पुस्तकांशी मैत्री, ज्ञानाची भरारी; वाचन प्रेरणा दिनी विद्यार्थ्यांना ‘नागपूर दर्शन’ची अनोखी संधी! , मारवड विकास मंचचा स्तुत्य उपक्रम; ५५ विद्यार्थ्यांचा परीक्षेत उत्स्फूर्त सहभाग

मारवड, ता. अमळनेर : विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईलऐवजी पुस्तक द्यावे, त्यांच्या मनात वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि महापुरुषांच्या विचारांतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडावा, या उदात्त हेतूने मारवड विकास मंचने वाचन प्रेरणा दिनानिमित्त एक अभिनव उपक्रम राबविला. मंचचे संस्थापक तथा नागपूर आयकर आयुक्त दादासाहेब संदीपकुमार साळुंखे साहेब यांच्या संकल्पनेतून व प्रेरणेतून ‘नागपूर दर्शन’ सहलीसाठी वाचन प्रेरणा अभियान परीक्षेचे आयोजन करण्यात आले. वाचन, ज्ञान, पालकांचा सहभाग आणि शैक्षणिक सहल यांची सुंदर सांगड घालणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
*पारदर्शक परीक्षा, वाचनाला प्रोत्साहन!*
गुरुवार, दि.१५ ऑक्टोबर २०२६ रोजी माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या ‘वाचन प्रेरणा दिना’ चेऔचित्य साधून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, मारवड, ता. अमळनेर, जि. जळगाव येथे या परीक्षेचे आयोजन करण्यात आले.
परीक्षा पारदर्शक, निष्पक्ष व निकोप वातावरणात पार पडावी, यासाठी प्रश्नपत्रिका A, B, C आणि D अशा चार वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तयार करण्यात आल्या. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ‘आपले विवेकानंद’ आणि ‘मुलांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या दोन प्रेरणादायी पुस्तकांचा अभ्यास करण्यास सांगण्यात आले होते.
दोन्ही पुस्तकांवर प्रत्येकी ४० गुणांचे बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात आले. तसेच, दोन्ही पुस्तकांवर आधारित पालकांच्या मदतीने पूर्ण करावयाचे प्रत्येकी १० गुणांचे प्रकल्पकार्य देण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थ्यांचे वाचन, आकलन, चिंतन आणि सर्जनशीलता विकसित करण्यासोबतच पालकांचा शैक्षणिक प्रक्रियेतील सहभाग वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
*विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही ‘नागपूर दर्शन’ची संधी!*
या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सहलीसाठी निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यासोबत त्याच्या आई-वडिलांपैकी एका पालकास नागपूर दर्शन सहलीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक अनुभवासोबतच पालकांसमवेत आनंददायी प्रवासाची संधी उपलब्ध होणार आहे. वाचनातून मिळणारे ज्ञान प्रत्यक्ष अनुभवाशी जोडण्याचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.
*५५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*
या परीक्षेत शाळेतील इयत्ता दुसरी ते चौथीच्या एकूण ५५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी निर्धारित वेळेपूर्वीच प्रश्नपत्रिका सोडवून नागपूर सहलीसाठी निवड होण्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. त्यांच्या उत्साहातून वाचनाची आवड, अभ्यासाची तयारी आणि काहीतरी नवीन शिकण्याची जिज्ञासा दिसून आली.
*मान्यवरांची उपस्थिती व शिक्षकांचे परिश्रम*
या प्रसंगी मारवड विकास मंचचे मावळे एल.जी.चौधरी सर, गोकुळआप्पा सांळुखे, महेश साळुंखे भाऊसाहेब, तसेच पालक प्रतिनिधी श्रीकांत पाटील, शेखर पाटील व गणेश सैंदाणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे, ज्येष्ठ शिक्षक महेश बोरसे, तसेच उपशिक्षक गिरीश पाटील, सुधीर पाटील, चेतना वानखेडे व सविता पाटील यांनी परिश्रम घेतले.
*वाचनातून घडेल विचारशील पिढी!*
आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना पुस्तकांकडे वळविणे, महापुरुषांचे विचार त्यांच्या मनात रुजविणे आणि वाचनाला आनंददायी अनुभवाशी जोडणे ही काळाची गरज आहे. मारवड विकास मंचचा हा उपक्रम केवळ सहलीपुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानलालसा, वाचनसंस्कृती आणि जीवनमूल्यांची जपणूक करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. कारण, पुस्तक वाचणारा विद्यार्थी केवळ परीक्षेत गुण मिळवत नाही, तर विचार करायला शिकतो, स्वप्ने पाहतो आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रेरणा मिळवतो!
चला, पुस्तकांशी मैत्री करूया… वाचनातून विचार समृद्ध करूया… आणि ज्ञानाच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडवूया!
‘वाचन हेच खरे धन!’
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
गझलेची मैफल, साहित्यिकांच्या भेटीगाठी अन् आठवणींचा सुंदर प्र...
नगराध्यक्षा लिलाताई चौधरी व नगरसेविका ज्योती पाटील यांना "सम...
दुष्काळाच्या वणव्यात शेतकरी होरपळतोय; महाविकास आघाडीचा सरकार...
अमळनेरवासियांना आपल्या तालुक्याचा खासदार असल्याचा फायदा मिळत...
गझलेच्या दोन ओळींत उमटतो समाजाच्या वेदनांचा हुंकार! , ‘गझ...
ज्ञानाची सरस्वती, सेवाभावाची शक्ती अन् नेतृत्वाची दुर्गा! ...