आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने.....

"कवितेने मला जगवलं आणि कवितेने मला घडवलं", असे भावपूर्ण उद्गार सिने गीतकार बाळासाहेब सौदागर यांनी काढले. निमित्त होते अंमळनेर येथील मराठी वाड:मय मंडळ आणि प्रा. आप्पासाहेब र.का केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय आयोजित शारदीय व्याख्यानमाला. या संस्थेचे हे अमृत महोत्सवी 75 वे वर्ष आहे.या पाच दिवसांच्या शारदीय व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफतांना कवी बाबासाहेब सौदागर ह्यांनी" हिरव्या ऋतूंचा रंग महाल" या विषयावर आपले चित्रपट सृष्टीतील अनुभव मांडले.
रोजगार हमीवर काम करणारा सामान्य व्यक्ती ते सिनेसृष्टीत प्रसिद्ध गीतकार म्हणून लौकिक मिळवणारा गीतकार,,, असा आपला सारा खडतर जीवन प्रवास मनमोकळ्या शैलीत सादर केला. त्यांच्या या प्रांजळ कथनाने श्रोते दीडतास खिळून राहिले. या प्रसंगी व्यासपीठावर डिजिटल स्क्रीन लावून त्यावर सिने गीतांचे सादरीकरण करण्यात आले, जोडीला बहारदार निवेदन असल्याने प्रेक्षकांना दृक श्राव्य सुखद अनुभव आला.
निसर्ग कवी / चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर यांनी लिहिलेल्या गीतांमध्ये लेखनातील अनेक वेगवेगळे रंग दिसतात. विठ्ठलाला साद घालणारी सामाजिक वेदना, लेकीच्या भेटीसाठी व्याकूळ झालेला जीव, ग्रामीण जीवनातील रांगडा शृंगार आहेच पण प्रेमभावनेतील हळुवारपणा देखिल आहे. देशाच्या लढ्यात शहीद झालेल्या स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाची जाणीव आणि माय मातीच्या भाग्याची चिंता देखिल आहे...
करुण, प्रणय ते आवेशपूर्ण अशा विविध भावविश्वांत त्यांच्या लेखणीचा सहज संचार आहे. ही विविधता त्यांच्या रचनांमध्ये दिसून येते.त्यांच्या भाषेला ग्रामीण शब्दकळेची देणगी आहे. तसेच माय माती, नातीगोती यांच्या भावविश्वाचा मधुर सुगंधही आहे.
माय मातीशी कवी जोडलेला असला की, तो मृदगंध त्याच्या शब्दात आपोआपच येतो आणि रचना लोक मनाला स्पर्श करते.
बऱ्याचदा कवीचे काही शब्द कानावर पडतात आणि आपण ते विसरून ही जातो. काही शब्द मनाला स्पर्श करतात आणि दीर्घकाल आठवणीत राहतात. तर काही शब्द आपल्या डोळ्यांसमोर एखादे चित्र उभे करतात. मनात एखादी भावना जागवतात,आपल्याला कळत नकळत त्या भावविश्वाचा एक भाग बनवून टाकतात. शब्दांची ही जादूगिरी सहज साध्य नसते. त्याला प्रतिभेचा परिसस्पर्श हवा. भोवतालाचे आणि मानवी भाव भावनाचे सूक्ष्मनिरीक्षण हवे. ही किमया साधणारा गीतकार केवळ यमक जुळवत नसतो, तर तो शब्दांमधून एक विलक्षण विश्वच उभे करीत असतो. हे बाळासाहेब यांनी अपार संयम आणि चिकाटी यावर साधले आहे.
मराठी चित्रपटगीतांच्या प्रांतात ग्रामीण बोलीभाषेचा सहजसुंदर वापर करून, निसर्गाच्या विविध छटा शब्दांतून साकारत आणि मातीशी असलेले आपले नाते गीतांतून व्यक्त करीत रसिकांच्या मनावर ठसा उमटवणारे गाणी त्यांनी लिहिली आहेत.
