स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव : येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव येथे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘वाचन प्रेरणा दिवस’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. भाषा विभाग व वाङ्मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दुपारी २ ते ४ या वेळेत महाविद्यालयातील खोली क्रमांक २२ येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, ज्ञानाची व्याप्ती वाढविणे, चिंतनशील वृत्ती विकसित करणे आणि वाचनसंस्कृतीची जोपासना करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीची पुस्तके सोबत आणून शांत व प्रसन्न वातावरणात पुस्तकवाचनाचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून वाचनाप्रती आपली आवड व्यक्त केली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील पुस्तकांबरोबरच अवांतर वाचनाचे महत्त्व अनुभवण्याची संधी मिळाली.
याप्रसंगी प्रा. ईशा वडोदकर, प्रा. रूपम निळे आणि प्रा. योगेश धनगर यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी ‘अग्निपंख’ या आत्मचरित्रातील काही निवडक वेचे वाचून दाखविले. या वाचनातून विद्यार्थ्यांना डॉ. कलाम यांचा संघर्षमय जीवनप्रवास, जिद्द, मेहनत, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि ध्येयप्राप्तीसाठी आवश्यक असलेली चिकाटी यांची प्रेरणा मिळाली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणादायी साहित्य वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली.
प्रा. आर. एन. निकुंभ यांनी डॉ. कलाम यांच्या देशाच्या विकासातील योगदानाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा. राजश्री महाजन होत्या. त्यांनी वाचनाचे महत्त्व, व्यक्तिमत्त्व विकासातील पुस्तकांचे योगदान आणि ज्ञानवृद्धीसाठी नियमित वाचनाची आवश्यकता याविषयी सविस्तर विवेचन केले. वाचनामुळे व्यक्तीच्या विचारांना व्यापकता प्राप्त होते, आकलनशक्ती विकसित होते, शब्दसंपत्तीत भर पडते आणि स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता वाढते, असे प्रतिपादन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेपुरते वाचन न करता ज्ञान, आनंद आणि वैचारिक समृद्धीसाठी नियमितपणे विविध प्रकारची पुस्तके वाचावीत, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
या उपक्रमाला उपप्राचार्य प्रा. राजश्री महाजन, पर्यवेक्षिका प्रा. शिल्पा सरोदे, कला व वाणिज्य शाखेचे समन्वयक प्रा. उमेश पाटील आणि विज्ञान शाखेचे समन्वयक प्रा. गुणवंत वंजारी उपस्थित होते. भाषा विभाग व वाङ्मय मंडळाचे सदस्य तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. विशेष म्हणजे, शिक्षकांनी स्वतः पुस्तकवाचन करून विद्यार्थ्यांसमोर वाचनाची प्रेरणादायी कृती मांडली. शिक्षकांच्या या सहभागामुळे वाचन ही केवळ अभ्यासाची बाब नसून आयुष्यभर जोपासण्याची सवय आहे, हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला.
यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. गणेश सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भाषा विभाग व वाङ्मय मंडळातील प्रा. अर्जुन मेटे, प्रा. रूपम निळे, प्रा. संध्या महाजन, प्रा. गणेश सूर्यवंशी, प्रा. ज्योती मोरे, प्रा. संदीप वानखेडे, प्रा. ईशा वडोदकर, डॉ. अतुल इंगळे, डॉ. जयंत इंगळे, प्रा. संदीप गव्हाळे, प्रा. योगेश धनगर आणि प्रा. सुरेखा पाटोळे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक - Marathi Live News

संबंधित बातम्या
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम...
अमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा ब...
रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरच...
शालार्थ प्रणालीतील वेतन देयकांचा टॅब सुरू करण्यास परवानगी ...
अमळनेरच्या साहित्यिक परंपरेचा अमृतमहोत्सवी जागर! , ‘नवरंग ...
लावण्या लिहिणाऱ्या गीतकाराच्या लेखणीतून उलगडले निसर्गाचे रंग...