उजेड पेरणारी माणसं : विचार, प्रेरणेची दिवटी*

*उजेड पेरणारी माणसं : विचार, प्रेरणेची दिवटी*
आपल्या अवती-भवती निर्व्याज भावनेतून काम करणारी माणसं वावरत असतात. ती कशाचाही लाेभ न बाळगता चालत राहतात. अशा माणसांना अंधार भेदून प्रकाशात आणण्याचा छाेटासा प्रयत्न म्हणजे ‘उजेड पेरणारी माणसं’ हे पुस्तक हाेय. पुण्याच्या पेन पब्लिशिंग हाऊसने आनंदा पाटील यांच्या लेखणीतून साकारलेली ही साहित्यकृती प्रकाशित केली आहे. त्यात ८४ व्यक्तिचित्रणांचा समावेश आहे. प्रत्येक व्यक्ती नवप्रेरणेचा स्त्राेत आणि विचारांची दिवटी म्हटलं तर वावगं ठरू नये.
केवळ पुरस्काराने पोट भरत नाही, हे विदारक सत्य मांडत, जीवन जगण्यासाठीचा रोजचा संघर्ष आणि कष्टाने पोट भरण्याचा वसा घेतलेले कणखर व्यक्तिमत्त्व म्हणजे फेसाटीकार नवनाथ गोरे हे हाेय. त्यांना युवा साहित्य अकादमी पुरस्कार घोषित झाला तो क्षण...
आई-बापांबरोबर जगताना, कष्ट करताना आलेला तो प्रसंग वाचताना डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.
बाल वाचकांना वाचनाचा लळा लावणारी १००हून अधिक पुस्तके लिहिणारे साहित्यिक सुभाषचंद्र वैष्णव आणि लुप्त लिपींच्या संशोधन कार्याचा चिरंतन नंदादीप प्रज्वलित ठेवणारे भाषा संवर्धक विनायक पाटील यांच कार्य वाचताना संशाेधन किती ताकदीचे हवे याची परिचिती येते. अस्सल गावरान भाषा आणि उपजत गोष्टीवेल्हाळपणाचा चपखल उपयोग करत, कथाकथनाच्या प्रयोगांचा एक हजाराचा टप्पा ओलांडणारे प्रा. व. पु. होले यांचे कामही पथदर्शी आहे.
कटू-गोड अनुभवांची शिदोरी असलेल्या ५० ते ६० डायऱ्या व शेकडो पदके ठेवलेली लोखंडी पेटी आणि प्रमाणपत्रांची कापडी पिशवी... हीच खान्देशातील धावपटू आर.बी. भवार यांची संपत्ती. गडगंज संपत्ती असलेल्यांनी या खेळाडूला आर्थिक मदत करताना अनास्था दाखवली, परंतु पन्नासहून अधिक वर्षे धावण्याचा सराव सुरू ठेवत ते पदकांचे बादशहा ठरले. त्यांचा हा प्रवास वाचताना वाचक थक्क हाेताे.
हिरव्यागार भावनेतून आणि कसदार लेखणीतून साहित्यधन प्रसवणाऱ्या शब्दसखी विमल सुरवाडकर हे व्यक्तिचित्रणही लाेभस आहे. लेखकाने त्यासाठी जे भाषासाैष्ठव वापरले आहे ते खिळवून ठेवते. अभिनयाच्या तंत्र-कौशल्याची उत्तम जाण, अस्खलित संवाद पाठांतर, हसतमुख चेहरा आणि आठ ते दहा तास नाटकाचा सराव करण्याची जिद्द असणाऱ्या प्रख्यात नाट्यसेविका कल्पना कोल्हेंचा प्रवासही थक्क करणारा आहे.
भुसावळच्या सांस्कृतिक चळवळीचे पाठराखण करणारे एक समृद्ध पर्व, लोक-संवादी एक्सप्रेस रवी सुपेकर, कबड्डी महर्षी अरुण मांडळकर, वंचित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धपडणाऱ्या राजेश्री सुरवाडे, वैशाली झाल्टे, नाट्यकर्मी जयश्री पुणतांबेकर, तरुण तबलावादक तेजस नेमाडे यांचा जीवनप्रवास प्रेरणेचा दीपस्तंभ आहे.
पुस्तकातील उजेड पेरणाऱ्या माणसांच्या कथा वाचकांना जगण्याची नवी उमेद आणि प्रेरणा नक्कीच देतील. या दीपस्तंभांना उजेडात आणून लेखकाने फार महत्त्वाचे कार्य केले आहे. म्हणून या पुस्तकास व लेखकास पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा.
*सुवर्णा पाटील, पुणे (पुस्तक सखी)*
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम...
अमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा ब...
रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरच...
शालार्थ प्रणालीतील वेतन देयकांचा टॅब सुरू करण्यास परवानगी ...
अमळनेरच्या साहित्यिक परंपरेचा अमृतमहोत्सवी जागर! , ‘नवरंग ...
लावण्या लिहिणाऱ्या गीतकाराच्या लेखणीतून उलगडले निसर्गाचे रंग...