त्यांच्या शब्दांना गावाकडच्या मातीचा गंध आहे, ग्रामीण जीवनाचा लहेजा आहे, लोकसंस्कृती, परंपरा यांची उत्तम जाण आहे. संत साहित्याचा अमिट ठसा त्यांच्या लिखाणात आहे. तसे मानवी भावभावनांचे सूक्ष्म भानही आहे. त्यांच्या शब्दांतून कधी फुललेले शेत शिवार दिसते तर , कधी प्रेमाची चाहूल लागते, कधी विरहाची कळ मनाला बोचते. अशा काही रचना त्यांनी त्या त्या गीताच्या जन्मकथा सांगत असतांना पडद्यावर दाखवल्या. त्यांना प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.
त्यातली काही गाणी...
'सत्ताधीश' या चित्रपटातील "नितीमत्तेची गाथा चंद्रभागेत बुडाली... तुझ्या वाचुन आम्हाला आता कुणी नाही वाली... विटेवरुन ये खाली देवा हो रे आता जागा... धाव पांडुरंगा आता धाव पांडुरंगा...""
या ओळींमध्ये केवळ भक्तिभाव नाही. त्यामध्ये काळीज पिळवटून टाकणारे दुःख ही आहे. सामाजिक विषमता अन्याय अशा परिस्थितीविषयीची अस्वस्थताही आहे.
'नीतिमत्तेची गाथा चंद्रभागेत बुडाली' ही प्रतिमा विशेष लक्षवेधी आहे. चंद्रभागा म्हटले की तुकोबाची बुडवलेली गाथा आठवते. ती प्रसिद्ध प्रतिमा इथे चपखल वापरली आहे.त्याच चंद्रभागेत नीतिमत्तेची गाथा बुडाल्याचे सांगताना कवी समाजातील नैतिक मूल्यांच्या ऱ्हासाकडे लक्ष वेधतो.
देवाच्या चरणी शरण आलेला भक्त येथे देवाला गाऱ्हाणे घालत नाही, तर त्याला जागे करतो. 'विटेवरुन ये खाली देवा हो रे आता जागा' या शब्दांत भक्तीची आर्तता आणि वर्तमानाविषयीची तगमग एकत्र येते.
'धाव पांडुरंगा आता,,, धाव पांडुरंगा" या ओळी या आर्ततेला विलक्षण भावनिक धार देतात.जणू काही समाजातील सामान्य माणसाच्या मनात साचलेली अगतिकता विठ्ठलाच्या चरणांशी जाऊन व्यक्त होत आहे.ती मदतीची याचना भावपूर्ण शब्दात आली आहे.
लेकीच्या भेटीसाठी व्याकूळ झालेला जीव!
''सासरची का माहेरची'' या चित्रपटातील गीताच्या ओळी पाहा.
"माझ्या जिवाच्या लेकीला आज सांगावा पाठवा... माझा व्याकुळला जिवु माझी मालन भेटवा..."
मराठी संस्कृतीत माय लेक हे नातं केवळ रक्ताचं नसतं; ते मायेचं, काळजीचं, आठवणींचं आणि हृदयाच्या हळव्या कोपऱ्यात जपलेल्या प्रेमाचं असतं.
'माझ्या जिवाच्या लेकीला' या शब्दप्रयोगातच त्या नात्याची भावनिक श्रीमंती सामावलेली आहे. 'माझा व्याकुळला जिव' या शब्दांतून भेटीसाठी आतुर झालेल्या आईच्या मनाची घालमेल व्यक्त होते.
या गीतात अलंकारांचा बडेजाव नाही. अवघड शब्दांची कसरत नाही. आहे ती मनातली ओढ आणि नात्याची सहज अभिव्यक्ती!
ग्रामीण बोलीभाषेचे हेच सामर्थ्य आहे. ती भावना थेट व्यक्त करते. तिच्या साधेपणातच तिची परिणामकारकता असते.
