कधी पाण्यासाठी वणवण, आज ‘ऑक्सिजन हब’ची ओळख , पातोंडा परिसर विकास मंचचा ‘सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ मध्ये गौरव , गावापासून दूर राहूनही मातीशी नाळ जपणाऱ्या तरुणांची प्रेरणादायी विकासगाथा

जलसंवर्धन, वृक्षलागवड, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत पातोंडा परिसर विकास मंचने ग्रामीण विकासाचा सर्वांगीण आदर्श निर्माण केला आहे.**
“चांगले लोक आणि चांगले विचार सोबत आले तर नगण्य असे काहीच नाही,” या विचाराला कृतीची जोड देत ५ जुलै २०१५ रोजी ‘पातोंडा परिसर विकास मंच’ची स्थापना झाली. नोकरी आणि व्यवसायानिमित्त बाहेरगावी गेलेल्या पातोंडा परिसरातील तरुणांनी आपल्या गावाशी असलेली नाळ जपत गावाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प केला. आज या संकल्पाचे रूपांतर जलसंवर्धन, पर्यावरण, शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रेरणादायी चळवळीत झाले आहे.
जिल्हा वित्त लेखाधिकारी श्री. कपिलजी पवार, पोलीस उपअधीक्षक श्री. कन्हैयालाल थोरात, श्री. रावसाहेब बोरसे, श्री. मगन सूर्यवंशी आदींच्या पुढाकारातून या विकासयात्रेला दिशा मिळाली. नियोजनापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीतून गावाचे चित्र बदलण्याचा प्रयत्न मंचाने केला.
जलसंवर्धनातून बदलली गावाची जलकथा
पातोंडा परिसरातील पिवळ्या मातीमुळे पावसाचे पाणी जमिनीत कमी मुरत होते. भूजलपातळी खालावल्याने शेतकऱ्यांना ५०० ते १,००० फुटांपर्यंत बोअर घेऊनही पाण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. ही परिस्थिती बदलण्यासाठी मंचाने २०१५-१६ पासून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेनुसार ‘सुटवा नाला’ खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम हाती घेतले.
सलग चार वर्षांच्या प्रयत्नांत सुमारे चार किलोमीटर नाल्याचे खोलीकरण करून अंदाजे आठ कोटी लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण करण्यात आली. यासोबतच १० ट्रेंच-कम-रिचार्ज शाफ्ट, गॅबियन बंधारे आणि सिमेंट बंधारे उभारण्यात आले.
या कामांमुळे भूजलपातळीत सुधारणा झाल्याचे दिसून आले. पूर्वी खोल बोअर करूनही पाणी न लागणाऱ्या भागात आता २०० ते २५० फुटांवर पाणी मिळू लागले, तर विहिरींमध्ये सुमारे ७० फुटांवर पाणी उपलब्ध होऊ लागले. दापोरी, खवशी आणि सोनखेडी परिसरातही जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जलसंवर्धनाच्या कामांचा विस्तार करण्यात आला.
वृक्षलागवडीतून ‘ऑक्सिजन हब’कडे वाटचाल
जलसंवर्धनासोबत पर्यावरण संवर्धनालाही मंचाने प्राधान्य दिले. २०१४-१५ पासून आजपर्यंत सुमारे आठ ते दहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षसंवर्धनाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तरुण, भजनी मंडळे आणि शाळकरी विद्यार्थ्यांच्या सहभागातून वृक्षदिंडी काढण्यात आली.
ध्यानकेंद्र परिसरात सुमारे २०० वृक्षांची लागवड करून ‘ऑक्सिजन हब’ विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विविध रोपवाटिकांमधून तयार केलेली १४ हजार ३७ रोपे नागरिकांना मोफत वितरित करण्यात आली. पाण्याच्या टंचाईशी झुंजणाऱ्या परिसरात हिरवाई वाढवण्याचा हा प्रयत्न पर्यावरणपूरक ग्रामीण विकासाचे उदाहरण ठरत आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे नवे दालन
ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात समान संधी मिळाव्यात, या उद्देशाने पातोंडा आणि मठगव्हाण येथे ‘स्वामी विवेकानंद अभ्यासिका’ उभारण्यात आल्या. सुमारे सात हजार पुस्तके, २४ तास वीज आणि अभ्यासासाठी आवश्यक सुविधांमुळे या अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची केंद्रे बनल्या आहेत.
