष्ट्रीय संघटक रश्मी मारवाडे, प्रदेशाध्यक्ष वैशाली पाटील तसेच व्याख्याते अभय भंडारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या केडर कँपचे उद्घाटन सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी व जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या हस्ते झाले.
विजय चोरडिया म्हणाले की, पत्रकारांनी पत्रकारांसाठी आरोग्य विमा उतरावा, आकस्मिक निधनानंतर पत्रकारांच्या कुटुंबाला मदतीची गरज असते. व्हाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातृून अनेक पत्रकारांना विमा उतरवला गेला. त्यामुळे अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या काही पत्रकारांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळाली. संघटना एखादा कार्यक्रम राबविते ते पत्रकारांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या हितासाठी. त्यामुळे व्हॉईस ऑफ मीडियाचा आरोग्य विमा उतरविण्याचा कार्यक्रम संघटनेने प्रभावीपणे राबवावा. मुलांचे शिक्षणासाठी जिल्हा व तालुकास्तरावर शैक्षणिक कीटचे वाटप होते. यामागे संबंधित पत्रकाराच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा असा उद्देश असतो. हा उद्देश घेऊन संघटना राज्यभर काम करते. केडर कँपच्या माध्यमातून पत्रकारांना प्रशिक्षित करण्याचा व पुढे येणार्या आव्हानांना सामोरे कसे जायचे हे सांगितले जाते. नवीन अद्यावत तंत्रज्ञान अवलंबिण्याबरोबरच निर्भयपणे पत्रकारिता कशी करायची हे केडर कँपच्या माध्यमातून समजते. केडर कँपच्या माध्यमातून नवीन ऊर्जा घेऊन जायची आहे. ही ऊर्जा प्रत्येकांनी जिल्ह्यात, तालुक्यात गेल्यानंतर ताकदीने काम केले पाहिजे. आपल्या सहकार्यावर आर्थिक व आरोग्याच्या दृष्टीने अडचण आलीच तर ताकदीने व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. हे काम करण्यासाठीच ही संघटना आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये संघटनेचे काम चांगल्या पध्दतीने सुरू आहे. मात्र ते अजून वाढविणे गरजेचे आहे. संघटनात्मक बांधणीचे लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांनी व्यक्त केले.
जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी म्हणाले, लोकशाही टिकविण्यात पत्रकारितेचा मोठा वाटा आहे. अनेक देशात लोकशाही टिकली नाही पण आपल्या देशात टिकली याचे महत्त्वाचे कारण म्हणजे १९ व्या शतकापासून चांगला प्रखर असा पत्रकारितेचा वारसा आपल्याला लाभला आहे. आता हळूहळू पत्रकारितेचे स्वरूप बदलत आहे. पहिले वर्तमानपत्र, आता इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजीटल मीडिया, चॅनल्स आलेले आहेत. त्यामुळे पत्रकारितेचे स्वरूप खूप बदललेले आहे. मोठ्या प्रमाणात जबाबदारी आपल्यावर आहे. पत्रकारितेची विश्वासार्हता जपणे हे मोठे चॅलेंज आपणावर आहे. आपण सगळे नक्कीच या चॅनेलला सामोरे जावू आणि ते स्वीकारू असा विश्वास पत्रकारांना प्रशिक्षित करण्यासाठी अशा प्रकारचे केडर कँप घेत व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेने चांगले काम सुरू केले आहे.
जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे म्हणाले, पत्रकार नेहमी तळागाळातील माणसाचा आवाज शासन व प्रशासनापर्यंत पोचविण्याचे काम करतात. चुकीला चूक म्हणणे व योग्य असलेल्याची बाजू घेणे या दोन्ही बाजूचा समतोल राखणे यासाठी सकारात्मक काम पश्चिम महाराष्ट्रामध्ये होत आहे. पत्रकार सगळ्यांचा आवाज ऐकतात पण पत्रकारांचा आवाज कोण ऐकणार यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया ही संघटना कार्यरत आहे याचे कौतुक आहे.
पत्रकार, त्यांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य, कुटुंब तसेच पत्रकारांसाठी पेन्शन या पंचसूत्रीवर व्हॉईस ऑफ मीडिया ही संघटना काम करते. याचे विशेष कौतुक असल्याचे विशाल नरवाडे यांनी सांगितले. शासनाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ पत्रकारांना मिळवून देण्यासाठी कटीबध्द असल्याची ग्वाही नरवाडे यांनी यावेळी दिली.
यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अनिल मस्के म्हणाले, व्हॉईस ऑफ मीडियाचा जन्मच संकटातून झाला आहे. जेव्हा जगावर कोरोनासारखे महाभयंकर संकट होते त्या संकटातून व्हॉईस ऑफ मीडियाचा जन्म झाला. त्यामुळे संकटे आले की संधी निर्माण होते. संघटनेची बांधणी करताना येणार्या संकटाकडे यादृष्टीनेच पाहिले पाहिजे. संदीप काळे सरांनी कोरोनाकडे संधी म्हणून बघितले आणि व्हॉईस ऑफ मीडियाची स्थापना करून आज जगातील ८७ देशात ही संघटना पोचवली आहे. महाराष्ट्रातच नाही तर देशभर संघटन पोचले आहे. सध्या पत्रकारितेवरच संकट आले आहे. जगात १८० देशात लोकशाही आहे पण पत्रकारितेच्या स्वातंत्र्याबाबत भारत १५७ व्या क्रमांकावर आहे. भारताकडे महासत्ता म्हणून पाहिले जाते तिथे पत्रकारांचे स्वातंत्र्य कितपत आहे हे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. शहरात, ग्रामीण भागातील पत्रकार अत्यंत वाईट अवस्थेत आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेकडे पाहिले जाते मात्र जगात आमच्यासारखी वाईट अवस्था कोणाचीच नाही. न्यायव्यवस्थेला जेव्हा न्याय मागावा लागते तेव्हा ती आमच्याकडे येते पण ज्यावेळी आम्हाला काही द्यायची वेळ येते त्यावेळी कोणी मदतीला येत नाही. गेल्या ४ वर्षापासून पत्रकारांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहे पण शासन प्रतिसाद देत नाही. या महामंडळाच्या माध्यमातून पत्रकारांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे. यातून पत्रकार केवळ पत्रकारितेवर अवलंबून न राहता अन्य काही व्यवसाय करतील व आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. यासाठी या महामंडळाची गरज आहे. आमच्या पत्रकारांचे पोट भरले असते तर या सत्तेचा माज आम्हीच उतरवला असता.
अनिल मस्के म्हणाले, व्हॉईस ऑफ मीडियाची जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर मजबूत बांधणी करावी, संघटनेसाठी पारदर्शीपणे व वैध मार्गाने निधी उभारावा. यातून पत्रकारांच्याा कल्याणकारी योजना, आरोग्य विमा उतरवावा असे आवाहन त्यांनी केले.
यानंतर अभय भंडारी यांचे ‘‘पत्रकारिता आणि समाज’’ या विषयावर मार्गदर्शन झाले.
व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेश उपाध्यक्ष संगम कोटलवार, महिला आघाडीच्या राष्ट्रीय संघटक रश्मी मारवाडे, प्रदेशाध्यक्ष वैशाली पाटील, राज्य सरचिटणीस तथा विभागीय अध्यक्ष सचिन मोहिते यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास सांगलीचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत कुकडे, सातार्याचे जिल्हाध्यक्ष अनिल करंदकर, कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील कांबळे, पुण्याचे जिल्हाध्यक्ष अझहर कादरी, सोलापूर महानगरचे अध्यक्ष धनराज बागले यांच्यासह राज्य सहसरचिटणीस दिपक ढवळे, सांगली जिल्हा कार्याध्यक्ष गणेश आवळे, सरचिटणीस अल्ताफ खतीब, नित्यानंद कुंभार, जे. वाय. पाटील यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील संघटनेचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत जिल्हाध्यक्ष सूर्यकांत कुकडे तर प्रास्ताविक पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष पश्चिम श्री. सचिन मोहिते यांनी केले. आभार अल्ताफ खतीब यांनी मानले.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
अमळनेर महिला मंचच्या ४९ महिलांची पंढरपूर वारी; विठुरायाच्या ...
अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प...
अमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवे...
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साने गुरुजी विद्यामंदिरचा प्...
अमळनेरमध्ये काँग्रेसच्या ‘वोट बचाव, देश बचाव’ अभियानाचा निर्...
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच ह...