या गीतातील शब्द वाचताना एखाद्या आईच्या किंवा वडिलांच्या मनात लेकीच्या भेटीची लागलेली आस सहज जाणवते. गीतकार जेव्हा अशा भावनेला साध्या शब्दांत व्यक्त करतो, तेव्हा गीत केवळ चित्रपटापुरते मर्यादित राहत नाही; ते अनेकांच्या व्यक्तिगत आयुष्याचा भाग बनते.
ग्रामीण शृंगाराची खट्याळ शब्दकळा!
बाबासाहेब सौदागर यांच्या गीतलेखनातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ग्रामीण शृंगाराचे चित्रण. हे चित्रण खटकेबाज शब्दात येते.
'घुंगराच्या नादात' या चित्रपटातील गीताच्या ओळी पाहा.
"तुमचा पिकला मळा... नका लावु लळा... माझ्या जवळ पाव्हणं तुम्ही येऊ नका... मला ऊसाच्या फडात नेऊ नका..."
ग्रामीण जीवनातील रुजलेल्या प्रतिमा आणि धाडसी शृंगारभावना यांची सांगड या ओळींतून घातलेली दिसते.
'पिकलेला मळा', 'लळा लावणे' आणि 'ऊसाचा फड' हे शब्द केवळ ग्रामीण परिसराची आठवण करून देत नाहीत, तर त्यांच्यामागे एक लोक साहित्य,सांस्कृतिक संदर्भही आहे.
ऊसाचा फड म्हणजे ग्रामीण शेतीचा परिचित भाग. परंतु गीतकाराच्या कल्पनेत तो केवळ शेतीचा तुकडा राहत नाही. तो एका विशिष्ट भावस्थितीचा, खट्याळ संवादाचा आणि सूचक शृंगाराचा पट बनतो..
'मला ऊसाच्या फडात नेऊ नका' या ओळीतून व्यक्त होणारा नकार हा केवळ नकार नसून त्यामागे दडलेला लटक्या रागाचा, संकोचाचा किंवा खट्याळपणाचा होकारार्थी अर्थही रसिकाला जाणवू शकतो.
अशा गीतांमध्ये बोलीभाषेतील शब्दांचे महत्त्व अधिक असते. प्रमाणभाषेतील शब्दांनी हाच भाव व्यक्त केला असता, तर कदाचित त्यातील ग्रामीण सहजता आणि खुमारी कमी झाली असती.
ग्रामीण बोली ही येथे केवळ भाषेचे माध्यम नाही; ती गीताच्या आशयाचा अविभाज्य भाग आहे.
टेंभा, मशाल या प्रतिमा मधून फुलणारा रांगडा शृंगार!
'जुगाड' या चित्रपटातील गीतातील या ओळी
"हात हाती धरा... थांबा मुक्काम करा... रात अंधारी राया मला नटवा... तुमच्या टेंभ्याने मशाल पेटवा... माझी टेंभ्याने मशाल पेटवा..."
या ओळींमध्ये ग्रामीण जीवनातील जुने प्रचलित शब्द नवे संदर्भ आणि प्रेमभावनेतील सूचकता घेऊन एकत्र येतात.
'टेंभा' आणि 'मशाल' हे शब्द ग्रामीण परिसरात परिचित असलेल्या प्रकाशाच्या साधनांची आठवण करून देतात. रात्रीचा अंधार, मुक्काम, सोबत आणि प्रकाश यांच्याभोवती गीतातील भावविश्व आकाराला येते.
गीतकाराची शब्दनिवड येथे महत्त्वाची ठरते. शहरी वातावरणातील प्रतिमांऐवजी ग्रामीण जीवनातील वस्तूंचा वापर केल्यामुळे गीताला स्वतंत्र रंग प्राप्त होतो.