श्री. दत्त विद्या मंदिरातील विज्ञान केंद्रातून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विज्ञान समजावून सांगितले जाते. जिल्हा परिषद शाळांना लॅपटॉप, एलईडी टीव्ही, स्वेटर आणि साउंड सिस्टीम उपलब्ध करून देण्याबरोबरच १२ हजार फुटांपेक्षा अधिक जाळीदार कुंपण उभारण्यासाठीही योगदान देण्यात आले. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देण्याचा हा प्रयत्न भविष्यातील सक्षम पिढी घडविण्यासाठी महत्त्वाचा आहे.
आरोग्यसेवा आणि सामाजिक बांधिलकी
कोरोना महामारीच्या काळात मंचाने सामाजिक जबाबदारी जपत प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट दिला. मास्क, सॅनिटायझर आणि आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वितरण करण्यात आले. डॉ. संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन आरोग्य मार्गदर्शनही आयोजित करण्यात आले.
याशिवाय मोफत वैद्यकीय शिबिरे, योग शिबिरे, आदिवासी बांधवांना दिवाळी फराळ वाटप आणि ‘एक गाव, एक गणपती’ यांसारख्या उपक्रमांतून सामाजिक एकोपा वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
गावाच्या विकासासाठी सामूहिक इच्छाशक्ती
पातोंडा परिसर विकास मंचचे कार्य म्हणजे केवळ विकासकामांची यादी नाही, तर गावाशी नाते जपणाऱ्या तरुणांच्या सामाजिक संवेदनशीलतेची प्रेरणादायी कहाणी आहे. जलसंवर्धनापासून पर्यावरण रक्षणापर्यंत, विद्यार्थ्यांच्या शिक्षणापासून आरोग्यसेवेपर्यंत आणि सामाजिक एकोप्यापासून ग्रामविकासापर्यंत मंचाने बहुआयामी योगदान दिले आहे.
“जलयुक्त शिवार अभियान आणि जैन उद्योग समूहाच्या प्रयत्नांतून झालेल्या कामाचे आम्हाला खूप समाधान आहे. पुढील काळातही असेच काम जोमाने सुरू राहिले तर हा परिसर नंदनवन होईल,” अशी भावना पातोंडा येथील श्री. निखिल बोरसे यांनी व्यक्त केली.
या कार्याची दखल घेत पातोंडा परिसर विकास मंचला बहुउद्देशीय संस्था म्हणून विशेष सन्मानही प्राप्त झाला आहे.
‘सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ मध्ये होणार गौरव
गावाच्या विकासासाठी एकत्र आलेल्या तरुणांची जिद्द, पर्यावरणाविषयीची बांधिलकी आणि सामाजिक परिवर्तनासाठी केलेले कार्य यांचा गौरव करण्यासाठी मराठी लाईव्ह न्यूजच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘सन्मान कर्तृत्वाचा – २०२६’ या सोहळ्यात पातोंडा परिसर विकास मंचचा सन्मान करण्यात येणार आहे.
शनिवार, १४ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता, इंदिरा भवन, स्टेट बँकेच्या मागे, अमळनेर येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
गाव सोडले तरी गावाशी नाते न तोडता, अंतर वाढले तरी सामाजिक बांधिलकी कमी होऊ न देता आणि चांगल्या विचारांना कृतीची जोड देत पातोंडा परिसर विकास मंचने ग्रामीण महाराष्ट्रासमोर प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे.
पातोंडा परिसर विकास मंच ही केवळ संस्था नाही, तर गावाच्या विकासाची सामूहिक इच्छाशक्ती आणि परिवर्तनाचा प्रेरणादायी दीपस्तंभ आहे. या उल्लेखनीय कार्याला मनःपूर्वक सलाम!
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
अमळनेर महिला मंचच्या ४९ महिलांची पंढरपूर वारी; विठुरायाच्या ...
अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प...
अमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवे...
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साने गुरुजी विद्यामंदिरचा प्...
अमळनेरमध्ये काँग्रेसच्या ‘वोट बचाव, देश बचाव’ अभियानाचा निर्...
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच ह...