'रात अंधारी' या शब्दांतून वातावरण तयार होते, तर 'टेंभ्याने मशाल पेटवा' या ओळीतून एक सूचक भाव व्यक्त होतो.
गीताचा शृंगार उघडपणे सांगण्याऐवजी ग्रामीण प्रतिमांच्या साहाय्याने व्यक्त करण्याची ही पद्धत लोकगीतांच्या परंपरेची आठवण करून देते.
बोलीतील एखादा शब्द कसा अर्थपूर्ण ठरू शकतो आणि तो गीताला वेगळे व्यक्तिमत्त्व कसे देऊ शकतो, याचे हे उदाहरण आहे.
'मोहरला मळा' आणि देहावरची रोषणाई!
'जुगाड' या चित्रपटाशी संबंधित आणखी एका गीतातील ओळी पाहा.
मोहरला मळा... सजणाने लळा मला लावियेला बाई... कोऱ्या माझ्या देहावर केली रोषणाई...
'मोहरला मळा' या शब्दांत निसर्गातील फुलण्याची प्रक्रिया आणि मनात उमलणारी प्रेमभावना यांची सांगड घातलेली आहे.
मळा मोहरतो, तेव्हा त्याला आलेला बहर नवी शोभा देतो . प्रेमभावनेने मन मोहरते, तेव्हाही व्यक्तीच्या भावविश्वात नवा रंग भरतो. निसर्गातील या अनुभवाचे मानवी भावनेशी असलेले नाते गीतकार सहजपणे उलगडतो.
'कोऱ्या माझ्या देहावर केली रोषणाई' ही ओळ शृंगारभावनेची वेगळी प्रतिमा निर्माण करते. रोषणाई हा शब्द सामान्यतः दिवे, प्रकाश आणि उत्सव यांच्याशी संबंधित आहे. येथे त्याचा वापर प्रेमाच्या अनुभवातून उमटलेल्या नव्या जाणीवेचे प्रतीक म्हणून वाचता येतो.
विशेष म्हणजे, 'मळा', 'सजण', 'लळा' आणि 'रोषणाई' हे शब्द एकत्र आल्यामुळे गीतात निसर्ग, प्रेम आणि शृंगार यांचे स्वतंत्र भावविश्व निर्माण होते.
बाबासाहेब सौदागर यांच्या शब्दकळेतील ग्रामीण गंध आणि प्रतिमात्मकता येथे प्रकर्षाने जाणवते.
प्रेमाच्या स्पर्शाने काळजात उमटलेले चित्र!
'शिवा' या चित्रपटातील गीताच्या ओळी आहेत.
"चंद्रावाणी रुप तुझे काळजात ठसले... प्रेमवेडे पाखरु हे मनामध्ये घुसले..."
प्रेमभावना व्यक्त करताना चंद्र, काळीज आणि पाखरू या परिचित प्रतिमांचा वापर मराठी गीतपरंपरेत अनेकदा झालेला आहे. मात्र, या प्रतिमांची मांडणी आणि त्यातून निर्माण होणारा भाव हे गीताचे वेगळेपण ठरवतात.
'चंद्रावाणी रूप' ही उपमा नैसर्गिक सौंदर्याचे चित्र उभे करते. 'काळजात ठसले' हा शब्दप्रयोग त्या सौंदर्याचा मनावर झालेला खोल परिणाम व्यक्त करतो.
दुसऱ्या ओळीत मनाचे रूपांतर प्रेमवेड्या पाखरात होते. पाखरू म्हणजे चंचलता, स्वच्छंदता आणि उडण्याची ओढ. प्रेमात पडलेल्या मनाच्या अवस्थेला ही प्रतिमा अनुरूप ठरते.
'मनामध्ये घुसले' या बोलभाषेतील रांगड्या शब्दप्रयोगामुळे प्रेमभावनेची अचानक झालेली चाहूल अधिक थेटपणे व्यक्त होते.
येथे गीतकाराची शब्दनिवड केवळ सौंदर्यनिर्मिती करत नाही, तर प्रेमात पडलेल्या व्यक्तीच्या मनाची अवस्था सहजपणे व्यक्त करते.
'बारा बलुतेदार, अठरा आलुतेदार' : लोकसंस्कृतीचा जागर!
'स्वराज्य जननी जिजामाता' या मालिकेतील गीताचा हा अंश विशेष उल्लेखनीय आहे.
"बारा बलुतेदार अठरा आलुतेदारांचे गाणे... अशुभाला शुभ करावे आपुल्या आहे हाती... धरुन सोन्याच्या नांगर करुया... भाग्यवान ही माती..."
ग्रामीण महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक रचनेत बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदार या संकल्पनांना ऐतिहासिक महत्त्व आहे. गावाच्या सामूहिक जीवनात विविध व्यवसाय करणाऱ्या समाजघटकांचे योगदान या परंपरेतून अधोरेखित होते.
स्वराज्य संकल्पक राजमाता जिजाऊ यांनी आक्रमकांनी ज्या भूमीवर गाढवाचा नांगर फिरवला त्याच भूमीला सुवर्णाच्या फाळाने नांगरून पवित्र करण्याची संकल्पना मांडली.
सोबतच लोकजीवनातले, समाज जीवनाचे महत्त्वाचे आधारस्तंभ बारा बलुतेदार आणि आलोतेदार यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली. त्याचे यथार्थ चित्रण बाळासाहेबांनी आपल्या या गाण्यात केले आहे. ते खरोखर लोकसंस्कृतीची प्रगल्भ जाण दाखवणारे आहे. या दोन अडीच मिनिटाच्या गाण्यात हे सारं मांडण्याचं कसब त्यांनी लीलया पेलले आहे.
या पार्श्वभूमीवर 'अशुभाला शुभ करावे,आपुल्या आहे हाती' या ओळीतून सकारात्मक परिवर्तनाचा संदेश व्यक्त होतो. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी ती बदलण्यासाठी माणसाने पुढाकार घ्यावा, ही प्रेरणा त्यात आहे.
'धरू सोन्याच्या नांगर करुया भाग्यवान ही माती' या प्रतिमेत शेती, श्रम, समृद्धी आणि भूमीविषयीची आत्मीयता दिसून आशावाद दिसतो.
सोन्याचा नांगर ही समृद्धीची प्रतिमा आहे; परंतु या समृद्धीमागे मातीशी जोडलेले श्रम आणि सामूहिक प्रयत्न यांचे महत्त्वही सूचित होते.
या गीतातून ग्रामीण संस्कृतीविषयीची जाण, ऐतिहासिक संदर्भांची ओळख आणि मातीविषयीचा अभिमान व्यक्त होतो.
ग्रामीण शब्दांचा वापर म्हणजे केवळ बोलीतील शब्दांची पेरणी नव्हे, तर त्या शब्दांमागील सामाजिक आणि सांस्कृतिक विश्वाची जाणीव असणेही आवश्यक आहे. या गीताच्या आशयातून त्याची प्रचिती येते.
नजरेची भाषा आणि मनात उठलेले वादळ!
नव्या पिढीच्या तोंडी असलेली भाषा देखिल कविला अवगत आहे.
'शिवा' या चित्रपटातील आयटम साँगच्या ओळी पाहा.
"तुम्ही पाहिलं वळून... मला आलं कळून... मनात वादळ झालं सुरू... एन्जॉय करू मस्त एन्जॉय करू..."
प्रेमाची किंवा आकर्षणाची सुरुवात अनेकदा नजरेच्या एका क्षणापासून होते. कोणीतरी वळून पाहते, दुसऱ्याला त्याचा अर्थ जाणवतो आणि मनात विचारांचे वादळ सुरू होते.
'तुम्ही पाहिलं वळून, मला आलं कळून' या शब्दांतून नजरेच्या भाषेचे साधे; पण प्रभावी चित्र उभे राहते.
या गीतात आधुनिक काळातील 'एन्जॉय' हा इंग्रजी शब्दही वापरलेला आहे. त्यामुळे गीतकाराची शब्दसंपदा केवळ ग्रामीण बोलीपुरती मर्यादित नसून, प्रसंगानुरूप आधुनिक भाषेतील शब्द स्वीकारण्याचीही त्यांची तयारी दिसते.
ही बाब महत्त्वाची आहे. कारण जिवंत भाषा ही सतत बदलत असते. ती नव्या शब्दांना सामावून घेते आणि त्यांना आपल्या अभिव्यक्तीचा भाग बनवते.
ग्रामीण भाषेचा अस्सलपणा जपताना समकालीन भाषेतील शब्दांचा वापर करणे, हेही गीतलेखनातील एक वेगळे कौशल्य आहे.
स्वातंत्र्यदेवतेला साद!
'मध्यमवर्ग' या चित्रपटातील गीत देखिल भावस्पर्शी आहे.
"झाले शहीद त्यांचे व्हावेत पूर्ण हेतू... यावे पुन्हा नव्याने स्वातंत्र्यदेवते तू..."
या ओळींमध्ये देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांविषयीची कृतज्ञता आणि त्यांच्या स्वप्नपूर्तीची अपेक्षा व्यक्त झाली आहे.
'झाले शहीद त्यांचे व्हावेत पूर्ण हेतू' या शब्दांतून बलिदानाचे सार्थक होण्याची भावना व्यक्त होते.
स्वातंत्र्य मिळवणे हा एका ऐतिहासिक संघर्षाचा शेवट असला, तरी त्या स्वातंत्र्याचा अर्थ प्रत्यक्ष जीवनात साकार करणे ही सतत सुरू राहणारी प्रक्रिया आहे. शहीदांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा या ओळींतून व्यक्त होते.
'यावे पुन्हा नव्याने स्वातंत्र्यदेवते तू' या आवाहनात स्वातंत्र्याच्या मूल्यांचे महत्व अधोरेखित झाले आहे.
येथे गीतकाराचा आवाका ग्रामीण शृंगाराच्या पलीकडे जातो. सामाजिक जाणीव, राष्ट्रीय भावना आणि एकात्मता,ऐतिहासिक स्मृती यांनाही त्यांच्या लेखणीत स्थान मिळते.
सुख-दुःखांच्या सोबती : आशा आणि अभिलाषा!
'आशा अभिलाषा' या मालिकेतील गीताच्या ओळी आहेत.
"कोण वाचणार सांगा विधिलिखिताची भाषा... सुखदुःखाच्या सोबती सर्व आशा अभिलाषा..."
'विधिलिखिताची भाषा' हा शब्दप्रयोग माणसाच्या आयुष्यातील अटळ अनिश्चिततेकडे लक्ष वेधतो.
भविष्य नेमके काय घेऊन येईल, हे कोणालाही ठामपणे सांगता येत नाही. सुख आणि दुःख या दोन्हींचा अनुभव घेत माणूस आयुष्याचा प्रवास करीत असतो. या प्रवासात आशा आणि अभिलाषा मात्र त्याला जगण्याचे बळ देतात.
गीतकार येथे मोठे तत्त्वज्ञान सांगण्याचा आव आणत नाही. परिचित शब्दांतून जीवनातील एक साधे; पण महत्त्वाचे सत्य व्यक्त करतो.
यातून त्यांच्या गीतलेखनातील विषयवैविध्याची जाणीव होते. प्रेम, विरह, भक्ती, सामाजिक वास्तव, राष्ट्रभावना आणि जीवनचिंतन अशा विविध विषयांना त्यांच्या लेखणीत स्थान मिळालेले दिसते.
निसर्गकवितेचा हिरवा रंगमहाल!
बाबासाहेब सौदागर यांचा उल्लेख निसर्गकवी म्हणूनही केला जातो. त्यांच्या निसर्गकवितांचा, आजी शहाई यांच्या ओव्यांचा आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या निसर्गकवितांचा संदर्भ या निमित्ताने महत्त्वाचा ठरतो.
ग्रामीण महाराष्ट्रातील निसर्ग हा केवळ डोळ्यांना दिसणारा परिसर नसतो. तो माणसाच्या जगण्याचा अविभाज्य भाग असतो.
शेतातील पिके, मळ्यातील मोहर, झाडांची सळसळ, ऋतूंचे बदल, पावसाची चाहूल, पक्ष्यांचा किलबिलाट आणि मातीचा गंध या सगळ्यांशी ग्रामीण माणसाचे भावनिक नाते असते.
म्हणूनच ग्रामीण निसर्गाचे वर्णन करताना केवळ त्याचे बाह्य सौंदर्य सांगून भागत नाही. त्या निसर्गाशी माणसाचे असलेले नाते समजून घ्यावे लागते.
बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतून खानदेशी बोलीचे अस्सल सामर्थ्य आणि जीवनानुभवांची प्रगल्भता प्रत्ययास येते. त्यांच्या कवितेतील शब्द हे त्यांच्या जगण्याचेच शब्द आहेत. शेती, संसार, नाती आणि निसर्ग यांविषयीचे चिंतन त्यांच्या बोलीतून सहजपणे प्रकट होते.
आजी शहाई यांच्या ओव्यांचा उल्लेखही लोकपरंपरेतील मौखिक साहित्याचे महत्त्व अधोरेखित करतो. या ओव्या त्यांना अनेकदा गीत लेखन करतांना मार्गदर्शक म्हणून धावून आल्या असा आदरपूर्वक उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला.
ओवी हा ग्रामीण स्त्रीजीवनातील अनुभव, भावना, श्रम आणि नातेसंबंध व्यक्त करणारा प्रभावी साहित्यप्रकार आहे.
या परंपरेच्या संदर्भात बाबासाहेब सौदागर यांच्या गीतलेखनाकडे पाहताना ग्रामीण भाषेच्या विविध छटा लक्षात येतात.
मात्र प्रत्येक कवीची अभिव्यक्ती स्वतंत्र असते. बहिणाबाईंच्या कवितेची तुलना सौदागर यांच्या चित्रपटगीतांशी करून समानतेचे निष्कर्ष काढण्यापेक्षा, ग्रामीण बोलीतील अभिव्यक्तीची विविध रूपे समजून घेणे अधिक योग्य ठरेल.
लोकजीवनातून आलेले शब्द जेव्हा गीतात प्रवेश करतात, तेव्हा ते आपल्या मूळ संदर्भासह अनेक नव्या अर्थछटा घेऊन येतात. ग्रामीण बोलीचे हेच खरे सामर्थ्य आहे.
'हिरव्या ऋतूंचा रंगमहाल' हे व्याख्यानाचे शीर्षक म्हणूनच अर्थपूर्ण वाटते. ऋतू बदलतात, निसर्ग नवे रंग धारण करतो आणि त्या रंगांमधून कवीला नवे शब्द सापडतात. या शब्दांतून रसिकांच्या मनातही भावनांचे नवे रंग उमटतात.
कवीचे सामर्थ्य शब्द हेच असते, त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय या रंजक व्याख्यानात आला. श्रोत्याच्या श्रुती तृप्त झाल्या हाच कवीच्या शब्दकळेचा खरा कस!
भाऊसाहेब देशमुख,
अमळनेर,
9420389541
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
अमळनेर महिला मंचच्या ४९ महिलांची पंढरपूर वारी; विठुरायाच्या ...
अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प...
अमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवे...
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साने गुरुजी विद्यामंदिरचा प्...
अमळनेरमध्ये काँग्रेसच्या ‘वोट बचाव, देश बचाव’ अभियानाचा निर्...
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच ह...